उर्फीला पोलिसांची नोटीस, पण कारवाई कोणत्या आधारांवर होणार?

मॉडेल आणि अभिनेत्री असलेली उर्फी जावेद आणि भाजपच्या चित्रा वाघ यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता पोलिसात जाऊन पोहोचलाय. काल उर्फी जावेद हिने महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर आता उर्फी जावेदला मुंबई पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

आज उर्फीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेतली आहे. मुंबईतल्या अंबोली पोलिस ठाण्यात तिला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक शैला कोराडे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

आता उर्फीची चौकशी होईल त्यानंतर तिच्यावर कारवाई होईल किंवा नाही होणार. झालीच तर, ती कोणत्या आधारांवर होईल ते बघुया.

मुळात चित्रा वाघ यांनी काय तक्रार दाखल केली होती ते आधी बघु.

चित्रा वाघ यांचा आक्षेप आहे तो उर्फीच्या तोकड्या कपड्यांवर आणि तिच्या फॅशन सेन्सवर. यासंदर्भात त्यांनी पोलिसांकडे मागणी करताना म्हटलंय,

मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स आणि किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी.

म्हणजे उर्फीवर कारवाई होईल ती, अश्लीलतेच्या गुन्ह्याअंतर्गत. आता भारतीय न्याय व्यवस्थेत अश्लीलतेबाबत काय कायदे आहेत? तर, भारतीय दंड संहिता अंतर्गत, कलम २९२, २९३ आणि २९४ अश्लीलतेच्या गुन्ह्याशी संबंधित आहेत.

हे कलम २९२, २९३ आणि २९४ काय आहेत ते बघुया.

कलम २९२ मध्ये अश्लीलता काय आहे याची अस्पष्ट व्याख्या दिसते. २९२ नुसार हे कलम कोणत्याही अश्लील पत्रिका, पुस्तक, कागद, चित्रकला आणि इतर अशा साहित्याची विक्री किंवा प्रकाशन प्रतिबंधित करते.

कलम २९३ मध्ये अश्लील कंटेंट २० वर्षांखालील व्यक्तीला पब्लीश करणं किंवा विकणं किंवा तसा प्रयत्न करणं हा गुन्हा आहे. बरं हा गुन्हा जामीनपात्र आहे. पहिल्यांदा या कमांतर्गत कारवाई झाल्यास पाच वर्षांसाठी कारावास आणि २,००० रुपयांपर्यंतचा दंड आणि दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास १० वर्षांचा कारावास आणि ५,००० रुपयांपर्यंतचा दंड अशी शिक्षा आहे.

कलम २९४ सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये आणि अश्लील गाण्यांना प्रतिबंधित करतो. या कलमांतर्गत जास्तीत जास्त तीन महिन्यांसाठी तुरूंगवास आणि दंड इतकीच कारवाई होऊ शकते.

डिजिटल युगाचा विचार करून , इंटरनेटवरील अश्लील वर्तनासाठीही गुन्हेगारी स्वरूपाचे कायदे करण्यात आले. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ नुसार जो कोणी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील साहित्य प्रकाशित करतो किंवा प्रसारित करतो त्याला शिक्षा होऊ शकते.

पण, विषय असा आहे की, भारतात अश्लीलता म्हणजे नेमकं काय यासंदर्भातली नेमकी व्याख्या कायद्यात लिहीलेली नाही. 

कायदेशीर कारवाईबद्दल उर्फीनंही बाजू मांडली होती. उर्फीने सोशल मीडियावर आपली बाजू मांडताना लिहीलं होतं ,

“जोवर माझे निप्पल्स किंवा वजायना दिसत नाही तोपर्यंत मला कायदेशीर दृष्ट्या शिक्षा होऊ शकत नाही.”

याआधी अश्या केसेस मध्ये काय झालं होतं तेही बघणं गरजेचं आहे.

२०२२ मध्ये, बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने न्यूयॉर्कच्या पेपर मासिकासाठी त्याच्या नग्न फोटोशूटची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर, पोलिसांनी त्याच्यावर कलम २९२,२९३ आणि ५०९ आणि आयटी कायद्याच्या कलम ६७-अ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

कलम ५०९ काय आहे तर, एखाद्या स्त्रिच्या सान्निध्याचा गैरफायदा घेणं आणि अशा स्त्रीला शब्दाने, हावभावाने किंवा कृत्याने तिच्या शालीनतेचा अपमान करणं यासाठी ५०९ चं कलम दाखल होतं. आता चित्रा वाघ यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार ५०९चं कलम दाखल होण्याची शक्यता अगदी कमी आहे.

याशिवाय, मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण याच्यावर गोवा पोलिसांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये राज्यातील समुद्रकिनाऱ्यावर नग्न धावत असल्याचा फोटो अपलोड केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता.

आता, उर्फीने केलेली कृत्ये ही अश्लीलतेच्या व्याख्येत बसतात की नाही, बरं व्याख्येत बसत असतील तरी तिच्यावर कोणत्या कलमांतर्गत गुन्हा होईल हे पोलिस चौकशीनंतरच स्पष्ट होईल.

पण, आतापर्यंततरी कोणत्याही सेलिब्रिटीला अश्लील प्रकार केला म्हणून दीर्घकाळ तुरूंगवास झाल्याचं दिसत नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.