युद्ध न लढता भारतीय सैन्याने मुशर्रफला ३ आठवड्यात गुडघ्यावर आणलं होतं.

१३ डिसेंबर २००१. भारताच्या सार्वभौमत्वाची ओळख असलेल्या संसदेवरच दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. लश्कर-ए-तैय्यबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या ९ दहशतवाद्यांनी गाडीवर होम मिनिस्ट्रीच लेबल लावून संसदेच्या आवारात प्रवेश केला. गेट वरील सुरक्षारक्षकांची नजर चुकवून ए. के ४७, ग्रेनेड, पिस्टल अशा बऱ्याच साहित्यासह गाडी आत आली होती.

त्यावेळी राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सदन स्थगित होती. संसद भवन परिसरात बरेच खासदार उभे होते. 

दहशतवाद्यांची गाडी गडबडीमध्ये उप-राष्ट्रपति कृष्णकांत यांच्या गाडीला जाऊन धडकली. गाडीतून खाली उतरत त्यांनी दनादन फायरिंग सुरु केलं. सीआरपीएफ आणि पोलिसांनी लगेच प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. जवळपास १ तास चालेल्या या गोळीबारात सगळे अतिरेकी ठार झाले.

५ पोलीस शाहिद झाले. एक माळी देखील मारला गेला.

यानंतर केंद्रीय कॅबिनेटची तात्काळ बैठक झाली. पंतप्रधानपदी होते अटलबिहारी वाजपेयी.

या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे मिळले. यावर प्रत्युत्तर देण्यासाठी आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने १५ डिसेंबर रोजी ऑपरेशन पराक्रम लॉन्च केलं. 

पंतप्रधान वाजपेयी यांनी भारतीय सेनेला नियंत्रण रेषेकडे कूच करण्याचे आदेश दिले. १९७१ च्या भारत – पाक युद्धानंतर पहिल्यांदाच मोठ्या संख्येने सैन्य सीमेवर आणण्यात आले होते. पाकिस्तानने देखील त्यांचं सैन्य सीमेवर आणलं. दोन्ही कडील मिळून जवळपास ८ लाख सैन्य समोरासमोर होते. अगदी युद्ध सदृश्य परिस्थिती होती.

दोन्ही देशांमधील तणावग्रस्त परिस्थिती पाहून जगभरातून मध्यस्थी होऊ लागली. सगळ्यात जास्त पुढाकार होता अमेरिकेचा. त्याचे कारण त्याच वर्षी अमेरिकेवर देखील हल्ला झाला होता. आणि त्यांचं अफगानिस्तान मध्ये युद्ध सुरु होते. यासाठी त्यांना पाकिस्तानची सगळ्यात जास्त गरज होती.

माहोल भारताच्या बाजूने होता. त्यामुळेच संरक्षण तज्ञ सांगतात की, जर त्यावेळी भारतने मनात आणलं असतं तर सेना नियंत्रण रेषा पार करू शकत होती. 

डिसेंबर २००१ च्या शेवटी पर्यंत दोन्ही देशांच्या सीमां बॅलिस्टिक मिसाइल्स, मोर्टार आणि मोठया प्रमाणावर आर्टिलरी तैनात केली गेली. जानेवारी २००२ मध्ये भारताच्या बाजूने ५ लाख सैन्य आणि तीन आर्म्ड डिविजन यांना नियंत्रण रेषेवर सेट करण्यात आलं.

पाकिस्तानच्या बाजूने ३ लाख सैन्याला तैनात करण्यात आलं.

पाकिस्तानच्या तुलनेत सगळ्याच बाजूने भारताची ताकद साहजिकच जास्त होती. भारतीय सैन्य  देखील आक्रमक होते. पण भारताने अजून देखील युद्ध घोषित केले नव्हते किंवा नियंत्रण रेषा पार देखील पार केली नव्हती. यामुळे पाकिस्तानवर कमालीचा दबाव होता, त्यात आंतरराष्ट्रीय दबाव होता तो वेगळाच.

