सनातन्यांनी बंद पाडलेलं गाढवाचं लग्न बाळासाहेबांच्या मदतीने पुन्हा उभं राहिलं

पन्नाससाठ वर्षांपूर्वी पारंपरिक तमाशाकलेपासून ते आजच्या सिनेमापर्यंत, प्रकाश इनामदार, मोहन जोशी यांच्या पासून ते मकरंद अनासपुरे यांच्या पर्यंत महाराष्ट्राच्या अनेक पिढयांना हसवत आलेला वग म्हणजे गाढवाचं लग्न.

सत्तरच्या दशकात हरिभाऊ वडगावकर यांनी हे वगनाट्य लिहिलं. यातील प्रमुख भूमिका राजा शिवणेकर, वसंत अवसरीकर, प्रभाताई शिवणेकर यांनी रंगवल्या होत्या. पण या वगाचा खरा स्टार होता तो म्हणजे सावळ्या कुंभार झालेले दादू इंदुरीकर.

त्यांचं कॉमेडीचा टायमिंग अफलातून होतं. दादुंचा पोट धरून हसायला लावणारा विनोद ग्रामीण-शहरी अशा दोन्हीकडच्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. ‘गाढवाचं लग्न’चे प्रयोग महाराष्ट्रात खेडोपाडी गाजत होते.

पण यातील काही द्विअर्थी संवाद त्याकाळच्या कट्टर विचारांच्या लोकांना पसंत पडत नव्हते. यातूनच एकदा सातारा सांगली परिसरात तमाशाच्या कनातीला विरोधकांनी आग लावून दिली. दादू मारुती इंदुरीकर, शंकरराव शिवनेकर यांनी रक्ताचे पाणी करून हा फड उभा केला होता. तो संपूर्ण जळून खाक झाला. ते रस्त्यावर आले.

दलित पँथरचे संस्थापक व सुप्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ हे इंदुरीकरांचे नातेवाईक लागत होते. त्याकाळी दलित पँथरची चळवळ गाजत होती. नामदेव ढसाळ यांच्या साहित्याने दलित क्रांतीला आकार देण्याच्या दृष्टीने मोठं काम केलं होतं . त्यांच्याकडे गेलं तर आपल्याला मदत मिळून गाढवाचं लग्न पुन्हा उभं करता येईल असं इंदुरीकर यांना वाटत होतं. ते ढसाळांना भेटायला मुंबईला आले.

आपल्या मामांचं म्हणणं ढसाळांनी ऐकून घेतलं. पण दलित पँथरचे मुंबईत लाखोंनी सभा गट असल्या तरी पैशाच्या बाबतीत ते दुबळेच होते. सरकारी मदत मिळवून देणे तर अशक्यप्राय होते. अखेर नामदेवरावांनी त्यांना मातोश्रीवर आणलं.

खरं तर त्याकाळात दलित पॅन्थर आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरुद्ध आक्रमकपणे उभे ठाकले होते. वरळीच्या दंगलीनंतर या दोन्ही संघटनांमध्ये विस्तव जात नव्हता. डोक्यात राख घालून घेऊन एकमेकांविरुद्धची गरळ ओकली जात होती.

पण तरीही नामदेव ढसाळ यांना दादू इंदुरीकर यांना न्याय ठाकरेंच्या दरबारातच मिळेल याची खात्री होती.

मातोश्रीवर पोहचल्यावर ढसाळ आले आहेत याची वर्दी आत गेली. बाळासाहेबांना देखील याच आश्चर्य वाटलं. त्यांनी त्यांना बैठकीच्या खोलीत बोलवून घेतलं. दादू इंदुरीकरांनी आपली सगळी शोकांतिका त्यांना ऐकवली. बाळासाहेब राजकारणात जरी आले असले तरी ते मूळचे कलाकार. आपल्या समोर एक लोककला रस्त्यावर येत आहे हे कळल्यावर त्यांचं संवेदनशील मन द्रवल.

बाळासाहेब अचानक उठले आणि आतल्या खोलीत गेले. ढसाळ व मंडळींना कळेचना काय झालं. पण काही क्षणातच बाळासाहेब परत आले. त्यांच्या हातात एक मोठं पुडकं होतं. ते पुडकं त्यांनी दादू इंदुरीकरांच्या हातात सोपवलं. त्यात पन्नास हजारच्या आसपास रक्कम होती. त्याकाळच्या मानाने हे खूप पैसे होते.  किमान ढोलके,तुणतुणे, हार्मोनियम, संपूर्ण वगाला नवीन पोशाख घेण्याइतपत हे पैसे पुरेसे होते.

बाळासाहेबांनी दिलेल्या मदतीवर नव्या जिद्दीने दादू इंदुरीकरांनी हा गाढवाचं लग्नचा प्रयोग पुन्हा उभा केला.

अशाच एका प्रयोगाला ढसाळांनी बाळासाहेबांना आमंत्रण दिलं. जुन्या पौराणिक कथांवर आधारित असलेला हा वग. त्यातले मुख्य पात्र सावळ्या कुंभार यास एक साधू स्वर्गात घेऊन जातो. स्वर्गात इंद्राचा दरबार भरलेला. पृथ्वीतलावरचा हा माणूस माणसाच्या नजरेने देवांच्या रंगलेला पाहतो. निराश होतो. त्यांच्यावर टीकाटिप्पणी करतो.

सुरवातीला अनेकांना वाटत होतं कि शिवसेनाप्रमुखांना हे वग आवडणार नाही. त्यातले द्विअर्थी संवाद ऐकून बाळासाहेब चिडतील. पण तस काहीच घडलं नाही. उलट अगदी गडगडाटी हसून दाद देत त्यांनी हा प्रयोग पाहिला , एन्जॉय केला.

त्या दिवशी बाळासाहेबांनी ढसाळांना जिंकलं.

नामदेवराव ढसाळ आपल्या एका लेखात म्हणतात, बाळासाहेब खुन्नस ठेवणारे नेते नव्हते. त्यांच्याइतका मित्रांवर आणि शत्रूंवर प्रेम करणारा दुसरा राजकारणी मी पहिला नाही. दादबाच नाही तर अनेक दुःखितांना त्यांनी मदत केली. हि संख्या लाखाच्यावर असेल.अनेकांना पोटापाण्याला लावलं. कित्येकांवरील अन्याय अत्याचार दूर करून त्यांना आधार देणारे शिवसेनाप्रुख यांचे चरित्र या अर्थाने संपृक्त आहे.

तेव्हा जे गाढवाचं लग्न पुन्हा उभं राहिलं त्यानंतर त्याकडे कोणी डोळे वटारून पाहण्याचं धाडस करू शकलं नाही.

पु. ल. देशपांडेंनी इंदुरीकरांना ‘महाराष्ट्राचा पॉलमुनी’ म्हटले तर शंकर घाणेकरांनी त्यांना ‘वगसम्राट’ अशी पदवी दिली. गाढवाचं लग्नच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा भाग असलेली तमाशाकला दादुंनी शहरी भागातील पांढरपेशा वर्गामध्ये सुप्रसिद्ध केली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.