महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ म्हणून उदयास आले ते या छत्रपतींमुळे

सातार्‍याचे छत्रपती हे मराठय़ांच्या साम्राज्याचे खरे धनी.  राजाराम महाराज आणि युगपुरुष शिवाजी महाराजांचे वंशज वंशपरंपरेने सातार्‍याच्या गादीवर होते. शंभूपुत्र शाहू महाराज निवर्तल्यानंतर पेशवाईचे महत्त्व वाढले आणि मराठा साम्राज्याच्या कारभाराची सूत्रे त्यांच्या हाती एकवटली गेली.

सन १७९३ च्या सुमारास छत्रपती प्रतापसिंहांचा जन्म झाला. सातार्‍याचे छत्रपती दुसरे शाहू सन १८०८ च्या सुमारास मृत्यू पावल्यावर लहान वयातच प्रतापसिंह छत्रपती झाले. त्यांच्या मातोश्रींच्या मार्गदर्शनाखाली कारभार सुरु केला. 

या काळात छत्रपती आणि पेशवे यांचे संबंध चांगले नव्हते. सातारकरांकडून काही मंडळी पेशवाईच्या विरोधात बंड करत होती. त्यांचा बंदोबस्त करून दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी अल्पवयीन प्रतापसिंह महाराजांना एकप्रकारे कैदेतच ठेवले. 

पुढे मराठा आणि इंग्रज युद्धे होऊ लागली, होळकरांचा संकट देखील डोक्यावर होतं. दुसऱ्या बाजीरावांनी छत्रपतींनि इंग्रजांची मदत घेऊ नयेत म्हणून वासोट्याच्या किल्ल्यावर हलवलं. त्यांच्या  हितचिंतकांची तुरुंगात रवानगी केली.

पुढे १८१७ च्या सुमारास इंग्रजांशी झालेल्या लढाईत पेशव्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर बाजीराव पेशवे पळाले आणि छत्रपती इंग्रजांच्या हाती सापडले. सन १८१८ ला मराठ्यांचा संपूर्ण पराभव करून इंग्रजांनी पेशवाई बुडवली.

मराठ्यांवर विजय मिळवण्यात मुंबईचा गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनचा मोठा हात होता. हा गव्हर्नर मोठा हुशार होता. महाराष्ट्रात छत्रपतींच्या घराण्याचे किती महत्व आहे ते त्याला ठाऊक होते. त्याने मग प्रतापसिंह महाराजांशी तह केला आणि सातारा गादीचे पुनरुथ्थान केले.

१५ सप्टेंबर १८१९ रोजी कंपनी सरकारने करार करून छत्रपती प्रतापसिंह महाराजांना सातारा व आसपासच्या चौदा पेट्यांचे राज्य दिले.

त्यात नीरा व वारणा या नद्यांमधील मुलखाचा समावेश होता. छत्रपतींनी ग्रँड डफ या इंग्रज अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार कारभार चालवावा असे ठरेल. छत्रपतींनी परकीय सत्तेशी पत्रव्यव्हार करायचा नाही. ठरवून दिलेल्या पेक्षा स्वतःची शिबंदी वाढवायचे नाही अशा अटी इंग्रजांनी तहामध्ये टाकल्या होत्या.

हा ग्रँड डफ साताऱ्यात तीन वर्षे होता. या काळात त्याने राज्यकारभारात मदत तर केलीच शिवाय त्याने मराठा रियासतीचा सगळं इतिहास धांडोळून काढला. इंग्लंडला परत गेल्यावर त्याने हा सगळं इतिहास लिहून काढला. त्याच्यानंतर साताऱ्याचा पॉलिटिकल एजंट म्हणून कॅप्टन ब्रिग्जची नियुक्ती झाली.

सातारा आणि आजूबाजूचा प्रदेश या छोट्याशा राज्यातही छत्रपतींनी सुधारणा करण्यास सुरवात केली.

अनेक इंग्रज अधिकारी हे भारतीय हवामानाशी जुळवून घेताना आजारी पडत असत. त्यांना थंड हवेच्या ठिकाणी जाण्याची ओढ असायची. एकदा बोलता बोलता छत्रपतींनी जावळी खोऱ्यात असलेल्या पुरातन  महाबळेश्वर क्षेत्राचा उल्लेख इंग्रजांपाशी केला.

प्रतापसिंह महाराजांनी केलेल्या महाबळेश्वरच्या सृष्टिसौंदर्याचे वर्णन ऐकल्यावरून कर्नल लॉडविक याने १८२४ मध्ये या भागाची पायी फिरून पाहणी केली. त्याने ब्रिग्ज याला इथे सॅनेटोरियम उभारता येऊ शकेल असे सांगितले. १८२६ मध्ये जनरल ब्रिग्ज याने येथे एक कुटी उभारली.

