आजकालचा नाही….उद्धव Vs नारायण राणेंचा संघर्षाचा इतिहास खूप जुना आहे

काल लोकसभेत खासदार श्रीकांत शिंदेंनी भाषण करताना ठाकरे गटावर, ठाकरेंवर आणि त्यांच्या हिंदुत्वावर टीका केली. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत उभे राहिले, “काहींनी आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत. हिंदुत्वावर भाष्य करणाऱ्यांचा जन्म केव्हा झाला? हिंदुत्वात पळपुटे असू शकत नाहीत” असं सावंत त्यांच्या भाषणात म्हणाले.

लोकभेत कालचा दिवस गाजला तो ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत विरुद्ध नारायण राणेंच्या भांडणामुळं.

झालं असं कि, खासदार श्रीकांत शिंदेंनी भाषण करताना ठाकरे गटावर, ठाकरेंच्या हिंदुत्वावर टीका केली. त्यानंतर खासदार अरविंद सावंत उभे राहिले, “काहींनी आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत. हिंदुत्वावर भाष्य करणाऱ्यांचा जन्म केव्हा झाला? हिंदुत्वात पळपुटे असू शकत नाहीत” असं सावंत त्यांच्या भाषणात म्हणाले.

अरविंद सावंतांच्या भाषणानंतर नारायण राणे बोलायला उभे राहिले. राणेंनी म्हटलं, “अरविंद सावंत यांनी ठाकरे गटाच्या हिंदुत्वाबाबत भाष्य केलं. हिंदुत्वाबाबत एवढा गर्व होता, तर २०१९ साली भाजपाशी गद्दारी करून शरद पवार यांच्याबरोबर युती का केली? तेव्हा हिंदुत्व लक्षात नाही आलं. मी १९६६ पासूनचा शिवसैनिक आहे. मी शिवसेना सोडल्यावर २२० लोकांनी संरक्षण घेतलं होतं. आता जो आवाज येतोय तो मांजराचा आहे. वाघाचा आवाज नाही आहे असं म्हणताच अरविंद सावंत यांच्याकडून आवाज करण्यात आला तेंव्हा पीठासीन अध्यक्ष वारंवार सांगत होते डोन्ट बी पर्सनल राणेजी, वैयक्तिक टिप्पणीसे बचिये..तरीही नारायण राणे आक्रमक होत अरविंद सावंतांना म्हणाले “अरे बैठ, नीचे बैठ… हमारे पीएम पर अभी कोई सवाल नहीं उठा सकते हैं. उनकी औकात नहीं है. अगर कोई पीएम मोदी और अमित शाह पर उंगली उठाएगा तो तुम्हारी मैं औकात निकालूंगा” अशा पद्धतीने मधल्या काही काळात शांत असलेले नारायण राणे शिवसेनाविरोधात पुन्हा आक्रमक झालेले आहेत…

बरं हा संघर्ष लोकसभेच्या सभागृहापुरताच मर्यादित नाहीये तर राणेंचा शिवसेनेसोबतच संघर्ष जुनाच आहे.  या संघर्षाला नारायण राणे-उद्धव ठाकरे यांच्या वैयक्तिक वादाची किनार देखील आहे.  या संघर्षात कधी ठाकरेंनी राणेंना टार्गेट केलं तर कधी राणेंनी ठाकरेंना टार्गेट केलं.

थोडक्यात या राणे -सेना संघर्षाचा इतिहास काय आहे ? 

नारायण राणेंना उद्धव ठाकरेंचा इतका राग का आहे प्रश्न स्वाभाविकच पडतो. त्यामुळे या संघर्षात ठाकरे-राणे यांच्यात कसं बिघडत गेलं ? हे जाणून घेताना आपल्याला इतिहासात जावं लागतं.

काही जुन्या संदर्भावरुन आपल्या लक्षात येतं की १९९७ च्या आसपास उद्धव ठाकरेंची शिवसेनेच्या सक्रिय राजकारणात एन्ट्री झाली. तर दुसऱ्या बाजूला याच काळात नारायण राणे शिवसेनेत एक फायर ब्रॅन्ड नेते म्हणून उदयास आले होते. शाखाप्रमुख, नगरसेवक, तीन वर्षे बेस्ट समितीचे अध्यक्षपद आणि मंत्रीपद असा चढत्या आलेखाप्रमाणे प्रवास करत त्यांची मुख्यमंत्री पदाकडे वाटचाल सुरु होती.

