दिल्लीवर देखील पकड ठेवणाऱ्या शिंदे घराण्याचा इतिहास बंडखोरीचा आहे.

ग्वाल्हेरचे शिंदे म्हणजे मराठेशाहीतील महत्वाच सरदार घराण. एकेकाळी दिल्लीची पातशाही यांच्या इशाऱ्यावर चालायची. ब्रिटीशांच्या राज्यातही शिंदेना २१ तोफांचा मान होता. स्वातंत्र्यानंतर ग्वाल्हेर संस्थान विलीन झालं मात्र तिथल्या जनतेच्या हृदयावर मात्र शिंदेच राज्य कायम राहिलं.

ग्वाल्हेरचे राजे जिवाजीराव शिंदेनी इतर संस्थानांना एकत्र घेऊन मध्यभारत या स्वतंत्र राज्याची निर्मिती केली होती.

ते या राज्याचे पहिले राज्यप्रमुख देखील होते. पुढे हे राज्य मध्यप्रदेशमध्ये विलीन करण्यात आलं. त्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या पत्नी महाराणी विजयाराजे शिंदे राजकारणात आल्या.

ग्वाल्हेर लोकसभेच कॉंग्रेस कडून त्यांना तिकीट मिळालं. विजयाराजे शिंदे खासदार बनल्या. पण पुढच्या पाचच वर्षात त्यांनी इंदिरा गांधींच्या संस्थानिका विरोधातील धोरणांचा निषेध म्हणून कॉंग्रेसला रामराम ठोकला आणि  स्वतंत्रता पार्टी मध्ये प्रवेश केला. त्या पक्षाकडून त्यांनी गुणा येथे लोकसभा निवडणूक लढवली.

मात्र काहीच वर्षात अटलबिहारी वाजपेयीं यांच्या आग्रहामुळे त्या जनसंघ या पक्षात आल्या.

अटलबिहारी वाजपेयीं यांचा जन्म ग्वाल्हेरचा. त्यांच्या कुटुंबाचे शिंदे राजघराण्याशी चांगले संबंध होते. वाजपेयींच्या शिक्षणासाठी जिवाजीराव शिंदेनी ७५ रुपयांची स्कॉलरशिपसुद्धा दिली होती. यामुळे त्यांच्या मनात ग्वाल्हेर संस्थान प्रति आदरभाव होता.

१९७१ साली इंदिरा गांधींच्या लाटेतही विजयाराजेंनी वाजपेयींना ग्वाल्हेरमधून आणि शेजारच्या गुणा मधून आपल्या मुलाला म्हणजेच माधवराव शिंदेना निवडून आणलं.

ग्वाल्हेरच्या राजकारणात त्यांच्या तरुण राजाचा उदय झाला होता. 

विजयाराजे आणि जिवाजीराव शिंदे यांच्या पाच संतानापैकी एकुलता एक मुलगा म्हणजे माधवराव. त्यांचं शिक्षण इंग्लंडला झाल. ते क्रिकेट चांगलं खेळायचे. यातूनच मैत्री झालेल्या नवाब टायगर पतौडी यांनी त्यांना सल्ला दिला की ग्रज्यूएशन ऑक्सफर्ड विद्यापीठातून पूर्ण कर.

परदेशात शिकून आलेल्या माधवराव शिंदेंचे विचार देखील पुरोगामित्वाकडे झुकलेले होते. त्यांचे आईच्या पक्षात मन रमत नव्हते. काही वेळा त्यांनी जनसंघ सोडण्याचा विचार बोलून दाखवला मात्र विजयाराजेंनी त्यांना या पासून परावृत्त केले.

अशातच इंदिरा गांधीनी देशभरात आणीबाणी जाहीर केली. देशभरात अनेक निर्बंध लादले गेले.

सगळी सत्ता इंदिरा गांधीच्या सल्लागारांच्या हातात एकवटली होती. याला विरोध करणाऱ्या नेत्यांची धरपकड सुरु झाली. यात बरेचसे जनसंघाचे नेते कार्यकर्ते होते. विजयाराजेंवर देखील कारवाई झाली. त्यांना तिहार जेल मध्ये टाकण्यात आलं होतं.

पण माधवराव शिंदे अटक टाळण्यासाठी भारतातून पळाले. त्यांनी आपल्या आजोळी नेपाळला आसरा घेतला. तिथून ते इंग्लंडला गेले. या निर्णयाबद्दल ते म्हणायचे,

“जो गुन्हा मी केलेलाच नाही त्याबद्दल शिक्षा का भोगायची?” 

