पेशव्यांना खुन्नस म्हणून या सरदारानं शनिवारवाड्याची प्रतिकृती उभारली होती

पुणे शहराचे महाराष्ट्राला जेवढे आकर्षण आहे, तेवढेच अज्ञान पुण्याच्या बारा मावळांचे. पुण्याच्या सभोवती असणाऱ्या बारा तालुक्यांची माहिती पेशवाईच्या जाणकारालाही क्वचित असते. स्वराज्याची स्थापना करण्यात आणि नंतरच्या काळात स्वतंत्र्यचळवळीत या भागाचे विशेष योगदान आहे.

त्यामुळे या भागात बऱ्याच ऐतिहासिक वास्तू आहेत. अनेक वर्षांच्या काळात या भागात प्रचंड स्थित्यंतरे झाली. पण त्याची माहिती मुख्य धारेतील लोकांपर्यँत क्वचितच पोहोचते.

पेशवेकाळापासून भरभराटीस आलेले पण आज प्रचंड दुर्लक्षित असणारं यापैकीच एक ठाणं म्हणजे निमगाव. खेड तालुक्यातील (सध्याचं राजगुरूनगर) हे गाव आपल्यामागे प्रचंड इतिहास तोलून आहे. खंडोबाच्या प्राचीन मंदिरासाठी प्रसिद्ध असणाऱ्या या गावामध्ये इतिहासाची अनेक प्रकरणे घडली आहेत.

निमगाव हे नाव अनेक गावांचे असल्यामुळे त्याच्या जोडीला शेजारच्या गावाचे नाव जोडले जाई. पेशवे दफ्तरमध्ये याचा उल्लेख केवळ ‘निम’ या नावाने केलेलाही आढळतो.

ओळख पटवण्यासाठी या पट्ट्यात जवळ असणाऱ्या नागना नावाच्या गावाची ख्याती होती. तेव्हा निमगावचा उल्लेख निमगाव – नागना असा केला जाई. महाराष्ट्रात पडलेल्या अनेक दुष्काळांमध्ये तत्कालीन पुणे परिसरांतील दुष्काळ सर्वात भयानक होते. अनेक गावेच्या गवे त्यामुळे ओसाड झाली होती.

अशाच एका दुष्काळात नागना गाव पूर्णपणे ओसाड झाले. या परिसरात अशा उजाड झालेल्या गावांचे मोठे अवशेष सापडतात. काळाच्या ओघात हे नावही लोकांच्या विस्मृतीत गेले. इथे कोण राहायचे याचीही माहिती आज मिळत नाही.

नंतरच्या काळात इथे वस्ती वाढू लागली. येथील ग्रामणी असलेल्या घराण्यात चंद्रचूड घराणे प्रसिद्ध होते. निमगाव – नागना भागातील जवळपासची पूर, खेड अशी अनेक गावे या घराण्याच्या अधिपत्याखाली होती. जवळपासच्या हजारो एकर जमिनीवर त्यांचा हक्क होता.

या भागातील शेतकऱ्यांकडून कर गोळा करणे आणि इतर कामे चंद्रचूड परिवार करी. या काळात विविध जातीजमातींच्या वतन दिलेल्या अनेक जमिनीही त्याने ताब्यात घेतल्या होत्या.

या घराण्यातील सर्वाधिक प्रसिद्धीस पावलेला सरदार म्हणजे गंगाधर यशवंत चंद्रचूड उर्फ गंगोबातात्या. पेशवाईच्या बऱ्यावाईट घटनांमध्ये या माणसाचा मोठा वाटा होता.

पहिल्या बाजीराव पेशव्याच्या काळात मल्हारराव होळकर यांची ख्याती वाढू लागली होती. त्या काळी सरदार स्वतंत्र संस्थानिक म्हणूनही काम बघत. त्यांचे प्रस्थ वाढू लागताच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या मर्जीतील एक कारभारी मल्हाररावच्या होळकरांच्या पदरी नेमावा. त्याच्याद्वारे होळकरांच्या पायांत बेडी अडकवता येईल अशी योजना बाजीरावाने आखली.

त्यासाठी त्याने आपल्या मर्जीतील विश्वासू सरदार निवडण्याचे नक्की केले. इथूनच उदय झाला गंगाधर यशवंत चंद्रचूड यांचा. निमगावमध्ये त्याच्या नावाचा दरारा होता. होळकरांचे कारभारी पद सांभाळण्याची जबाबदारी पेशव्यांनी त्याच्याकडे सोपवली.

या काळात चंद्रचूड घराण्याचे प्रस्थ वाढले.  पेशव्याचा मुख्य कारभारी म्हणून सदाशिवरावभाऊ यांना गंगोबावर सुरुवातीपासून साशंकता होती.

