१९७९ पासून या ग्रामपंचायतीची निवडणूकच झालेली नाही

कोरोना काळामुळे लांबलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत देखील गावागावातील कट्ट्यांवरच वातावरण तापलं आहे. या गटाच्या पॅनेलमधून कोण उभं राहणार, त्या गटाकडून कोण उभं राहणारं अशा चर्चा सध्या सुरू आहेत.

मात्र दुसऱ्या बाजूने अशी देखील चर्चा सुरु आहे की, कोरोना संसर्ग अजून ही आटोक्यात आलेला नाही, त्यामुळे निवडणूका न घेता ग्रामपंचायती बिनविरोध कराव्यात. गर्दी न करता शांततेत आणि सुरक्षित वातावरणात निवडणूका पार पाडाव्यात.

मात्र निवडणुकांच्या या सगळ्या रणधुमाळीत सोलापूरमध्ये आधीपासूनच एक गाव असं आहे, जिथे ‘बिनविरोध ग्रामपंचायत’ अशी नुसती चर्चा होत नाही तर अंमलबजावणी देखील होते. आणि ती देखील मागील ४१ वर्षापासून. होय… १९७९ सालापासून इथे निवडणूकच झालेली नाही.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मळेगाव.

इथे मागील ८ पंचवार्षिक बिनविरोध झाल्या आहेत. आणि आता ९ वी पंचवार्षिक जाहिर झाली आहे. या गावात देखील गट आहेत पण विरोधापासून कोसो दूर आहेत. विकास काम देखील होत आहेत असं खुद्द विरोधी गटाचे नेते सांगतात.

गावच्या निवडणूक प्रक्रियेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही गावातले जेष्ठ व्यक्ती बाळासाहेब माळी यांच्याशी संपर्क साधला. ते मागील २५ वर्षापासून ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात अग्रेसर आहेत.

बाळासाहेब माळी ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले,

आमचं गाव साधारण ४ हजार लोकसंख्येच आहे. आणि मतदान २ हजार १०० च्या आसपास आहे. एकुण नऊ सदस्यीय ग्रामपंचायत आहे. आता हे नऊ उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया म्हणजे,

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सगळ्यात आधी गावात दवंडी पिटवून गावकऱ्यांना ग्रामदैवत नागनाथ मंदिरामध्ये बोलवून घेतलं जातं. या बैठकीतच इच्छुक उमेदवार कोण आहेत का? असल्यास कारण विचारलं जातं. परंतु तसं कोणीच तयार होत नाही असं दिसलं तर मग त्या प्रभागात राहणाऱ्यांनीच नाव द्यायची.

एक नाव द्यायचे. त्या नावास कोणाचा विरोध आहे का? हे विचारायचे. जर कोणाचा विरोध नसला तर तीन प्रभागातली तीन नाव फायनल होतात. आणि कोणाचा विरोध असलाच तर तो विरोध सामोपचाराने तिथेच सोडवला जातो. मग गट तट बघितले जात नाही. फक्त उमेदवार म्हणून ठरवला जातो.

मग तेवढ्याच उमेदवारांचे अर्ज भरले जातात. त्याच वेळी सरपंच व उपसरपंच कोणाला करायचं हे पण ठरवलं
जातं. पुर्वी भांडकुदळे गाव म्हणून परिचित असणाऱ्या मळेगावात आता गेल्या ४० वर्षांपासून आजतागायत बिनविरोध कारभार अखंडपणे सुरु आहे.

ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यानंतर पुढचं पाच वर्षांचं कामकाज कसं चालतं याबाबत आम्ही मावळत्या ग्रामपंचायतीचे सरपंच गुणवंत मुंढे यांना संपर्क केला. ते मागील १० वर्षापासून सरपंच आहेत.

गुणवंत मुंढे ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले,

एकदा सगळे उमेदवार निवडून आले की, गावात विरोधाच राजकारण एक दिवस सुद्धा होत नाही. त्यामुळेच विकास काम करताना किंवा पैसे खर्च करताना कसलाच अडथळा येत नाही.

या एकीमुळेच गाव २०१५ – १६ मध्ये जलयुक्त शिवार योगदानात पहिले आले. २५ लाखांच बक्षिस मिळालं. आर. आर. आबांनी चालू केलेल्या तंटामुक्ती गाव योजनेच ५ लाखांच बक्षिस मिळालं. याला सगळ्याला गावकऱ्यांची साथ होती. त्या निधीच्या जोरावर आम्ही गावात आरओ पाणी प्रकल्प सुरु केलं. त्यातुन सगळ्या घरांत पिण्याच शुद्ध पाणी पोहचत.

अलिकडेच गावातल्या तळ्याच्या रुंदीकरण आणि खोलीकरणासाठी आम्ही गावच्या स्मशानभुमीच स्थलांतर केलं. सगळे गावकरी आणि सदस्य यांनी मिळून हा निर्णय घेतला होता. त्यामुळे कसलाच जातीवाद न राहता गावामध्ये एकी म्हणजे काय असते, हे मळेगावकरांनी दिलं आहे. यातील एकाही प्रकल्पाला विरोध नव्हता.

गावातल्या विरोधातील राजकारणाची परिस्थिती कशी असते हे समजून घेण्यासाठी आम्ही दुसऱ्या गटाचे सदस्य आणि माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत गडशिंग यांना संपर्क केला.

प्रशांत गडशिंग ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले,

विरोध कुठे असतो तर सुरुवातीला फक्त उमेदवार ठरवताना. ही एका दिवसात पुर्ण होणारी प्रक्रिया नसते. चार – पाच दिवस हा कार्यक्रम चालतो. विरोध असला तर तो तिथे सामोचराराने मिटवला जातो.

पुढचे पाच वर्ष विकासकाम करताना कुठे ही विरोध नसतो. भले मग कोणत्याही गटाचा सरपंच असो. मी स्वतः पाच वर्ष सरपंच होतो. परत गावकऱ्यांनीच पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून दिलं. ग्रामपंचायतीत गट असले तरी पक्षीय लेबल नाही.

गावातील गटातटाच्या राजकारणानंतर विधानसभा, लोकसभा यांच राजकारण समजून घेण्यासाठी माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन पवार यांच्याशी बोललो.

ते ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले,

गट ग्रामपंचायत पातळीवर जरी असले तरी तेवढ्यापुरतेच असतात. विधानसभा लोकसभा यांच्या निवडणुकीला ज्याचा त्याला मतदान करण्याचा स्वातंत्र्य असतं. व्यक्ती बघून मतदान केलं जातं. या पक्षाकडं गाव आहे, त्या पक्षाकडं गावं आहे असं नाही.

ग्रामपंचायतीला पण पक्षीय राजकारण होत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत पण या पक्षाच्या आमदारांकडे वगैरे आहे अशी गोष्ट नाही.

तर अशा या मळेगावने गेल्या ४० वर्षापासून (आठ पंचवार्षिक) ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा जोपासली आहे. त्यामुळे आता ९ वी निवडणूक बिनविरोध होणार की लागणार, याकडे तालुक्याचे आणि गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.