यावर उपाय म्हणून १२ जानेवारी २००२ रोजी पाकिस्‍तानचे तत्कालीन राष्ट्रपति जनरल परवेज मुशर्रफ यांनी भारताला एक आवाहनाचा संदेश देऊ केला.

पाकिस्तान अपनी जमीन से किसी भी आतंकी गतिविधि की मंजूरी नहीं देगा। और साथ ही ६ आंतकवादी संघटनोंपर पाबंदी लगायेगा।

नाक दाबल्यानंतर शेवटी पाकिस्तानने तोंड उघडलेच. भारताची सीमेवरील आक्रमकता पाहून युद्ध न लढताच पाकिस्तान आणि मुशर्रफ गुडघ्यावर आले होते. तणावग्रस्त परिस्थितीमध्ये भारत पाकिस्तान सोबत कसा वागत आहे, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवण्याचा देखील मुशर्रफ प्रयत्न करत होते.

या कारणामुळे वाजपेयी यांना देखील सेनेच्या अधिकाऱ्यांना सध्या कोणतेही युद्ध घोषित करणारा नसल्याचे सांगितले. पण त्यानंतरही सेनेला सीमारेषेवर तैनात ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय सैन्य नियंत्रण रेषा ओलांडण्याच्या आदेशाची वाट बघण्यात कानात प्राण आणून वाट बघत होता. 

भारतासाठी ही सगळ्यात अवघड वेळ होती. इकडे देशवासीय  वाजपेयींच्या आदेशाची वाट बघत होते. पण वेळ पुढे सरकत नव्हती. युद्ध व्हायलाच पाहिजे या मताचे प्रवाह चहुबाजूनी येत होते. पण वाजपेयी शांत होते. पॉलिसी बदलली. त्यावेळी त्यांनी जगातील कोणताही देश करणार नाही अशी गोष्ट करण्याचं ठरवले.

खून का बदला खून से ऐवजी,

सीमेवर आक्रमक परिस्थिती कायम ठेवत चर्चेचा मार्ग अवलंबायचा.   

त्यांच्या मते,

युद्धाचे परिणाम कधीच आणि कोणत्याही परिस्थिती सकारात्मक नसतात. त्यामुळे चर्चा हा सगळ्यात ताकदवान आणि श्रेष्ठ विचार होता. समोरच्याला बोलण्यातून कूटनीतीने झुकायला भाग पडायचं. ऐकायला थोडं कसतरी वाटत असलं तरी हेच सगळ्यात सुरक्षित धोरण आहे.  

त्यामुळे १६ ऑक्टोबर २००२ रोजी ऑपरेशन पराक्रम थांबवण्यात आले. युद्ध न लढता देखील मोठी जीवित हानी झाली होती. जवळपास ७९८ सैनिक शाहिद झाले. दुर्दैवाने हा आकडा १९९९ सालच्या कारगिल युद्धातील शहिदांपेक्षा जास्त होता. 

त्यानंतर पुलाखालून बरचं पाणी वाहून गेलं. पण त्यावेळी भारतीय सैन्य आणि भारत सरकार या दोघांची ही कूटनीती कमालीची यशस्वी ठरली होती,

मुशर्रफ ३ आठवड्याच्या आताच वठणीवर आले होते.

दुसरीकडे युद्ध जाहीर न केल्याने टीका होऊ लागली होती. पण हे देखील तेवढंच खरं होत की भारताने मनात आणलं असत तर हल्ला करू शकला असता. जगातील कोणी काहीच करू शकले नसते. त्यावेळी आपल्याजवळ कारण आणि ताकद दोन्ही गोष्टी होत्या. पण उतावळेपणा सोडून सैन्य आणि सरकार दोघांनी देखील दुरदृष्टी दाखवली होती.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.