जिचकरांच्या डाएट प्लॅनला खऱ्या अर्थाने पुनर्जीवित केलं ते डॉ. दिक्षित यांनीच…

कोरोनाच्या काळात आणखी एक साथ वेगाने पसरली ती म्हणजे बसून खाणे आणि वजन वाढवणे. बाहेर लॉकडाऊन चालू असल्यामुळे पर्याय देखील नव्हता. युट्युबचा वापर वाढलाच होता. अनेक देशोदेशीचे न्यूटरिशनिस्ट, डाएटेशिएन यांचे व्हिडीओ पहिले. सेलिब्रिटी लोकांचा डाएट सांभाळणाऱ्याचा सल्ला बघितला, पुस्तके वाचली.

पण गेला काही काळ गाजत असलेला दीक्षित डाएटच मदतीला आला.

‘दोन वेळा खा आणि वजन कमी करा’ ही संकल्पना डॉ.जगन्नाथ दीक्षित यांच्यामुळे घराघरात पोहचली. दिक्षित डाएट विरुद्ध दिवेकर डाएट हा सृजनशील वाद देखील अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला. आज फिटनेस विश्व या दोन पंथात वाटले गेले आहे.

दीक्षित डाएट म्हणजे अगदी सोपे कोणतीही गुंतागुंत नसलेले डाएट. खूप पैसे खर्च करायचे नाहीत, जीवाला घोर लागेल अशी बंधने नाहीत, कितीही खाल्लं तरी चालेल फक्त दोनच वेळा खायचं आणि ५५ मिनिटाची वेळ पाळायची.

पण या डाएटची खरी संकल्पना कोणाची आहे माहित आहे का?

गोष्ट आहे २०१२ सालची.

डॉ. दीक्षित तेव्हा लातूरच्या गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. त्यांना देखील त्याकाळात वजनवाढीच्या त्रासाने छळल होतं. वाढलेला पोटाचा घेर व वाढलेले वजन, सोबतीला कोलेस्टेरॉल याचा त्रास त्यांना देखील होत होता. स्वतः मेडिकल फिल्डमधील नावाजलेले डॉक्टर असूनही वाढलेल्या वजनावरचा उपाय सापडत नव्हता.

तुमच्या आमच्यासारखं त्यांनी हि खूप रिसर्च केला. एक दिवस उपवास, एक दिवस फक्त फळं खाल्ली. इंटरनेटवर डाएट प्लॅन शोधून तेसुद्धा फॉलो केले. आयुर्वेदिक, होमिओपॅथी औषधेसुद्धा घेतली. दर दोन-तीन तासांनी खाण्याचा प्रयोगसुद्धा केला. हे सर्व प्रयोग करतानाच आणखी दोन-तीन किलो वजन वाढल्याचं समजलं.

शेवटी त्यांच्याही मदतीला एक युट्युब वरचा व्हिडीओ आला. त्यांच्या एका मित्राने हा नव्वदच्या दशकातला हा व्हिडीओ त्यांना सजेस्ट केला होता. एक पुढारी नेता भाषण देत होता.

पण हा नेता साधासुधा नव्हता. ते होते भारतातील सर्वात जास्त क्वालिफाईड व्यक्ती

डॉ.श्रीकांत जिचकर !!

त्यांच्या जवळ ४२ विद्यापीठातून मिळवलेल्या २० पदव्या होत्या. बहुतेक सगळ्या प्रथम श्रेणीतून मिळालेल्या. आजवर एकूण २८ सुवर्णपदक पटकावले होते. हजारो पुस्तके वाचली होती. जिचकारांनी मानाची डी.लिट ही पदवी मिळवली होती तीही संस्कृत मध्ये. त्यांनी इ.स. १९७८ मध्ये भारतीय पोलीस सेवेची परीक्षा उत्तीर्ण केली व इ.स. १९८० मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण झाले.

४ महिन्यामध्ये त्यांनी आयएएस सेवेचा राजीनामा देऊन विधानसभेची निवडणूक लढवली आणि अवघ्या २५ व्या वर्षी आमदार बनले. राजकारणात गेले मंत्रीदेखील झाले.

पण हे सगळ असलं तरी सर्वात आधी ते एक एमबीबीएस एमडी डॉक्टर होते.

तर सांगायच म्हणजे या माणसाने १९९७ साली एक नवीन विचार भारताला दिला. त्यावेळी ते राज्यसभेचे सभासद होते. पुणे महानगर पालिकेतील एका नगरसेवकाने बालगंधर्व रंगमंदिरात जिचकारांना भाषणासाठी बोलावल. गावातील अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती आले होते. त्यावेळी जिचकर म्हणाले,

“शरीरात तयार होणारे अतिरिक्त इन्शूलीन बऱ्याच रोगांचे कारण आहे.”

