दिवसाचं कमी अन् रात्रीचं लाईट बिल जास्त येणार…पण हा बदल नक्की कशासाठी ?

लाईट बिलाची नेहमीचीच तक्रार असते. लाईटचा वापर झाला किंवा नाही झाला तरी सरासरी बिल यायचं ते येतंच. पण याच बिलात काही दिवसांनी बदल होणार. बदल कसला तर केंद्र सरकारकडून टाइम ऑफ डे म्हणजे TOD वीज टॅरिफ लागू करण्यात येणार आहे. म्हणजेच काय तर रात्रीसाठी आणि दिवसासाठी वेगवेगळं लाईट बिल आकारण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय उर्जा मंत्री आर के सिंग यांनी दिली आहे.

नक्की बातमी काय आहे ?

केंद्र सरकार वीज वापरकर्त्यांसाठी नवीन टाइम ऑफ डे (TOD) वीज टॅरिफ लागू करणार आहे. नवीन नियमानुसार पीक अवर्स आणि सोलर अवर्स म्हणजेच दिवसा आणि रात्रीसाठी वेगवेगळं बिल आकारण्यात येईल. केंद्र सरकार लवकरच वीज ग्राहकांचे हक्क नियम २०२० मध्ये सुधारणा करणार आहे. या नवीन दर धोरणाची अंमलबजावणी झाल्यानंतर ग्राहकांना दिवसा आणि रात्रीचे वेगवेगळे वीज बिल भरावे लागणार आहे.

आर के सिंग यांच्या मते TOD दराचा नियम, पॉवर प्लांट सोबत ग्राहकांना सुद्धा फायद्याचा ठरेल.

पण हा टाइम ऑफ डे म्हणजे TOD वीज टॅरिफ म्हणजे काय? 

तर विजेच्या प्रत्येक युनिटच्या वापरासाठी मोजावी लागणारी किंमत म्हणजे टॅरिफ.

सकाळच्या वेळी विजेचा दर वेगळा असेल आणि रात्रीच्या वेळी वेगळा असेल. म्हणजे TOD वीज दर नियमानुसार, दिवसा विजेचा दर सध्याच्या दरापेक्षा २० टक्के कमी असेल आणि रात्रीच्या पीक अवर्समध्ये विजेचा दर १० ते २० टक्क्यांनी जास्त असेल. या TOD वीज टॅरिफ साठी लवकरच सरकार, वीज ग्राहकांचे हक्क नियम २०२० मध्ये बदल करेल. या नवीन नियमाच्या दराची अंमलबजावणी झाल्यावर वीज ग्राहकांना दिवसा आणि रात्री असे वेगवेगळे वीज बिल भरावे लागेल

आता रात्रीच्या झोपण्याच्या वेळेला AC किंवा कुलरचा वापर जास्त होतो. काही जण वाशिंग मशीनचा वापर रात्रीच्या वेळेला करतात या वापरकर्त्यांना या नवीन वीजबिल नियमांचा फटका बसू शकतो.  

मात्र केंद्र सरकारचा हा निर्णय घेण्यामागचं कारण काय असेल ?

वीज ग्राहक नेहमी वीज दरवाढीची तक्रार करत आले आहेत. कोरोनाच्या काळात तर बऱ्याच जणांना वीज दरवाढीचा फटका बसला होता. कारण कोळशावर चालणारी थर्मल आणि हायड्रोपॉवर प्लांट्समधून तयार होणारी वीज महागली आहे.

दुसरीकडे सौर उर्जेवर तयार होणारी वीज स्वस्त झाली आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी सौर उर्जेवर तयार होणाऱ्या विजेचा सप्लाय देशभरात केला जाईल जेणेकरून सामान्य लोकं सुद्धा सौर उर्जेचा वापर जास्तीत जास्त करतील आणि ग्राहकांना २० टक्के कमी दराचा लाभ घेता येईल.  यामुळे कोळशापासून वीजनिर्मिती करणाऱ्या केंद्रांकडून विजेची मागणी कमी होईल आणि फक्त रात्रीसाठी या विजेचा वापर होईल.