काही वर्षांनी ते परत आले ते जनसंघाचा राजीनामा देऊनच. १९८० साली जेव्हा विजयाराजे इंदिरा गांधींविरुद्ध निवडणूक रायबरेली मधून निवडणूक लढवत होत्या तेव्हा माधवराव शिंदे आपल्या आईच्या विचारसरणीविरोधात कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विजयाराजे निवडणुकीत पडल्या मात्र माधवराव गुणा मधून निवडून आले.

इथूनच माय लेकरांच्या वादाला सुरवात झाली होती. याला कारणीभूत होते विजयाराजेंचे एक सहकारी “संभाजीराव आंग्रे”

संभाजीराव आंग्रे हे जिवाजीराजे शिंदेंचे नातलग, शिंदे घराण्याच्या मनसबदारापैकी एक. जिवाजीरावांच्या मृत्यू नंतर त्यांनी विजया राजेंची सावलीप्रमाणे साथ दिली. ते त्यांचे प्रमुख सल्लागार देखील होते. ते म्हणायचे,

“आणिबाणीत अटक होईल म्हणून घाबरून माधवराव शिंदे पळून गेले आणि कॉंग्रेसपक्षाच्या वळचणीला गेले.”

माधवराव शिंदेनी विजयाराजेंवर आरोप केला की त्या आंग्रेंच्या प्रभावाखाली येऊन निर्णय घेतात. तर विजया राजेंच म्हणण होत की माधवरावांची पत्नी त्यांना आपल्या आईविरुद्ध भडकवत आहे.

विजया राजेंनी माधवराव शिंदे की संभाजीराव आंग्रे या भांडणात आंग्रेवर विश्वास दाखवला. त्या म्हणत होत्या,

“माझ्या पतीची वाईट काळात साथ देणाऱ्या व्यक्तीची साथ मी कशी सोडू?”

ही शिंदे राजघराण्यातील भांडणे राष्ट्रपातळीवरचा विषय ठरली.

ग्वाल्हेरच्या राजवाड्यातील फर्निचर हलवण्यावरून वाद सुरु झाले ते वाद शिंदेंच्या प्रॉपर्टीपर्यंत जाऊन पोहचले. आपला मुलगा राजवाड्यातील किल्ल्या देत नाही म्हणून राजमाता विजयाराजे उपोषणावर गेल्या. हे प्रकरण चिघळले.

त्यातच विजया राजेंनी राजवाड्याचा काही भाग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत एका संस्थेला देऊन टाकला. माधवराव शिंदेंच्या समर्थकांनी राजमाता आणि त्यांचे सल्लागार संभाजीराव आंग्रे इंग्लंड दौर्यावर गेले आहेत तो मौका साधून राजवाड्यावर हल्ला केला आणि तो ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.

अखेर कोर्टाने त्यांच्या कोट्यावधीच्या मालमत्तेवर सील घालण्याचा निर्णय घेतला.

विजयाराजे शिंदेनी भारतीय जनता पक्षाच्या निर्मितीसाठी प्रमुख भूमिका बजावली. सुरवातीच्या काळात हा नवा पक्ष पक्षनिधीसाठी त्यांच्यावरच अवलंबून होता. त्यांच्या भरवशावरच अटलजीनी १९८४ची लोकसभा निवडणूक ग्वाल्हेरमधून लढवायचा निर्णय घेतला.

पण राजीव गांधींच्या आग्रहामुळे माधवराव शिंदे त्यांच्या विरोधात उभे राहिले आणि अटलजींचा मोठा पराभव झाला.

याच विजयामुळे माधवराव शिंदेंचा राजीव गांधींच्या खास सहकाऱ्यांमध्ये समावेश झाला. दोघेही तरुण होते. तंत्रज्ञानाची दोघानाही आवड होती. राजीव गांधीनी आपल्या मंत्रीमंडळात त्यांच्या कडे रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी दिली. माधवराव शिंदेनी तो समर्थपणे सांभाळला. रेल्वेच संगणकीकरण याच काळात सुरु झाले.

मध्यप्रदेशच नाही तर संपूर्ण भारतात माधवराव शिंदेंचा दबदबा सुरु झाला. 

