रात्री अपरात्री धडाधड ओटीपी येतात, ते मेसेज बॉम्ब प्रकरण असतंय तरी काय..?

परवा रात्री गप गादीवर पडलेलो… झोप लागत नव्हती म्हणून कानात हेडफोन घातले आणि मोबाईलवर गाणी ऐकायला लागलो. आता थोडावेळ गाणी ऐकली आणि गाण्यांच्या मध्येच मेसेज नोटिफिकेशनचा आवाज आला. त्या आवाजामुळे गाणं डिस्टर्ब झालेलं. अगदी बिरयानी खाताना दाताखाली दाताखाली वेलदोडा आल्यावर जसं मूड ऑफ होतो तसं झालं. पण म्हणलं आता काय कुणाला रीप्लाय बिप्लाय द्यायचा नाही म्हणून फोन बघितलाच नाही आणि परत गाण्यावर फोकस केलं.

थोड्या वेळाने परत तसाच नोटिफिकेशनचा आवाज आला. मी परत इग्नोर केलं. पण धडाधड नोटीफिकेशन्सचा आवाज येत राहिला म्हणून म्हटलं कुणाचं काही काम असेल म्हणून मोबाईल बघितला… मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅपला कुणीतरी मेसेज करत असेल असं वाटलेलं.

मोबाईल बघितला आणि डोकंच चक्रावलं… हे येवढे सगळे एसएमएस आलेले. ते एसएमएस पण कसले? तर, वेगवेगळ्या साईट्सचे ओटीपी आलेले. आता येवढे ओटीपी कसले आले? हे वेगळं टेन्शन आलेलं आणि त्यात ते बँकेचे मेसेज यायचे ज्यात ‘Never Share Your OTP With Anyone’ लिहीलेलं असायचं ते आठवून वेगळं टेन्शन कारण आता हे काय आहे म्हणून कुणाला दाखवावं तर ओटीपी शेअर केल्यागत होईल.

आधी १० मिनीटं तर काहीच कळलं नाही… मग थोडा विचार केल्यावर गण्याची आठवण झाली. गण्या म्हणजे आमच्या एरीयातला टेक गुरूजी, म्हणजे अगदी एखाद्याच्या मोबाईलचं नेटवर्क गेलं की तो मोबाईल फ्लाईट मोडवर टाकून काढला की नेटवर्क दिसतं हे आम्हाला गण्यानेच शिकवलंय.

हे सगळं एसएमएसचं प्रकरण सुरू होतं रात्रीच्या १२ वाजता. म्हणून मग गण्याला फोन करावा का नको असा विचार केला खरा, पण हे एसएमएस थांबतच नव्हते म्हणून मग गण्याला फोन केला तर तो म्हणाला,

“अरे बाबा घाबरायचं काही नाही यात. अरे ते कोणी तरी तुझ्याोबत प्रँक केलेला दिसतोय. अश्या एसएमएसने काही होत नाही. याला ओटीपी बॉम्बींग असं म्हणत्यात रे… गप झोप काही होत नाही.”

आता गण्या म्हणला गप झोप म्हणून काय लगेच झोप लागणार नव्हतीच. थोड्या वेळाने हे एसएमएस पण यायचे बंद झाले पण झोप काही येतच नव्हती. मग म्हणलं हे ‘ओटीपी बॉम्बींग’ नेमकं काय असतं ते तरी बघुया.

गूगलला गेलो आणि ओटीपी बॉम्बींग असं सर्च केलं. आता माझ्यासमोर सतराशे साठ वेबसाईट्स होत्या… या वेबसाईटवर जाऊन पोरं त्यांना हवं त्याचं टेन्शन वाढवतायत.

ते कसं?

तर, त्या वेबसाईट्सपैकी कोणत्याही एका वेबसाईटवर जाऊन फक्त एखाद्या माणासाचा मोबाईल नंबर टाकायचा आणि त्यानंतर ती वेबसाईट तुम्हाला किती एसएमएस पाठवायचे आहेत तो आकडा टाकायचा आणि ओके म्हणायचं.

आता तुम्ही जो नंबर टाकला असेल त्या नंबरवर तुम्ही जितके सेट केलेत तितके एसएमएस जातात आणि ते पण ओटीपीचे एसएमएस.

हा रीसर्च करताना आणखी एक गोष्ट सापडली ती म्हणजे, कॉल बॉम्बींग.

आता हे कॉल बॉम्बींग काय असतं? तर हे सुद्धा ओटीपी बॉम्बींग सारखंच असतं. फक्त इथे तुम्ही जितक्या वेळा कॉल सेट कराल तितक्या वेळा एका रँडम नंबरवरून कॉल जात राहतो.

आता या कॉलवर पलीकडून ना कोणता माणूस बोलत असतो, ना ऑटोमेटेड आवाज असतो. फक्त कॉल असतो. त्यामुळं सारखे सारखे कॉल येतायत आणि पलीकडून कुणीच काहीच बोलत नाही म्हणून माणूस वैतागतो.

हे असं केलं आणि एखाद्या व्यक्तीने वैतागून पोलिसांमध्ये तक्रार दिली तर, काय कारवाई होऊ शकते हे जाणून घेण्यासाठी आम्ही वकील व सायबर क्राईम एक्सपर्ट असलेले गौरव जाचक यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले,

“ओटीपी बॉम्बींग केलं म्हणून गुन्हा दाखल होऊ शकत नाही. शिवाय, हे कॉल बॉम्बींग किंवा ओटीपी बॉम्बींग थांबवण्यासाठीही काही उपाय नाही. तुम्ही एक नंबर स्पॅम सेक्शन मध्ये टाकला तरी फक्त त्या नंबरवरून येणारे कॉल मेसेजेस ब्लॉक होतात, पण हे बॉम्बींग साठी रँडमली वेगवेगळे नंबर्स वापरले जातात त्यामुळे स्वत:ला यापासून वाचवण्याचाही पर्याय नसतो.”

आता ही माहिती मिळाली आणि गुन्हाही सिद्ध होत नाही म्हणून लगेच एखाद्याला त्रास द्यायला जाऊ नका… कारण, न्यायालयासाठी गुन्हा नसला तरी आपली नैतिक पातळीसुद्धा काहीतरी असते की राव.

आणि हो हे असे ओटीपी वगैरे आले तरी ते कुणासोबत शेअर करू नका, कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका आणि महत्त्वाचं म्हणजे घाबरून जाऊ नका.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.