महाराष्ट्रातल्या या गावात फक्त पाणी आणण्यासाठी म्हणून लोक ३-३ लग्न करतात

ऐकुन धक्का बसला ना ? पूर्वीच्या काळी राजेमहाराजे अशी लग्न करायची हे ऐकले होतो. कोण आपला वंश वाढावा म्हणून, कोण दुसऱ्या राज्याबरोबर नात्याचे संबंध निर्माण व्हावेत म्हणून तर काही डँबीस राजे जस्ट फॉर फन म्हणून दहा दहा लगीन करायचे.

आज कालच्या काळात एक लग्न झालं तरी मुश्किल झाल्या आणि या गावचे लोक फक्त पाणी आणायला कोण तरी पाहिजे म्हणून दोन दोन तीन तीन लगीन करालेत.

मुंबईची तहान भागवणारा ठाणे जिल्ह्यातला शहापूर तालुका. मुंबईला पाणी पुरवणारे तानसा, भातसा आणि वैतरणा या तीन नद्यांवरील धरण याच तालुक्यात आहेत. पण काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणी प्रमाणे याच तालुक्यातली गावं वर्षोनुवर्षे तहानलेली आहेत.

असच एक गाव आहे डेंगणमाळ  

मुंबईपासून अवघ्या दीडशे किमीवर असणाऱ्या डेंगणमाळ गावापर्यंत रस्ते आणि वीज तर पोहोचली आहे, मात्र पाणी पोहचलं नाही.दरवर्षी फेब्रुवारीनंतर पाण्याचे उपलब्ध स्रोत आटत जातात आणि सुरु होते गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण पायपीट.

आता तुम्ही म्हणाल की भिडू यात काय नवीन ? हे तर निम्म्या महाराष्ट्रातलं चित्रं आहे. उन्हाळ्यात आमच्या पण गावात जरा कमी अशीच स्थिती असते. मग काय आम्ही लगेच दुसरं लग्न करायला जातो काय? 

पण डेंगणमाळची गोष्ट येगळी आहे. इथे पाण्याची पायपीट एक दोन नाही तर तब्बल १२ तासांची आहे.

५०० डोक्याची लोकसंख्या असलेलं दुष्काळी डेंगणमाळ. ना गावाजवळ नदी, ओढा आहे ना इथंल्या विहिरींना पाणी! साध्या हंडाभर पाण्यासाठी तासनतास वाट बघत बसावी लागते. अक्षरशा विहिरीत शिडी लावून उतरून पाणी भरण्याची वेळ इथल्या गावकऱ्यांवर येते. छोट्याशा डबक्यातून लोटाभर पाणी उपसणारी ही मुलं..

शासनाच्या अनेक योजना येऊन गेल्या. टँकर आले, जलयुक्त शिवार आलं बरच काय काय आलं पण पाणी काय आलं नाही. इथल्या गावकऱ्यांची पाण्यासाठीची तारेवरची कसरत कमी झाली नाही.

आता असलं अस्मानी सुलतानी संकट पाचवीला पुजल्यावर काय ना काय उपाय करावा लागणारच ना.  गेल्या काही वर्षांपासून गावकऱ्यांनी आपापल्या पातळीवर एक उपाय शोधून काढला.

हा उपाय म्हणजे २-३ लग्न.

पहिली बायको म्हणजे प्रॉपर तुम्ही आम्ही करतो तसं लगीन करून आणलेली. ती स्वैपाक, पोरंबाळं, धुनी भांडी यामध्ये बिझी. नवरा शेतातली कामं, चावडीवरच राजकारण यात बिझी. मग पाण्याची व्यवस्था कोण करणार? जवळपास असत तर काय तर ऍडजस्ट केलं असतं पण १२ तास द्यायला लागत असले तर?

मग म्हणून या गावातल्या लोकांनी पाणी वाली बायको करून आणायला सुरवात केली.

पाणी वाली बायको ही सहसा विधवा , नवऱ्याने टाकलेली किंवा लग्न न होणारी बाई असते. कोणाला हुंडा परवडत नाही कोणाला आणि काय कारण आहे अशा संकटग्रस्त बायकांना श्रीकृष्णाप्रमाणे डेंगणमाळचे ग्रामस्थ आपल्या छत्राखाली आसरा देतात. त्यांचं एकच काम पाणी भरून आणणे.

उदाहरणच घ्यायचं झालं तर गावचे सखाराम भगत.

या साहेबानी तर तीन लग्ने केली आहेत. यांची पहिली बायको तुकी. हिला ६ पोरं आहेत. तिला पोराबाळांकडे दुर्लक्ष करून पाणी आणायचं झेपेना म्हणून सखाराम भगत यांनी पाणीवाली बायको करून आणली. तीच नाव सागरी. पण ही पाणीवाली बायको वयस्कर झाली, तिला पाणी आणणे झेपेना म्हणून सखाराम भगतनीं तिसरं लग्न केलं. भागी हि २६ वर्षांची विधवा त्यांची तिसरी बायको झाली.

यासाठी फक्त गावची पंचायत बसवून त्यांना परवानगी घ्यायला लागली इतकंच.

अशीच स्थिती गावातल्या बऱ्याच जणांची आहे. प्रत्येक घरात एक किंवा दोन पाणीवाल्या बायका आहेत. त्यांना बायकोचा दर्जा तर असतो पण इस्टेटीमध्ये वाटा वगैरे बाकीच्या गोष्टी नसतात. नवरा नावाच्या माणसाने लग्न करून नाव दिलं याचं उपकार फेडण्यासाठी पाण्याची पायपीट करणे एवढंच यांच्या नशिबात लिहिलेलं असतं.

स्वातंत्र्याला जवळपास सत्तर वर्षे झाली. भारतातील सर्वात मॉडर्न म्हणवल्या जाणाऱ्या मुंबईच्या अगदी हाकेच्या अंतरावर असली अंगावर काटा येईल अशी स्थिती असलेलं विचित्र परंपरा असलेलं गाव असेल हे आपल्याला माहिती पण नसते.

वर्ल्ड क्लास मीडियाने या गावाची बातमी केलेली आपण इंटरनेटवर बघू शकतो मात्र आपली मराठी मीडिया, आपलं मराठी सरकार, मराठी माणसे या गावासाठी काही विशेष करताना दिसत नाहीत हे दुर्दैव.

हे हि वाच भिडू .

Leave A Reply

Your email address will not be published.