जेव्हा पेट्रोल, डिझेलच्या महागाईमुळे अटलजी बैलगाडीतून संसदेत गेले होते…

उद्धव ठाकरेंची मुंबई येथे सभा सुरू आहे. या सभेदरम्यान उद्धव ठाकरेंनी अटलबिहारी वाजपेयी पेट्रोल दरवाढी विरोधात बैलगाडीतून संसदेत गेले असल्याचा संदर्भ दिला, खरच अस झालं होतं का…

तर हो, तारिख होती १२ नोव्हेंबर १९७३.

इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या आणि अटल बिहारी वाजपेयी विरोधी पक्षातील जनसंघाचे प्रमुख नेते.

जगभरात तेल निर्यात करणाऱ्या देशांची संघटना असणाऱ्या ‘ओपेक’ या संघटनेने जगभरातील तेलाचा पुरवठा  कमी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा फटका अर्थातच भारताला देखील बसला होता. कारण इंधनासाठी भारत पूर्णतः मध्य-पूर्वेतील देशांवर अवलंबून आहे. मध्य-पूर्वेतून होणारा तेलाचा पुरवठा कमी झाल्याने भारताला अभूतपूर्व तेल संकटाचा सामना करावा लागत  होता.

इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तेलांच्या किमतीमध्ये जवळपास ८० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला होता. याविरोधात विरोधी पक्षांनी जोरदार आंदोलन केलं. सरकारविरोधी जनमत तयार करण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षांसाठी ही एक आयातीचं संधी चालून आली होती.

नोव्हेंबर १९७३ मध्ये संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार होतं.

या अधिवेशनात तेलांच्या वाढत्या किमतीवरून सरकारला धारेवर धरण्याची विरोधकांची व्यूहरचना होती. हा विरोध करण्यासाठी काहीतरी प्रतीकात्मक मार्ग निवडावा असा विचार करत असतानाच एक भन्नाट कल्पना समोर आली.

त्या कल्पनेचाच परिपाक म्हणजे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जनसंघाचे प्रमुख नेते अटल बिहारी वाजपेयी आपल्या अन्य दोन साथीदारांसह चक्क बैलगाडीतून संसदेत पोहचले. शिवाय अन्य काही खासदार सायकलवरून संसदेत पोहचले.

इंधन तेलाच्या भाववाढीचा विरोध करण्यासाठी विरोधकांनी निवडलेल्या या भन्नाट कल्पनेची दखल  जागतिक स्तरावर घेतली गेली. ‘न्यूयॉर्क टाईम्स’ या दैनिकाने यासंबंधीचे सविस्तर वृत्त छापले.

आजही जेव्हा जेव्हा पेट्रोलची भाववाढ होते तेव्हा या पन्नास वर्षांपूर्वीचा झालेल्या आंदोलनाचा उल्लेख होतोच. तेव्हाचे राज्यकर्ते आता विरोधक बनले आहेत. त्याकाळचे विरोधक आता राज्यकर्ते बनले आहेत. अस त्यावरून सत्तेतील लोकांना टोमणे खावे लागत आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.