महाजनांनी दिलेली ५ रुपयांची उधारी हेमा मालिनी कधीच विसरल्या नाहीत..

भारतीय जनता पार्टीची चांगली, वाईट जी काही घोडदौड सुरू आहे ती पाहायला पक्षाचे काही नेते आज हयात असायला हवे होते. त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवते. यातील दोन महत्वाची नावं म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन. या दोन्ही व्यक्तिमत्त्वांनी भारतीय जनता पार्टीची उत्तम अशी पायाभरणी केली. अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन या दोघांनी काम केलं.

प्रमोद महाजन यांची जुनी भाषणं अजूनही जेव्हा ऐकण्यात येतात, तेव्हा संभाषण चातुर्य म्हणजे काय, याचा अनुभव येतो.

पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट मध्ये प्रमोद महाजन यांनी पॉलिटिकल सायन्स, फिजिक्स आणि पत्रकारिता या विषयात शिक्षण पूर्ण केले. पुढे आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ कॉलेजमध्ये ते शिकायला गेले. इथेच त्यांचे सहकारी मित्र होते गोपीनाथ मुंडे. राजकारणात येण्याआधी त्यांनी आंबेजोगाई येथील खोलेश्वर कॉलेजमध्ये इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली. १९७१ ते १९७४ अशी जवळपास ४ वर्ष ते नोकरी करत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खंदे प्रचारक असलेले प्रमोद महाजन आणीबाणीच्या काळात सक्रिय झाले.

प्रमोद महाजन हळूहळू राजकारणात स्वतःचं नाव कमवत होते तर दुसरीकडे बॉलिवुडमध्ये हेमा मालिनी दिलखेचक अदांनी बॉलिवुड गाजवत होत्या.

तामिळ अय्यंगार कुटुंबात जन्मलेल्या हेमा मालिनी यांनी ११ वी नंतर स्वत:ला अभिनयाच्या क्षेत्रात झोकून दिले. सुरुवातीला काही सिनेमांमधून छोट्या भूमिका करून ‘सपनो के सौदागर’ सिनेमात त्यांनी राज कपूर सोबत स्क्रीन शेयर केली. आणि तेव्हापासून हेमा मालिनी या सर्वांसाठी ‘ड्रीम गर्ल’ झाल्या.

एकाच काळात वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमवत असणारी ही दोन माणसं. प्रमोद महाजन आणि हेमामालिनी या दोघांचा एक किस्सा.

प्रमोद महाजन आणि हेमा मालिनी यांचा प्रत्यक्ष परिचय असा नव्हता. १९९९ साली पंजाब येथे लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं होतं. अभिनेते विनोद खन्ना पंजाब येथील
गुरुदासपूर येथे भाजप चे उमेदवार होते. त्यावेळी विनोद खन्ना यांना पाठिंबा देण्यासाठी हेमा मालिनी भाजप च्या प्रचारसभेत सामील झाल्या. पुढील वर्षात त्या स्वतः भारतीय जनता पक्षा मध्ये सहभागी होतील, याची त्यांना कल्पनाही नव्हती.

या काळात प्रमोद महाजन हेमा मालिनी यांच्या व्यक्तिमत्वात असलेल्या गुणांचं निरीक्षण करत होते.

पार्टीतल्या इतर महत्वाच्या सदस्यांकडे ते हेमा मालिनी यांच्या नावाची शिफारस करायचे. विनोद
खन्नांच्या निमित्ताने हेमा मालिनी यांचा भाजप बरोबर संबंध आलाच होता. अखेर २००४ सालच्या फेब्रुवारी महिन्यात हेमा मालिनी भाजप मध्ये प्रवेश घेण्यास तयार झाल्या.

हेमा मालिनी भारतीय जनता पक्षाच्या ऑफिसमध्ये आल्या. पक्षामध्ये अधिकृत प्रवेश घेण्यासाठी एक फॉर्म त्यांना भरावा लागणार होता. या फॉर्मचे पाच रुपये देणं गरजेचं होतं. हेमा मालिनी यांना ही कागदोपत्री प्रक्रिया ठाऊक नव्हती. त्यामुळे त्यांनी येताना सोबत पर्स वैगरे बाळगली नव्हती. हेमा मालिनी यांना आलेली अडचण तिथे उपस्थित असलेल्या प्रमोद महाजन यांनी ओळखली.

प्रमोद महाजन यांनी स्वतःकडे असलेले पैसे हेमा मालिनी यांना दिले. आणि ते म्हणाले,

“हेमा जी, ये मेरे पाॅंच रुपये आप पर उधार रहेंगे.”

आणि इथे पहिल्यांदा प्रमोद महाजन आणि हेमा मालिनी यांची ओळख झाली. पुढे हेमा
मालिनी यांना प्रमोद महाजन यांनी खूप सपोर्ट केल्या. राजकारणातल्या अनेक गोष्टी सांगितल्या.

३ मे २००६ रोजी प्रमोद महाजन यांचं दुर्दैवी निधन झालं. तेव्हा त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी हेमा मालिनी आल्या होत्या. त्यावेळेस प्रमोद महाजन यांनी मोक्याच्या क्षणी केलेली पाच रुपयाची मदत हेमा मालिनी यांना आठवली. भावूक मनाने हेमा मालिनी यांनी प्रमोद महाजन यांच्या पार्थिवाजवळ पाच रुपयांची नोट ठेवली. आणि जड अंतःकरणाने प्रमोद महाजन यांनी केलेल्या मदतीची परतफेड केली.

काही निखळ नाती ही शब्दांच्या पलीकडली असतात. प्रमोद महाजन आणि हेमा मालिनी यांच्यातलं निखळ नातं सुद्धा असंच काहीसं…

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.