शिवाजी पार्कवरचा दसरा मेळावाच नाही तर या ६ गोष्टी शिंदेनी घालवल्यात..

उच्च न्यायालयाने निर्णय दिला. उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा आत्ता शिवाजी पार्कवर होण्याचा मार्ग मोकळा झाला. एकनाथ शिंदेंच्या गटामार्फत होणारा दसरा मेळावा BKC मैदानावर तर ठाकरेंचा दसरा मेळावा नेहमीच्याच शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे.

उद्धव ठाकरेच्या शिवसेनेमार्फत महानगरपालिकेकडे शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घ्यावा म्हणून अर्ज करण्यात आला होता. मात्र स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी शिंदे गटामार्फत याच मैदानावर दसरा मेळावा आयोजित करण्याची परवानगी मागितली. महानगपालिकेमार्फत मात्र या दोन्ही अर्जांना परवानगी देण्यात आली नाही आणि प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले. त्यानंतर झालेल्या सुनावणीत उद्धव ठाकरेंनी बाजी मारली..

आत्ता दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमार्फत जल्लोष साजरा केला जात आहे. बंडखोरीच्या दिवसापासून उद्धव ठाकरेंचा हा पहिला विजय समजला जात आहे.

तर दूसरीकडे एकनाथ शिंदेंनी बरच काही गमावल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र शिंदेंनी नेमकं काय गमावलं हे पाहणं गरजेचं आहे… 

शिंदेंनी गमावलेली पहिली गोष्ट म्हणजे कादेशीर पेचप्रसंगात अडथळा..

शिंदे गटाच्या अस्तित्वाचा चेंडू आजही सर्वोच्च न्यायालयात आहे. शिंदे गटामार्फत सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडत असताना पक्षांतर झालेच नाही अशी भूमिका घेतली जात आहे. पक्षांतर्गत बहुमत असल्याची भूमिका एकनाथ शिंदे यांच्या गटाने मांडल्यामुळे प्रकरण घटनापीठासोबतच निवडणूक आयोगाकडे गेलेले आहे.

अशा वेळी निवडणूक आयोगाने आजवर दिलेले निर्णय पहावे लागतात. या निर्णयांमध्ये आयोगाने बऱ्याचदा मेजोरिटी टेस्टला प्राधान्य दिलं आहे. अशा वेळी दोन्हीकडच्या गटांच चिन्ह फ्रिज करणं आणि येणाऱ्या निवडणूका घेणं यावर भर दिल्याचं दिसतं.

साहजिक पक्षावर क्लेम करण्यासाठी आमदार, खासदारांच्या पाठींब्यासोबतच शिवसेना शाखा, पदाधिकारी, कार्यकर्ते महत्वाची भूमिका बजावतात. अशा वेळी पक्षाच्या अस्मितादर्शक गोष्टींना देखील महत्व प्राप्त होते.

फुटीर गट आहोत हे दाखवून देणं शिंदे गटाला अडचणीचं ठरणारं आहे, आपणच खरी शिवसेना आहोत हे कोर्टासमोर सिद्ध करताना शिवसेनेकडे असणाऱ्या अस्मितादर्शक गोष्टींवर पण दावा करणं क्रमप्राप्त होतं, मात्र शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा हे समीकरण शिंदेंना जुळवता आलं नाही. खरी शिवसेना आपणच असल्याचा दावा मांडताना ठाकरे गटाकडून भविष्यात नक्कीच शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा संदर्भ देण्यात येईल.

दूसरी गमावलेली गोष्ट  म्हणजे बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेवर नॅचरल क्लेम गेला.. 

पहिल्या दिवसापासून बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना असा स्टॅण्ड एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे. बाळासाहेबांच्या विचारांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामधील दर्शनी गोष्ट म्हणजे दसरा मेळावा. शिवसेनेमार्फत पक्षाच्या पहिल्या वर्षापासून दसरा मेळावा आयोजित करण्यात येतो. दसरा मेळाव्याला मोठ्ठा इतिहास लाभलेला आहे. हा इतिहास सोबत घेवून लोकांमध्ये जाताना शिवसेनेवर क्लेम करणं सोप्प ठरणार होतं.

पण दसरा मेळावा शिवाजी पार्कवर आयोजित करता येणं शिंदेसाठी आत्ता शक्य नसल्याने हा क्लेम उद्धव ठाकरेंकडेच जाणार आहे.

तिसरी गमावलेली गोष्ट म्हणजे बेरजेच्या राजकारणाला मर्यादा.. 

राज ठाकरे दसरा मेळाव्यात उपस्थित राहतील अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. नारायण राणे देखील एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यास उपस्थित राहतील अस बोललं जात आहे. तर दूसरीकडे मनोहर जोशी यांना देखील दसरा मेळाव्यास आमंत्रण असेल अशी शक्यता आहे.

