उर्फी जावेदचं प्रकरण चित्रा वाघ यांच्या अंगलट आलंय का ?

उर्फी जावेद हे नाव आलं की आठवतं तो तिचा फॅशन सेन्स. म्हणजे कोणत्याही गोष्टीपासून ती तिचे कपडे बनवते… अगदी मोबाईल, सेफ्टी पिन्स, पोतं काहीही वापरून ती कपडे बनवते आणि त्या कपड्यांमधले तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते. बरं फक्त सोशल मीडियापुरताच तिचा बोल्डनेस मर्यादित नाहीये तर, वेगवेगळ्या ठिकाणी ती या बोल्ड अंदाजात फिरतानाही दिसते.

तिच्या निराळ्या आणि बोल्ड फॅशन सेन्समुळं ती चर्चेत तर असतेच पण आता तिच्या विरोधात राजकीय शक्ती उभी राहिलीये.

भाजपच्या चित्रा वाघ यांनी उर्फी समाजात अश्लीलता पसरवत असल्याचा आरोप करत रीतसर तक्रारच दाखल केलीये. तक्रार दाखल केल्यानंतर अनेक ठिकाणी उर्फीविरोधात महिला आघाड्या आक्रमकही झाल्या. यानंतर उर्फीने सोशल मीडियावरून चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं आणि मग सुरू झालं ते चित्रा वाघ विरूद्ध उर्फी जावेद हे सोशल मीडिया वॉर सुरू झालंय.

या सगळ्या प्रकरणात उर्फी अडचणीत येईल असं सुरूवातीला वाटत होतं.

आता हे प्रकरण सुरू झालं तेव्हा चित्रा वाघ यांनी उर्फीला टार्गेट केलंय म्हणल्यावर हे प्रकरण तिच्या अंगाशी येईल असं वाटत होतं. म्हणजे चित्रा वाघ यांची आंदोलनाची आक्रमक शैली, भाजपची प्रचंड ताकद या सगळ्या गोष्टींमुळे उर्फीवर जबर कारवाई होईल असं वाटत होतं, पण उलट उर्फीने सोशल मीडियावर वाघ यांना प्रत्युत्तर देत वॉरच सुरू केलं.

उर्फीने थेट कायदाच समजवला.

तक्रार दाखल झाल्यावर मग उर्फीने शांत न राहता सोशल मीडियावर पोस्ट केली. ती म्हणाली,

“या राजकारण्यांना आणि वकिलांना हे का कळत नाहीये की माझ्यावर कारवाई होईल असा एकही कायदा नाहीये. जोवर माझे निप्पल्स किंवा वजायना दिसत नाही तोवर मला तुम्ही तुरुंगात टाकू शकत नाही.”

उर्फीने चित्रा वाघ यांना थेट सवाल विचारले.

मुंबईतला अवैध वेश्या व्यवसाय, वूमन ट्राफिकींग, महिलांवरील अत्याचार यावर काय कारवाई करणार? शिवाय, संजय राठोडांच्या प्रकरणात आता चित्रा वाघ काहीच का बोलत नाहीत असंही उर्फीनं म्हटलंय.

उर्फीनं तिची बाजू व्यवस्थित मांडल्यामुळे उर्फीला नेटकऱ्यांचं समर्थन मिळालं

उर्फीनं ज्याप्रकारे कायदेशीर बाजू मांडली आणि तिच्याविरोधात आंदोलनं करण्यापेक्षा समाजात असलेले इतर प्रश्न सोडवा या मुद्द्यामुळं नेटकऱ्यांनी उर्फीचं कौतूक केलं. तिच्या भुमिकेला समर्थनही दिलं. हे सगळं होत असताना नेटकऱ्यांकडून चित्रा वाघ यांच्यावर टीकाही करण्यात आली.

विरोधकांंनीही चित्रा वाघ यांच्यावर टीका करायला सुरूवात केलीये.

आता या प्रकरणात उलट चित्रा वाघ यांच्यावरच जास्त टीका होत असल्याचं दिसतंय. नेटकरी तर ट्रोल करतच होते पण, आता शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनीही चित्रा वाघ यांच्यावर टीका केलीये.

“नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचारांमध्ये आणि भाषेत जास्त असतो.”

अश्या शब्दात अंधारेंनी टीका केलीये.

या प्रकरणात भाजपच्या इतर नेत्यांची काहीच प्रतिक्रिया आलेली नाही.

आता झालंय असं की, हे प्रकरण सुरू झालं तेव्हा भाजपच्या महिला आघाडीतल्या कार्यकर्त्या रस्त्यावर उतरल्या.  तक्रार दाखल झाली. चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतला सगळं झालं. यात एक गोष्ट मात्र दिसली की, आतापर्यंत तरी वाघ यांच्याशिवाय भाजपच्या एकाही नेत्यानं ठोस भुमिका घेतलेली नाहीये. त्यामुळे, या प्रकरणामुळं वाघ आपल्याच पक्षात एकट्या पडल्यात अशा चर्चा सुरू झाल्यात.

उर्फी म्हणतेय, “मी आत्महत्या करेन”

वाघ यांनी उर्फी जिथे दिसेल तिथे तिच्या थोबाडीत मारण्याची धमकी दिलीये… आता मात्र उर्फीने एक सोशल मीडियावर अतिशय गंभीर विधान केलंय. त्या पोस्टमध्ये ती म्हणालीये, “मला माहीत आहे की राजकारण्यांविरोधात असे पोस्ट अपलोड करणं खूप धोकादायक आहे. पण या लोकांमुळे माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत. एकतर मी स्वत:चा जीव तरी घेईन किंवा मग माझ्या मनातलं बोलेन आणि त्यांच्याद्वारे मारली जाईन. मात्र या सगळ्याची सुरुवात मी केली नाही. मी कधीच कोणासोबत काही चुकीचं केलं नाही. हे लोक विनाकारण माझ्या मागे लागले आहेत”

उर्फीच्या या विधानानं आता चित्रा वाघ यांची गोची झालीये… एकंदरीतच नेटकऱ्यांकडून होणारं ट्रोलिंग, विरोधकांची टीका, भाजपकडून कुणाचीच प्रतिक्रिया न येणं आणि आचा उर्फीने ‘आत्महत्या करेन…’ असं वक्तव्य या सगळ्यावरून उर्फीचं प्रकरण हे चित्रा वाघ यांच्या अंगलटी येऊ लागलंय असं दिसतंय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.