पण जुन्या कॉंग्रेसच्या नेत्यांना हे सहन झाले नाही. जेव्हा माधवराव शिंदेना मुख्यमंत्री होण्याची संधी चालून आली तेव्हा फक्त त्यांना टाळायसाठी मोतीलाल व्होरा या जेष्ठ नेत्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं.

राजीव गांधी यांच्यावर विश्वास ठेवून माधवरावांनी पाठीमागे थांबण्याचा निर्णय घेतला.

पण दुर्दैवाने राजीव गांधींचा मृत्यू झाला.  पीव्ही नरसिंह राव यांच्या मंत्रीमंडळात ते नागरीविमान वाहतूक मंत्री आणि मनुष्यबळ संशोधन विकास मंत्री बनले. सीताराम केसरी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष बनल्यावर त्यांच्यात कुरबुरी सुरु झाल्या व त्यांनी पक्ष सोडला. सोनिया गांधीना राजकारणात आणण्यासाठी त्यांनीच भरपूर प्रयत्न केले. ते काही वर्षे बीसीसीआयचे अध्यक्ष देखील राहिले.

विजयाराजे देखील भाजपमध्ये उपाध्यक्ष पदापर्यंत पोहचल्या होत्या. तिथल्या निर्णयप्रक्रियेत त्यांचा शब्द महत्वाचा मानला जात असे. अस म्हणतात की रामजन्मभूमीचे आंदोलन विजयाराजे शिंदे यांची कल्पना होती. कट्टर हिंदुत्वावर त्यांची अढळ श्रद्धा होतु.

इतक्या वर्षातही ग्वाल्हेरचे राजे माधवराव शिंदे आणि राजमाता विजयाराजे यांच्यातील वाद मिटले नाहीत.  

दोघे वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढवत असत. दोघांनी एकमेकांशी अबोला धरला होता. तो शेवटपर्यंत मिटलाच नाही. विजयाराजेंनी तर आपल्या मृत्यूनंतर माधवराव शिंदेना कोणताही विधी करायची परवानगी देऊ नका अस सांगितल होते

विजयाराजेंनी १९९८ नंतर राजकारणातून निवृत्ती घेतली. त्यांची जागा त्यांच्या मुलीनी घेतली होती. वसुंधरा राजे राजस्थानच्या राजकारणात नाव कमवत होत्याच, यशोधरा राजेंनी ग्वाल्हेरमधून निवडणूक लढवण्यास सुरवात केली. वसुंधरा राजेंनी पुढे राजस्थानचा मुख्यमंत्रीपदी जाण्याची दोन वेळा किमया करून दाखवली.

२००१ साली विजयाराजेंचा मृत्यू झाला. त्याच वर्षी दुर्दैवाने माधवराव शिंदेंचा विमान अपघातात मृत्यू झाला.

हा अपघात झाला नसता तर काही वर्षांनी कॉंग्रेस सरकार आल्यावर ते पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार असते. त्यांच्या अकाली निधनाने मध्यप्रदेशमध्ये कॉंग्रेसला खूप मोठा धक्का बसला. त्यांच्या जागी त्यांचे सुपुत्र ज्योतिरादित्य यांचं आगमन झालं.

इतके वर्ष ते राहुल गांधींचे सर्वात जवळचे शिलेदार म्हणून ओळखले जायचे. मनमोहन सिंग यांच्या मंत्रीमंडळातदेखील त्यांना स्थान होते. प्रियांका गांधीनी केलेल्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते सोबत होते.

कॉंग्रेसच्या पक्षाध्यक्ष पदासाठी देखील ज्योतिरादित्य शिंदेंच नाव चर्चेत होतं.

मात्र गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना कॉंग्रेसने मुख्यमंत्रीपद दिले नाही. आणि लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर तर त्यांना साईडलाईन करण्यास सुरवात झाली. तिकडे भाजपमध्ये देखील वसुंधरा राजे आपलं सरकार गमावून बसल्या होत्या.

एकेकाळी सर्व शक्तिमान असणाऱ्या शिंदे घराण्याला संपवण्याचा स्वपक्षीयांकडून प्रयत्न करण्यात येत होता.

एवढे दिवस ज्योतिरादित्य शिंदेनी दाखवलेला संयमाचा बांध आज तुटला आणि त्यांनी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. शिंदे घराण्याचा इतिहास लढाईचा आहे, बंडखोरीचा आहे. ज्योतिरादित्य शिंदे आपल्या सर्व संकटावर मात करून नव्याने उभारी घेतील हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.