पण रात्रीच्या वेळी मात्र वीजदर १० ते २० टक्क्याने वाढतील. या सर्व गोष्टींचा ताळमेळ बांधून ग्राहकांना विजेच्या वापरात कमी जास्त बदल करता येईल. सोबतच दोन्ही वेळेच्या वीज वापरांमध्ये समतोल ठेऊन वीज टॅरिफ कमी करता येईल.

TOD वीज दरवाढीचा नियम १ एप्रिल २०२४ पासून लागू करण्यात येणार आहे.

ज्या वीज ग्राहकांचा विजेचा वापर दहा किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त होत असेल फक्त त्यांच्यासाठी १ एप्रिल २०२४ पासून TOD दर लागू होतील. ज्या वीज ग्राहकांचा वीज वापर १० किलोवॅट पेक्षा कमी होत असेल त्या वीज ग्राहकांना TOD वीज दर १ एप्रिल २०२५ पासून लागू होईल.

पण या सगळ्या वीजदर बदलासाठी आताच्या मीटरचा काही उपयोग नसेल.

कारण दिवसा सौर उर्जेमधून होणारा वीज वापर तसच रात्री थर्मल आणि हायड्रो पॉवरने तयार झालेल्या विजेचा वापर, या दोघांचे वेगळे मोजणी ठेवण्यासाठी मीटर सुद्धा स्मार्ट लागणार त्यामुळे स्मार्ट मीटरिंग पद्धत सुद्धा यासाठी गरजेची आहे. स्मार्ट मीटरिंग शिवाय TOD दर लागू करता येणार नाहीत. आता या स्मार्ट मीटरिंगचा वापर सुद्धा सरकारने साधा सरळ ठेवला आहे. दिवसातून एकदातरी स्मार्ट मीटरचं रीडिंग होईल. हे रीडिंग प्रत्यक्ष मीटर पाहून करण्याची आवश्यकता नाही तर मीटरवरील डेटा वीज ग्राहकांसोबत शेअर केला जाईल.

यामुळे काय होईल कि, वीज ग्राहकांना आपण दिवसभरात किती वीज वापरतोय आणि रात्री किती वापरतोय याचा अंदाज येईल आणि त्या हिशोबाने ग्राहक विजेचा वापर कमी जास्त करू शकतील.

त्याचबरोबर जर ग्राहकांकडून मंजूर मर्यादेपेक्षा जास्त वीज युनिट्स चा वापर होत असेल तर आकारला जाणारा दंड सुद्धा कमी करण्यात येणार आहे. जर एका आर्थिक वर्षात मंजूर युनिट्सची मर्यादा कमीत कमी तीन वेळा ओलांडली गेली असेल तरच जास्तीचा वीजदर लागू होईल.

आता या TOD वीज टॅरिफ चा इफेक्ट कोणावर किती होईल?

तर २४ तास चालणाऱ्या औद्योगिक कारखान्यांवर किंवा ऑफिसवर याचा फारसा परिणाम होणार नाही कारण अशा ठिकाणी सकाळी आणि रात्री अशा दोन्ही वेळेला सारखी वीज वापरली जाते. नोकरदार आणि सामान्य माणसाला याचा फायदा होऊ शकतो.

शेतकऱ्यांकडून शेतीसाठी विजेचा वापर हा रात्रीच्या वेळातच जास्त होत असतो. कारण दिवभरात शेतकऱ्यांना सिंगल फेजची वीज उपलब्ध असते आणि रात्रीच्या वेळात थ्री फेजवर वीज मिळते. त्यामुळे शेती पंप रात्री चालवले जातात.

मात्र ऊर्जा मंत्रालयाच्या निर्णयानुसार नवीन वीजबिलाचे नियम शेतकरी वर्गाला लागू होणार नाहीत. 

ऊर्जा मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की १ एप्रिल २०२४ पासून १० किलोवॅट्‌स किंवा त्याहून अधिक वापरणाऱ्या व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी टाइम ऑफ डे दर लागू होईल आणि १ एप्रिल २०२५ पासून, कृषी क्षेत्रातील ग्राहक वगळता, सर्व वीज ग्राहकांसाठी त्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक असेल.

हे ही वाच भिडू:

 

 

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.