उद्धव ठाकरे विरुद्ध मनोहर जोशी अशा राजकारणाला सुरवात झाल्यानंतर दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरूनच जोशींच्या विरोधात घोषणा देवून त्यांनाा सेनेतून बाजूला करण्यात आलं होतं. सध्या मनोहर जोशी सक्रिय राजकारणात नसले तरी त्यांच व्यासपीठावर असणारं अस्तित्व शिंदे गटासाठी नैतिक अधिष्ठान मिळवून देणारं ठरेल.

मात्र हे सर्व बेरजेचे नेते दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर आले असते तर त्यांचा प्रभाव अधिक आक्रमकपणे जाणवला असता. BKC च्या मैदानात एकनाथ शिंदे दसरा मेळावा आयोजित करत असले तरी त्यास इतिहासाचा संदर्भ लागत नसल्याने शिंदेच्या या बेरजेच्या राजकारणावर मर्यादाच आलेल्या आहेत..

चौथी गमावलेली गोष्ट म्हणजे आलेला गट टिकवून ठेवणं..

पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार किमान एक तृतीयांश आमदारांचा पाठींबा एकनाथ शिंदे यांना आवश्यक आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे यांना विधानसभेत आपलं बहुमत देखील सिद्ध केलेलं आहे. मात्र इतिहासात बंडखोरांनी माघारी घेतल्याची उदाहरणे आहेत. छनग भुजबळांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत 36 आमदारांचा पाठींबा असल्याची सही होती. मात्र जेव्हा ओळख परेड करण्याची वेळ आली तेव्हा 18 आमदारच सोबत राहिले.

त्यानंतरच्या कालखंडात या 18 पैकी 6 आमदार पुन्हा सेनेत गेले. त्या काळात पक्षांतरबंदीचे नियम इतके जटील नव्हते, तरिही भुजबळांची कसरत झाली होती.

दूसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळ विस्तारामुळे काही आमदार नाराज असल्याच्या बातम्या सुरू झाल्या. फुटलेल्या आमदारांपैकी काही आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परतले तर एकनाथ शिंदे यांची देखील कसरत होणार आहे, कारण प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

अशा वेळी सोबत असणाऱ्या आमदारांना बुस्ट देण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर आहे. कुठेतरी या फुटीर आमदारांचा कॉन्फिडन्स अशा गोष्टीमुळे कमी होत असतो. विशेषत: उद्धव ठाकरेंच्या बाजने लागलेला हा निर्णय कोर्टाने दिला आहे आणि फुटीर गटाबाबतचा निर्णय देखील कोर्टातच आहे, अशा वेळी बंडखोर आमदारांची अस्वस्थता अजून वाढण्याची चिन्ह नाकारता येत नाहीत.

पाचवी गमावलेली गोष्ट म्हणजे मुंबई महानगरपालिकांच्या निवडणूका..

मुंबई महानगरपालिका म्हणजे शिवसेनेचा आत्मा. बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेवर भगवा ध्वज फडकावूनच राज्यात आपली सत्ता स्थापन केली होती. उद्धव ठाकरेंना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्याचं आव्हान असणार आहे, तर दूसरीकडे भाजपने कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका आपल्याकडे खेचून घेण्याची तयारी केली आहे.

दसरा मेळाव्यातून मुंबई महानगरपालिकेसंबधीत विधाने करून मोठ्या प्रमाणात जून्या शिवसेना कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न ठाकरे करणार, अशा वेळी एकनाथ शिंदे एक पाऊल मागे पडले आहेत. 

आणि सहावी व महत्वाचं गमावलेली गोष्ट म्हणजे भाजपच्या पलीकडे जावून स्वत:च अस्तित्व सिद्ध करणं. 

शिवसेनेत असताना एकनाथ शिंदे हे पक्षाच्या छत्रछायेखाली होते. मात्र इतकं मोठ्ठं बंड केल्यानंतर, मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर आत्ता त्यांना दुहेरी सामना करावा लागणार आहे. एका बाजूला ठाकरेंची शिवसेना तर दूसऱ्या बाजूला आपलं उपद्रव्य मुल्य टिकवून भाजपसोबत डिल करण्याची ताकद संभाळणं अशी दूहेरी कसरत एकनाथ शिंदे यांना करावी लागणार आहे. बंडखोर आमदारांना भाजप जवळची न वाटता एकनाथ शिंदे जवळचे वाटायला हवेत.

ज्या दिवशी बंडखोर आमदारांना भाजप जवळ करेल तेव्हा आपली उपयोगिता संपूष्टात येईल याची पुरेपुर जाणीव एकनाथ शिंदे यांना आहे, त्यामुळे प्रखर ठाकरे विरोध दाखवत राहणं व आपल्या बाजूने डाव मांडण हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.  

मात्र कोर्टाच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे बॅकफूटवर गेले आहेत. आत्ता अजून चाली खेळत आपल उपद्रव्यमुल्य अधोरेखित करण्याचं आव्हान एकनाथ शिंदे यांच्यासमोर असणार आहे…

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.