बच्चनने राजकारणात येवून या मुख्यमंत्र्याचं करियर संपवलं होतं

दम नहीं है पंजे में, लंबू फंसा शिकंजे में. 

सरल नहीं संसद में आना, मारो ठुमका गाओ गाना.

जेव्हा बच्चन त्यांच्या विरोधात उभा राहिला होता, तेव्हा या घोषणा देण्यात येत होत्या. साहजिकच होतं, राजीव गांधींनी जरी बच्चनला दोस्तीखातर त्यांच्या विरोधात उभा केलं असलं तरी माणूस साधा नव्हता. या माणसाचा उल्लेखच कॉंग्रेसचा चाणक्य म्हणून केला जायचा. युपीचा मुख्यमंत्री राहिलेला हा माणूस होताच शिवाय १९४२ च्या चले जाव आंदोलनात या माणसावर ब्रिटींशांनी पाच हजारांच बक्षीस ठेवलेलं. अशा माणसापुढे बच्चन उभा होता… 

या माणसाचं नाव, 

हेमवती नंदन बहुगुणा.. 

बहुगुणा म्हणल्यानंतर तुम्हाला सध्याचं राजकारण आणि भाजप आठवली असेल. पण ही गोष्ट खूप खूप वर्षांपूर्वीची. जेव्हा भाजप हा अस्तित्वात देखील नव्हता तेव्हा सुरू झालेली. हेमवंती बहुगणा नावाचा तरुण स्वातंत्र्यलढ्याच्या काळात डीएवी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. तेव्हा त्याचा संबंध लाल बहादुर शास्त्री यांच्यासोबत आला. शास्त्रीच्या संबंधामुळे पोरगा कॉंग्रेसचा समर्थक झाला आणि राजकारणात आला. 

१९३६ ते  १९४२ पर्यन्त विद्यार्थी आंदोलनात तो सक्रीय होता. त्यानंतर छोटो भारत चळवळ उभा राहिली. याच चळवळीने त्यांची लोकप्रियता वाढली आणि कालच्या या पोराला लोक आदरार्थी बोलावू लागली. इंग्रजांनी हेमवती बहुगुणा यांना पकडणाऱ्याला पाच हजारांचे बक्षीस जाहीर केले. १९४५ साली ब्रिटीशांनी त्यांना दिल्लीच्या जामा मश्चिद मधून अटक देखील केली.

काही वर्षात देश स्वतंत्र झाला आणि हेमवती बहुगुणा देखील. 

त्यानंतर ते सक्रीय राजकारणात आले. १९५२ साली यूपीच्या कॉंग्रेस कमिटीचे सदस्य झाले. १९५७ साली पार्लमेंट सेक्रेटरी झाले. त्यानंतर १९५८ साली श्रम व उद्योग विभागाचे उपमंत्री राहिले. पुढे १९६३ ते १९६९ दरम्यान त्यांच्या हातात युपीचं कॉंग्रेस महासचिव पद देण्यात आलं.६७ च्या निवडणूकांनंतर अखिल भारतीय कॉंग्रेसचे महामंत्री झाले. 

नेमक्या याच वर्षी कॉंग्रेसमध्ये इंदिरा युगाचा पाया रचला जात होता. तत्कालीन युपीचे मुख्यमंत्री त्रिभुवन नारायण सिंह कामराज यांच्या सिंडिकेट गटात गेले. तर बहुगुणा मात्र इंदिरांसोबत राहिले. पुढे त्रिभुवन नारायण सिंह यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेली. त्यानंतर कमलापती त्रिपाठी आले व भ्रष्ट्राचाराच्या आरोपामुळे त्यांनाही जावं लागलं.

कमलापती त्रिपाठी यांच्यानंतर पुढच्या मुख्यमंत्रीपदाचा माणूस हवा होता. हेमवती बहुगुणा १९७१ साली खासदार झाले होते. त्याच वेळी त्यांची अपेक्षा होती की आपणाला इंदिरा गांधी कॅबिनेट करतील पण इंदिरा गांधींनी त्यांना उपमंत्री केलं. यावरून बहुगुणा इतके नाराज झाले की १५ दिवस त्यांनी पदाचा चार्जच घेतला नाही. तेव्हा इंदिरा गांधींनी त्यांना दूसरं पद देवू केलं. पण तेव्हाच बहुगुणांबाबत एक गोष्ट ठरवण्यात आली होती, 

बघुया कधी तरी वेळ येईल… 

हेमवती बहुगुणा युपीचे मुख्यमंत्री झाले. नोव्हेंबर १९७३ साली ते मुख्यमंत्री झाले आणि एप्रिल मार्च १९७४ साली इलेक्शन होत्या. कॉंग्रेस त्यावेळी सत्तेतून बाहेर जाण्याची चिन्हे होती तेव्हा हेमवती बहुगुणांनी आपले राजकीय डावपेच टाकायला सुरवात केली. अगदी माजी मुख्यमंत्री चंद्रभानू गुप्ता यांच डिपॉझिट देखील जप्त करुन दाखवलं. 

बहुगुणांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. काही काळ सरकार चाललं आणि नोव्हेंबर १९७५ साली आणिबाणीमुळे सरकार संपुष्टात आलं. 

आत्ता राजकीय डावपेचात आले ते संजय गांधी. संजय गांधी कॉंग्रेसच्या जून्या जाणत्या लोकांना जुमानत नव्हते. आणिबाणीच्या काळात ते इंदिरा गांधींसोबत होते. पण याच काळात जयप्रकाश नारायण यांनी आणिबाणीविरोधात रणशिंग फुंकले. 

जेपी बहुगुणा यांच्यावर टिका करण्यासाठी युपीत आले तेव्हा बहुगुणांनी त्यांच्यासाठी कारपेट अंथरलं. पाहुणचार केला. जयप्रकाश नारायण यांचा सन्मान केला. त्यांमुळे टिका करायला आलेले जेपी अगदी आनंदात परत गेले.

पण इकडे इंदिरा गांधींनी त्यांच्या विरोधात डाव टाकण्यास सुरवात केली… 

आणिबाणी उठवण्यात आली आणि लोकसभा इलेक्शनची घोषणा करण्यात आली. तेव्हा बहुगुणांनी आपले पत्ते बाहेर टाकून थेट जनजीवन राम यांच्यासोबत डेमोक्रेसी पार्टीची स्थापना केली. या पक्षाला २८ जागा मिळाल्या. जनता पक्षाच्या राजवटीत चौधरी चरणसिंह यांच्या नेतृत्वाखाली ते अर्थमंत्री देखील झाले. 

त्यानंतर जनता पार्टीचा तमाशा सुरू झाला. भविष्याचा अंदाज घेवून ते १९८० च्या लोकसभेच्या निवडणूकांपूर्वी कॉग्रेसमध्ये सामिल झाले. इंदिरा गांधी पण याच गोष्टीची वाट पहात होत्या.

सत्ता आली आणि बहुगुणांना कॅबिनेट मिळालं नाही. पक्षात बोलवून निवडूण आणुन कार्यक्रम करण्यात आला. बहुगुणांना कळून चुकलं की आपण जे काही आयाराम गयाराम खेळलो त्यांचा इंदिरा गांधींनी व्यवस्थित बदला घेतलेला आहे. 

पण बहुगुणांचा स्वत:च्या ताकदीवर विश्वास होता. सहा महिन्यातच त्यांनी कॉंग्रेसचा त्याग केला. खासदारकी आणि कॉंग्रेस दोघांनी सोडचिठ्ठी देण्यात आली. 

१९८२ साली त्या जागेवर पुन्हा अलाहाबादच्या जागेवरून खासदार म्हणून निवडूण आले. पण पुढे त्यांच्या अजून एक गोष्ट वाढून ठेवलेली ती म्हणजे खुद्द बच्चन.. 

राजीव गांधी राजकारणात सक्रीय झाले होते. राजीव गांधी यांनी बहुगुणा यांच्या विरोधात थेट बच्चनला उभा केलं. पण बहुगुणांना माहित होतं बच्चन असेल तर तो सिनेमात, राजकारणातला बच्चन तर मीच आहे.. 

घोषणा देण्यात आल्या, 

हेमवती नंदन इलाहाबाद का चंदन

दम नही हैं पंजे मे, लंबू फंसा शिकंजे में. 

सरल नहीं संसंद मैं आना, मारो ठुमका गाओ गाना… 

एकाहून एक घोषणा होत्या, निवडणूक झाली निकाल लागला. तेव्हा बच्चनने बहुगुणांचा १ लाख ८७ हजार मतांनी पराभव केला होता. या पराभवानंतर बहुगुणा यांनी राजकीय संन्यास घेवून टाकला. काही वर्षानंतर म्हणजे १९८९ साली त्यांचा याच संन्यासपणाच्या काळात मृत्यू झाला. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.