मात्र त्याच्या आधीपासूनच शिवसेनेत उघडपणे दोन गट पडले होते. एकीकडे उद्धव ठाकरे, मनोहर जोशी आणि सुभाष देसाई होते. तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे, नारायण राणे आणि स्मिता ठाकरे होते.

उद्धव ठाकरेंनी सक्रिय राजकारणात आले तेंव्हा युती सरकारमध्ये नारायण राणे महसूलमंत्री होते. नंतर १९९९ मध्ये राणे मुख्यमंत्री झाले. पण राणेंना मुख्यमंत्री बनवणं हे उद्धव यांना फारसं रुचलं नसल्याचं सांगितलं जातं. त्याच वर्षी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये शिवसेनेचं एक शिबीर झालं होतं. त्यावेळी तिथं मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते.

तेव्हा उद्धव पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले होते, मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल. यावरूनच दोघांमधल्या अस्वस्थतेला सुरुवात झाली.

त्यानंतर १९९९ च्या निवडणुकीमध्ये सेना-भाजप युतीचा झालेला पराभव उद्धव ठाकरे अणि नारायण राणे यांच्यातील संघर्षाची अधिकृत ठिणगी मानली जाते. १९९९ साली उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांची नावं आम्हाला अंधारात ठेवून परस्पर बदलली असा आरोप करत नारायण राणे यांनी आपल्या ‘No Holds Barred – My Years in Politics’ आत्मचरित्रात या पराभवाचं खापर उद्धव ठाकरेंवर फोडलं.

मात्र यानंतरच्या काळात पुढे देखील अनेक प्रसंगांमध्ये नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष दिसून आला होता. यात मग २००२ साली विलासराव देशमुखांचं सरकार पाडण्याची फसलेली योजना असेल किंवा, २००३ मधील महाबळेश्वर अधिवेशनात झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या निवडीला राणेंनी केलेला विरोध असेल.

उद्धव यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राणेंचा असंतोष पहिल्यांदा उफाळून बाहेर आला होता तो एप्रिल २००५ मध्ये.

शिवसेनेच्या काही प्रमुख नेत्यांसोबत बंद दाराआड झालेल्या बैठकीत राणेंनी उद्धव ठाकरेंवर पैसे देऊन शिवसेनेत पदं दिली जात आहेत असा आरोप केला होता. राणेंच्या या आरोपानंतर बाळासाहेब स्वत: बैठकीत उपस्थित झाले आणि “तुमच्याकडे कोणी पैसे मागितले का? उद्धव आणि राजने पैसे मागितले असतील आणि ते सिद्ध झालं तर मी त्यांना सेनेत ठेवणार नाही, मी पैसे घेतले अस सिद्ध झालं तर मी स्वत: राजीनामा देईल,” असं बाळासाहेब म्हणाले होते.

जसजसं उद्धव ठाकरेंचं शिवसेनेतलं वर्चस्व वाढू लागलं, तसा राणेंचा असंतोष उफाळू लागला आणि या असंतोषाने टोक गाठलं ते २००५ मध्ये. जुलै २००५ मध्ये नारायण राणेंनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेत शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला. आणि १० आमदारांना घेऊन बंडखोरी केली आणि पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

मात्र त्याआधी त्यांनी बाळासाहेबांना एक पत्र लिहीत आपण राजकारणातून संन्यास घेत असल्याचं सांगितलं होतं, तेंव्हा बाळासाहेबांनी राणेंची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा राणेंचा निर्णय बदलण्याची पूर्ण शक्यता होती. याबाबत नारायण राणे सांगतात, ”बाळासाहेबांनी त्यावेळी माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा हे उद्धवना समजलं; तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीसह मातोश्री सोडून जाण्याची धमकी दिली. या धमकीमुळं बाळासाहेबांना माझं मन वळवण्याचा प्रयत्न सोडावा लागला होता. शेवटी राणेंनी शिवसेना सोडली, पुढे ते काँग्रेसमध्ये गेले.

