भाजपमधून कॉंग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांनी युतीचे ११ खासदार पाडून दाखवले..

सध्या तामिळनाडूचे राज्यपाल असणारे बनवारीलाल पुरोहित म्हणजे राजकारणाचे अनेक उन्हाळे पावसाळे अनुभवलेलं व्यक्तिमत्व. फक्त उन्हाळे पावसाळे नाहीत तर त्यांनी अनेक पक्षात जाऊन तिथलं राजकारण जवळून पाहिलं.

ते जन्मले राजस्थानमध्ये मात्र त्यांची कर्मभूमी नागपूर होती. इथे प्रसिद्ध होणारा एकेकाळी गोपाळ कृष्ण गोखले यांनी सुरु केलेला हितवाद हा वर्तमानपत्र आजही पुरोहितांच्या मालकीचा आहे.

त्यांची राजकीय सुरवात मात्र काँग्रेस पासून झाली. विद्यार्थी दशेपासून काँग्रेसमध्ये सक्रिय होते. आणीबाणी नंतर काँग्रेस फुटली तेव्हा ते इंदिरा गांधींच्या सोबत राहिले. १९७८ साली त्यांना आमदारकीचं तिकीट मिळालं. नागपूरमधून दोन वेळा ते आमदार बनले. महाराष्ट्राचे राज्यमंत्रिपद देखील भूषवायला मिळालं.

पुढे खासदारकी लढवली त्यात देखील दोन वेळा विजय मिळवला. विदर्भाच्या राजकारणात बनवारीलाल पुरोहित यांनी चांगलाच जम बसवला होता.

अशातच १९९१ साली त्यांनी अचानक राम मंदिराच्या प्रश्नावर काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यावेळची लोकसभा त्यांनी भाजप कडून लढवली. नेमकं त्यांच्या मतदारसंघात मतदान राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर झालं आणि सहानुभूतीच्या लाटेत त्यांचा धुव्वा उडाला.

बनवारीलाल पुरोहित यांनी पहिलाच पराभव. याचा वचपा पुरोहित यांनी पुढच्या निवडणुकीत काढला. १९९६ साली काँग्रेसच्या कुंदा विजयकर यांना हरवून ते भाजपचे खासदार बनले.

काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले बनवारीलाल पुरोहित तिथे जास्त रमले नाहीत. भद्रावतीच्या आयुध निर्माणीजवळ खासगी कंपनीला कोळसा खाण देण्यावरून त्यांचा थेट वाजपेयी यांच्याशी वाद झाला.

प्रमोद महाजन यांच्याशी पंगा घेऊन बनवारीलाल पुरोहित यांनी खळबळ उडवून दिली.

अशातच १९९८ ची लोकसभा निवडणूक आली. अटलजींची भाजप तेव्हा संपूर्ण भरात होती. समोर अडखळत हिंदी भाषण वाचणाऱ्या अननुभवी सोनिया गांधी यांशिवाय कोणतेही आव्हान नव्हते. राज्यात देखील युतीचे सरकार होते. मागच्या निवडणुकीत त्यांनी ४८ पैकी ३३ जागा मिळाल्या होत्या. यामुळं भाजपचे राज्यातील नेतृत्व तर अती आत्मविश्वासात होते.

प्रमोद महाजन यांच्याशी झालेल्या वादाची परिणीती बनवारीलाल पुरोहित यांचे तिकिट कापण्यात झाली. त्यांच्याऐवजी रमेश मंत्री याना भाजपची उमेदवारी देण्यात आली. भडकलेल्या पुरोहितांनीही एका रात्रीत पक्ष बदलला व ते काँग्रेसच्या तंबूत दाखल झाले. ते व त्यांचा पेपर हितवादी यातून भाजपच्या नेतृत्वावर सडकून टीका होऊ लागली.

पुरोहितांनी त्या निवडणूकीत काँग्रेस उमेदवार विलास मुत्तेमवार यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण जोर लावला होता.

मतदानाच्या काही दिवस अगोदर सोनिया गांधींची नागपूरमध्ये पहिलीच जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. कस्तुरचंद पार्कवर लाखांची गर्दी जमली होती. व्यासपीठावर विदर्भातील ११ ही मतदारसंघांचे काँग्रेस – रिपाई चे उमेदवार व काँग्रेसचे राज्यातील मोठे नेते हजर होते.

नेमका सोनिया गांधींना सभास्थानी पोचण्यास उशीर होत होता.

समोर लाखोंची गर्दी ताटकळली होती. या सभेला बनवारीलाल पुरोहित देखील हजर होते. पुरोहितांनी शरद पवारांना सोनियाजी येईपर्यंत भाषण करू देण्याची विनंती केली. एवढ्या मोठ्या गर्दीसमोर त्यांनी यापूर्वी कधी भाषण केलं नव्हतं आणि अशी संधी उभ्या आयुष्यात पुन्हा मिळणार नव्हती. मौके की नजाकत पाहून काँग्रेस नेत्यांनीही त्यांना बोलण्याची संधी दिली.

पुरोहितांनीही त्या दिवशी जोरदार भाषण ठोकले. आपल्याला मिळालेल्या संधीचा पूर्ण वापर करून गडकरी व महाजनांवर यथेच्छ धुलाई केली.

त्यातल्या त्यात विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच गडकरींनी पूरोहितांना फ्युझ्ड बल्ब म्हणून हिणवले होते. यावर पुरोहितांनी या सभेत प्रत्युत्तर दिले.

ये गडकरी ने मुझे फ्युझ्ड बल्ब कहा, अगर मैने इनके ११ के ११ बल्ब फ्युझ नही किये तो नाम बदल दूंगा.

बनवारीलाल पुरोहित यांनी भविष्यवाणी केल्याप्रमाणे फुल फॉर्ममध्ये असलेल्या भाजप शिवसेना युतीचे विदर्भातील ११ हि उमेदवार पडले. आता यात त्यांच्यामुळे हे घडले की तेव्हाच्या राजकीय परिस्थितीचा परिणाम झाला हि गोष्ट अलाहिदा मात्र प्रमोद महाजन, नितीन गडकरी यांच्याशी थेट वाद करणाऱ्या बनवारीलाल पुरोहित यांचे शब्द खरे ठरले हि गोष्ट नागपुरात चर्चेचा विषय ठरली.

बनवारीलाल पुरोहित काँग्रेसमध्ये देखील फार काळ टिकले नाहीत.

केंद्रात भाजपच सरकार फक्त तेरा महिने टिकले. १९९९ साली पुन्हा लोकसभेच्या निवडणूक आल्या. भाजप  यावेळी पूर्ण तयारीत उतरली होती. मागच्या चुका त्यांनी सुधारल्या. रामटेक मतदारसंघात बनवारीलाल पुरोहित यांचा मोठा पराभव केला.

२००३ साली त्यांनी स्वतःची विदर्भ राज्य पार्टी बनवली. काही वर्षांनी सगळे वाद गुंडाळून भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला. २०१६ पासून ते राज्यपाल आहेत.

विदर्भाचे राजकारण नेहमी सरळमार्गी आहे असं म्हणतात. तिथे कधी मोठे धमाके होत नाहीत आणि त्यामुळे कधी प्रसारमाध्यमांचे खूप लक्ष जात नाही. अशा या वैदर्भीय राजकारणाचे फ्युज उडवणारे बनवारीलाल पुरोहित हे एकमेव नेते मानले पाहिजेत.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.