स्थूलता, त्यातून मधुमेह, वाढलेला रक्तदाब, त्यातून मग अंजोग्राफीची तपासणी, त्यात नक्की काहीतरी सापडतच. मग अंजोप्लास्टी. सगळाच प्रकार खर्चिक. पण मरणाची भीती वाटायला लागली की माणूस करतो खर्च. त्याला वाटतं की झाल सगळ करून. आता काही आपल्याला होणार नाही. पण कसच काय. पाच सहा वर्षात आणखी खर्चिक बायपाससाठी हॉस्पिटलची वारी ठरलेली.

मग यावर सोपा उपाय काय? दिवसातून फक्त दोनदाच जेवा. काहीही खा. भूक भागेपर्यंत कितीही खा. तूप लोणी बिनधास्त खा. मांसाहारही चालेल. फक्त हे जेवण ५५ मिनिटांत संपवले पाहिजे. आणि दिवसातून ४५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम केला पाहिजे.

महागड्या जिम नको की, आहारतज्ञांना पैसे द्यायला नको. दवाखान्याची पायरी चढायची कधी वेळही येणार नाही. किती सोपे आहे ना? पण अवघड बाब पुढे आहे.

याच भाषणात ते पुढे सांगतात की,

“दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नका. याकाळात तोंड उघडायचे ते फक्त बोलण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी. बस्स. औषधांच्या याद्या विसरून जा. हे खा व हे खाऊ नका याची प्रत्येक डॉक्टर व आहारतज्ञांप्रमाणे बदलणारी यादी व त्यातून उडणारे गोंधळ संपवून टाका.”

अतिशय सहज सोप्या भाषेत जिचकर यांनी वजनवाढीचा प्रश्न चुटकीसरशी सोडवून टाकला होता. श्रोत्यांमध्ये बसलेले अनेक डॉक्टरहि कल्पना ऐकून थक्क झाले होते. आजवर कोणालाही न सुचलेला हा उपाय.

आपली संकल्पना रुजावी म्हणून डॉ.जिचकर यांनी “नागपूर फिटनेस मुव्हमेंट” आणि “पुणे फिटनेस मुव्हमेंट” नावाच्या संस्था सुरु केल्या. त्याकाळी इंटरनेट आज आपण पाहतो तेवढे पसरले नव्हते. जिचकर यांनी जवळपास अडीच हजार कार्यकर्त्यांच्या मार्फत हि संकल्पना सर्वत्र पसरवण्यास सुरवात केली.

मात्र दुर्दैवाने २००४ साली झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचे आहार विषयक विचार मागे पडले.

पुढे कोणीतरी युट्युबवर त्याचं १९९७ सालच भाषण शेअर केल.

हेच ते भाषण ज्यामुळे डॉ.जगन्नाथ दीक्षितांचे आयुष्य बदलून गेले. सुरवातीला डॉ.दीक्षित यांना हा उपाय तितकासा पटला नव्हता पण तरीही इतकं काय काय केलं तर हा प्रयोग देखील करून पाहू अस म्हणत जिचकर यांनी सांगितल आहे तस दिवसातून दोन वेळाच जेवणास सुरवात केली.

तीन महिन्यात त्यांचे वजन ८ किलोंनी व पोटाचा घेर दोन इंचांनी कमी झाला,

एकदा स्वतःची खात्री पटल्यावर त्यांनी या आहारपद्धतीवर आणखी रिसर्च सुरु केला. जिचकरांनी शोधलेली संकल्पना आणखी विकसित केली. त्यालाच आज आपण दीक्षित डाएट म्हणून ओळखतो.

विनासायास वेटलॉस हे अभियान त्यांनी सुरु केलं. आजवर whatsapp ग्रुप आणि फेसबुक, युट्युब इंटरनेटच्या माध्यमातून लाखो लोकांनी याचा फायदा घेतला आहे. अनेकांचे वजन कमी झाले तर कित्येकांचा मधुमेह नियंत्रणात आला.

विशेष महत्वाच म्हणजे इतका खात्रीशीर उपाय असूनही डॉ.दीक्षित व त्यांची टीम रुग्णांकडून एक रुपयाही आकारत नाही. या अभियानांतर्गत बत्तीस देशातील लोक त्यांच्याशी जोडले गेले आहेत.

याचे श्रेय डॉ.दीक्षित निसंकोचपणे डॉ.श्रीकांत जिचकर यांना देतात. विनासायास वेटलॉस हे पुस्तक देखील त्यांनी श्रीकांत जिचकर यांच्या स्मृतींना अर्पण केल आहे.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.