होळकरांच्या पदरी कारभारी म्हणून नोकरीस लागल्यावर गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी मोठी प्रगती केली. मुत्सद्देगिरी व कारकुनीच्या सोबतच गावातील कारभारामुळे त्याला राजकारण आणि मैदानी कामगिरीचा अनुभव होता. त्यामुळे वस्तुस्थिती माहित असूनही होळकरांच्या राज्याचा बराचसा कारभार आपोआपच गंगाधर यशवंत चंद्रचूड यांच्याकडे चालून आला. एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवण्याचं अवघड काम त्यांच्याकडे आलं.

आजच्या काळात डबल एजंट म्हणवला जाणारा हा उद्योग तेव्हा हा सरदार करत होता. 

होळकरांच्या लष्करी मोहिमा व कारभार गंगाधर यशवंत चंद्रचूड यांच्याकडे सोपवून मल्हारराव राजकारणाकडून निवृत्तीकडे वळले. एकाच वेळी पेशवे व होळकर अशा दोघांच्या मर्जी संपादन करणारं इतिहासातलं हे एकमेव व्यक्तिमत्त्व होतं.

कसलीही घराणेशाहीची परंपरा नसताना होळकरांच्या स्वबळावर पुढे येत मराठेशाहीची धुरा सांभाळली होती. १७२९ च्या सुमारास त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळवल्यानंतर ही सत्ता उत्तर भारतात मोठी होत होती. त्यामुळे गंगाधर यशवंत चंद्रचूड याने आपला पक्ष बदलला.

नंतरच्या काळात होळकरांच्या पदरी राहून त्यांची होळकरांवर निष्ठा बसली. त्यांनी पेशव्यांकडे दुर्लक्ष केले. होळकरांचा पक्ष घेऊन त्यांनी माळव्यातच आपली सेवा करून त्याच संस्थानाच्या भरभराटीसाठी काम केले.

इसवी स. १७५० नंतर गंगाधर यशवंत चंद्रचूड याने होळकरी सैन्यामधील मोठमोठ्या मोहिमांमध्ये सहभाग घेतला. इसवी स. १७५१ मध्ये मोगल वजीर सफदरजंग व रोहिले – पठाणांचा झगडासुरु होता त्या काळात वजिराच्या मदतीला शिंदे – होळकरांच्या फौजा गेल्या होत्या. त्या संघर्षात गंगाधर यशवंत चंद्रचूड आणि निमगावच्या लोकांनी मोठा पराक्रम गाजवला होता.

पुढे स. १७५४ मध्ये कुंभेरीच्या वेढ्यात मल्हाररावाचा मुलगा खंडेराव याचा अपघाती मृत्यू झाला. पुत्रनिधनाने वृद्ध मल्हारराव रणभूमीवरून काहीसा निवृत्त झाला व लष्कराची जबाबदारी गंगोबा व तुकोजीवर येऊन पडली. रघुनाथरावाचा प्रसिद्ध अटक मोहिमेत होळकरी सैन्याचे नेतृत्व प्रामुख्याने या दोघांनीच केले.

या काळात पुण्यातील दरबारी गंगाधर यशवंत चंद्रचूड याच्यावर पेशव्यांची खप्पामर्जी होती.

आपल्याच शनिवारवाड्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गावातील आपला सेवक आपली मर्जी न जुमानता होळकरांच्या पदरी जातो यामुळे गंगाधर यशवंत चंद्रचूडविरुद्ध वाड्यात धुसफूस चालू असे.

त्यामुळे स्वतः उत्तर हिंदुस्तानात पराक्रम गाजवताना आपल्या स्वतःच्या गावात मात्र गंगाधर यशवंत चंद्रचूड यांचे पूर्ण नियंत्रण नव्हते. म्हणून त्यांनी तिथल्या स्थानिक कारभारासाठी नवीन वस्तू बनवण्याचे ठरवले. या सरदाराला वास्तुशास्त्राचे चांगले ज्ञान होते. त्यांच्या या ज्ञानाचा नमुना अजूनही पाहायला मिळतो.

नाशिकमध्ये अहिल्याबाई होळकर पुलाच्या जवळ एक प्राचीन मंदिर आहे. सुंदरनारायण मंदिर नावाने ते ओळखले जाते. त्याची स्थापना गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनीच १७५६ मध्ये केली होती. हाही पेशवेकालीन स्थापत्याचा उत्तम नमुना आहे. संपूर्ण काळ्या पाषाणात दगड, चुना, शिसव, नवसागरचा वापर करून हे मंदिर बांधले गेले होते.

भगवान विष्णुची आणि पाषाणाची अशी फार मोजकी मंदिरे महाराष्ट्रात आहेत. त्या काळात जवळपास १० लक्ष रुपयांत गंगोबातात्या यांनी हे मंदिर बांधले होते.