पण शिवसेना सोडूनही राणेंचा शिवसेनेसोबतचा संघर्ष काही थांबला नव्हता…

शिवसेना सोडली आणि राणेंनी राजीनामा दिल्यानं मालवणमध्ये पोटनिवडणूक लागली होती. सेनेनं ठरवलं होतं, की काहीही झालं, तरी राणेंना पाडायचं. गद्दारीला सेनेत माफी नाही असं म्हटलं जायचं. याची सगळी सूत्रं स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या हातात घेतली, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीही आपली ताकद लावली. बाळासाहेबांनी नारायण राणे यांचा पराभव हा प्रतिष्ठेचा विषय केला होता. सेनेचे सगळे रथी महारथी सिंधुदुर्गला रवाना केले. मुंबईहून आलेल्या कित्येक शिवसैनिकांनी मतदारसंघातच तळ ठोकला. घरोघरी जाऊन प्रचार सुरु झाला. बाळासाहेब ठाकरेंची भावनिक प्रचारसभा झालेली पण तरीही नारायण राणे पोटनिवडणुकीत जिंकले होते.

हेच नाही तर नारायण राणेंना कोंबडी चोर म्हणायला सुरुवात झाली ती शिवसेनेतूनचं. बाळासाहेब ठाकरेंनी नारायण राणेंची संभावना कोंबडीचोर म्हणून केली. राणेंच्या पक्षफुटीनंतर बाळासाहेबांनी रंगशारदा सभागृहात सभा घेतली होती. तेव्हा सभेतल्या भाषणात त्यांनी राणेंनी गद्दारी केली म्हणून यथेच्छ धुलाई केली होती. “या कोंबडीचोराला मुख्यमंत्री करून माझी चूकच झाली” असं स्टेटमेंट केलं तेव्हापासून शिवसैनिकांनी नारायण राणे यांना कोंबडीचोर म्हणायला सुरवात केली. पण राणेंनी बाळासाहेबांवर पलटवार केला नाही. बाळासाहेबांचे उपकार कधीही विसरणार नाही असं सांगत ते आपल्या पक्ष सोडण्याचं दूषण उद्धव ठाकरेंना देत राहिले.

सेनेपासून दुरावल्यानंतर राणे कॉंग्रेसमध्येही अस्वस्थ होते. मुख्यमंत्री पद उपभोगलेल्या नारायण राणेंना काँग्रेसमध्ये आल्या आल्या मुख्यमंत्री पद हवं होतं. त्यावेळी काँग्रेस नेते अहमद पटेलांनी राणेंना काही काळ द्या मग मुख्यमंत्री करतो असं ४ वेळा आश्वासन दिलं. पण राणेंना काय मुख्यमंत्रीपदाचा चान्स मिळाला नाही..त्यातच २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत आपला मुलगा नीलेश राणेंच्या पराभवानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. पुढे २०१४ मध्ये आपल्याच बालेकिल्ला कुडाळमधून नारायण राणे हरले होते जिथेवून ते सलग सहावेळा निवडून आले होते मात्र त्यात त्यांचा धक्कादायक पराभव झाला होता. ग त्यांनी मुंबईतून निवडणूक लढवली, २०१५ च्या पोटनिवडणूकीत त्यांनी वांद्रे मतदारसंघातून निवडणूक लढवली. तेव्हा त्यांचा पराभव झालेला. सलग दुसऱ्या पराभवामुळं त्यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. अखेर कॉंग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून राणेंनी बाहेर पडत २०१७ मध्ये स्वतःचा पक्ष स्थापन केला.

नंतर २०१९ मध्ये शिवसेना -भाजप युती तुटली. नेमकं याच वर्षात राणेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आपला स्वाभिमानी पक्षही विलीन केला. सेना- भाजप युती तुटली तेंव्हापासून या बिघडलेल्या समीकरणात राणे ठाकरेंना डॅमेज करत आलेत..