अशीच रचना करत त्यांनी आपल्या गावात मोठा वाडा उभारला. त्यांचा मुख्य सामना आपला एकेकाळचा धनी असलेल्या पेशव्यांशींच होता.

त्यामुळे या वाड्याची रचना करतानाच आपले ठाणे पुण्यापेक्षा कमी दर्जाचे नाही हे पाहणाऱ्याला समजून यावे इतके उत्तुंग काम त्यांनी उभारले.

वाड्याच्या प्रवेशद्वाराची रचना ही हुबेहूब शनिवारवाड्यासारखी केली. दरवाज्यातून हत्ती अंबारीसकट आत जाईल एवढी त्याची उंची ठेवली होती. चारही बाजूची तटबंदी आणि आणि सहा बुरुज बनवले. इथून निमगावच्या संपूर्ण परिसरावर आणि खंडोबा माळावर लक्ष ठेवता येत असे. 

स. १७६० मध्ये बुराडी घाटच्या लढाईनंतर अब्दालीसोबत लढण्यास होळकर सैन्य पुढे सरसावले होते. त्यावेळी झालेल्यालढाईत २७ फेब्रुवारी १७६० रोजी गंगोबाने दिल्लीजवळील सिकंदरा, या नजीबखानाच्या जहागीरीतील प्रदेशावर स्वारी करून लूट मिळवली होती. पुढल्या काळात अब्दालीशी लढताना होळकरांच्या सैन्यात गंगाधर यशवंत चंद्रचूड हाही होता.

‘मराठ्यांच्या इतिहासाची साधनें’मध्ये वि. का. राजवाडे यांनी याचा सविस्तर उल्लेख केलेला आहे. पानिपत घडल्याच्या आदल्या वर्षी मार्च महिन्याच्या ४ किंवा ५व्या तारखेला मल्हाररावाचे सरदार आणि अब्दाली यांच्यात सामना झाला होता. 

या सरदारांमध्ये शेट्याजी खराडे, त्याचा पुत्र शिवाजी खराडे, रामाजी यादवाचा पुत्र आनंदरावराम व गंगाधर यशवंत चंद्रचूड यांचा समावेश होता. या लढाईत गंगाधर यशवंत चंद्रचूडाखेरीज बाकीची सर्व मंडळी ठार झाली. अफगाण सैन्याने छापा मारून गंगोबाला उधळून लावले. तेव्हा गंगाधर यशवंत चंद्रचूड पुन्हा महाराष्ट्रात आला. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर त्याने आपला पक्ष पुन्हा बदलला.

धन्याच्या मृत्यूनंतर जेव्हा उत्तराधिकारी नेमण्याची वेळ आली तेव्ह आपसूकच अहिल्याबाई होळकरांचे नाव समोर आले. उत्तरेच्या मोहिमांमध्ये सैन्य असताना या अहिल्याबाई राज्याचा कारभार बघत असत. ही बाब  गंगाधर यशवंत चंद्रचूड याला पटली नाही. म्हणून त्यानं पुन्हा पक्ष बदलला.

‘बाई काय राज्य कारभार करणार’ असे म्हणून त्याने अहिल्याबाई होळकरांच्याच विरुद्ध कट रचला.

त्यांना विरोध करणाऱ्यांमध्ये गंगाधर यशवंत चंद्रचूड हा प्रमुख होता. राघोबादादांशी त्यांनी अहिल्याबाईंविरुद्ध संधान बांधले आणि इंदूर बळकावण्यासाठी त्यांना उत्तरेत बोलावले.

अर्थात ही मोहीम पूर्ण पडली नाही आणि अहिल्याबाई होळकरांचे राज्य अबाधित राहिले. गंगाधर यशवंत चंद्रचूड याला आपली जागा गमवावी लागली आणि तो निमगावात परत आला. पुढल्या काळात त्याला पेशव्यानेही दूर लोटले आणि शिक्षा केली.

त्यांनी बांधलेला वाद आता काहीश्या जीर्णावस्थेत आहे. वाडा भव्य तट बुरुजांसह शिल्लक आहे. प्रवेशद्वारावरील गंडभेरुड आणि लाकडात कोरलेल्या गणेशमूर्तीअजूनही शाबूत आहेत. 

न्या.यशवंत विष्णू चंद्रचूड आणि सध्या सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असणारे न्या. धनंजय यशवंत चंद्रचूड हे याच घराण्यातील आहेत.

नंतरच्या काळात निमगावही बदलले. जवळच्या दावडी या गावावरून हे गाव निमगाव – दावडी या नावाने ओळखले  जाऊ लागले. हल्लीच्या काळात त्याला निमगाव – खंडोबा या नावाने सुद्धा ओळखतात.

हे हि वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.