कसे ? तर युती तुटल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मात्र या काळात राणेंनी ठाकरे सरकारला थेट चॅलेंज देणं, टीका करणं, अंगावर घेण्याचं धाडसं त्यांनी अनेक वेळा दाखवलं आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद देण्यात आलं. त्यामुळे केंद्रातुन शिवसेनेला शह देण्यासाठी राणे हा चांगला पर्याय म्हणून त्यांना ताकद देण्यात आली.

या दरम्यान या संघर्षाचा एक अंक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना २०२१ च्या ऑगस्टमध्ये घडला.

त्यांनी २०२१ मध्ये काढलेल्या जनआशीर्वाद यात्रे दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप केले. तसेच शिवसेना-भाजप युती न टिकवून ठाकरेंनी सत्तेसाठी शिवसेना राष्ट्रवादी-काँग्रेसशी हात मिळवला,  शिवसेना म्हणजे लाचारीची शिवसेना झाली अशी टीका केलेली. मातोश्रीचे २ बंगले झाले पण शिवसैनिक बेरोजगार आहेत, शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांना केवळ सही पुरतं ठेवलं आहे. मातोश्रीच्या आदेशाशिवाय एकही सही करु शकत नाही. ते शिवसेनेत कंटाळले असे विधानं त्यांनी केलेले.

इतकंच नाही तर २०२१ च्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरेंनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष हे शब्द वापरण्याऐवजी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. त्या नंतर त्यांनी चूक सुधारली. मात्र त्यावरून राणेंनी माध्यांमासमोर “अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,” असं वक्तव्य केलं होतं, त्यावरून वाद निर्माण झाला. शिवसैनिकांनी जुना मुद्दा उकरून काढत मुंबईतल्या काही भागात ‘कोंबडी चोर’चे पोस्टर लावले होते. दरम्यान केंद्रीय मंत्री पदावर असणाऱ्या नारायण राणेंना अटकही करण्यात आली होती त्यामुळे ठाकरे विरुद्ध राणे संघर्ष आणखीच चिघळला.

याच संघर्षात ठाकरेंना डॅमेज करण्याच्या प्रयत्नात नारायण राणेंच्या मुलांचाही सहभाग दिसून आला..

यासाठी सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सॅलियन प्रकरणाचं निमित्त मिळालं. या प्रकरणात सहभागी असल्याचे आरोप आदित्य ठाकरेंवर होत आलेत आणि या आरोपांची सुरुवात आमदार नितेश राणे यांनी केली. नितेश राणे आणि नारायण राणेंनी ऑगस्ट २०२० आणि नोव्हेंबर २०२१ मध्ये पत्रकार परिषद घेऊन यात मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहेत, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय असे आरोप केले होते. या आरोपांमुळे आदित्य ठाकरेंचं नाव वारंवार चर्चेत येऊ लागलं, ठाकरेंच्या भोवती शंकेचं वातावरण निर्माण होईल असे अनेक आरोप केले त्यामुळं यात आदित्य ठाकरेंच्या करिअरलाच सेटबॅक बसतो कि काय असा प्रश्न निर्माण झाला होता मात्र कुठल्याच तपास यंत्रणांकडून आदित्य ठाकरेंचं नाव आजवर पुढं आलं नाही. हेच नाही तर कोरोना काळातही आरोग्य संकटावरून राणे पिता-पुत्रांनी ठाकरे कुटुंबावर आरोप करण्याची एकही संधी सोडली नव्हती.

थोडक्यात राणे जेंव्हा शिवसेनेत होते तेंव्हाही उद्धव ठाकरे विरुद्ध राणे हा संघर्ष होता. मग राणे काँग्रेसमध्ये गेले तेंव्हाही हा संघर्ष होता. मग त्यांनी काँग्रेस सोडून स्वतःचा स्वाभिमानी पक्ष काढला. मग भाजपमध्ये प्रवेश केला, केंद्रात मंत्री झाले तरीही नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष तसुभरही कमी झाला नाही. उलट तो संघर्ष वाढतचं गेल्याचं आपल्याला बघायला मिळालंय.

हे हि वाच भिडू :

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.