छत्रपतींनी इंग्रजाना सातारा ते महाबळेश्वरला जाणारा रस्ता बांधून दिला.

हा रस्ता झाल्यानंतर महाबळेश्वरला जाणारी वर्दळ वाढू लागली. पुढे महाराजांनी हाच रस्ता वाढवून प्रतापगडपर्यंत नेला. इथून कोकणात उतरणे सोपे झाले.

मुंबईचा गव्हर्नर सर जॉन मॅल्कम हा महाबळेश्वर येथे आला. त्याने येथे युरोपीय सैनिकांकरिता एक रुग्णालय बांधले. या सर मॅल्कमच्या समरणार्थ छत्रपतींनी महाबळेश्वर येथे माल्कम पेठ वसवली आणि महाबळेश्वर क्षेत्र विकसित करण्यास सुरवात केली.

खरेतर या मॅल्कमचा आग्रह होता की या पेठेला प्रतापसिंह महाराजांचेच नाव द्यावे पण छत्रपतींनी याला आदरपूर्वक नकार दिला.

१८२८ मध्ये मॅल्कम पुन्हा येथे आला. येताना त्याने डॉ. विल्यम्‌सन याला आणले आणि येथील हवामानाच्या परिस्थितीचा अहवाल त्याची येथेच नेमणूक केली. महाबळेश्वर येथे  कोळी, धनगर, धावड व कुळवाडी या येथील मूळच्या जमाती होत्या. पुढे इंग्रजानी चिनी व मलायी कैदी ठेवण्याकरिता येथे १२० कैदी राहतील एवढा कैदखाना बांधला.

या चिनी कैद्यांनी बटाट्याची व विलायती भाजीपाल्यांची लागवड ऊर्जितावस्थेत आणली. सरकारकडून भाजीपाला उत्पादनात चिनी गुन्हेगारांचा उपयोग करून घेण्यात येऊ लागला. काही कालावधीतच एक प्रसिद्ध गिरिस्थान म्हणून माल्कमपेठ (महाबळेश्वर) भरभराटीस आले.

१९२९ साली झालेल्या एका करारात गव्हर्नर मॅल्कम याने गिरिस्थान महाबळेश्वरची जागा साताऱ्याच्या महाराजांकडून दुसऱ्या एका जागेच्या मोबदल्यात घेतली.  या करारानुसार छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी मानल्या जाणाऱ्या भवानीमातेच्या मंदिराचा आणि प्रतापगडाचा ताबा सातारच्या छत्रपतींकडे आला.

माल्कमपेठची स्थापना झाल्यानंतर डॉ. मरे यांनी महाबळेश्वरच्या विकासातील पहिला रस्ता माल्कमपेठ ते एल्फिस्टन पॉर्इंटपर्यंत तयार केला. मुंबई प्रांताचे पहिले गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांचेच नाव या पॉईंटला देण्यात आले.

कृष्णा कोयना या नद्यांचा उगम असलेले हे उबदार हवामानाचे ठिकाण इंग्रजांना प्रचंड आवडले. फक्त रुग्णच नाही तर इतर ब्रिटिश अधिकारी देखील इथे हवापालट करण्यासाठी येऊ लागले.

पुढच्या शंभर वर्षात आर्थर सीट, केट्‌स पॉइंट, सिंदोला, विल्सन पॉइंट, क्षेत्र महाबळेश्वर, वेण्णा लेक , लिंगमळा धबधबा, सूर्यास्ताचे बाँबे पॉइंट प्रसिद्ध झाले. दरवर्षी लाखो पर्यटक महाबळेश्वरच्या भेटीला येऊ लागले.

आजही महाबळेश्वर भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. प्रत्येक इंग्रजाने आपल्या आठवणी जोडून हे महाबळेश्वरच्या पर्यटनाचे पॉईंटची नावे फेमस केली. मात्र दुर्दैव म्हणजे ज्या छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचा हे शहर वसवण्यात सिंहाचा वाटा आहे त्यांच्या नावे एक बाग सोडल्यास कोणतेही स्मृतिस्थान नाही.

महाबळेश्वर वसवण्यात मदत करणाऱ्या या छत्रपतींचे कौतुक गव्हर्नर मॅल्कमने इंग्लंडच्या राणीपर्यंत केले होते. मात्र पुढच्या काळात इतर इंग्रज अधिकाऱ्यांच्या मस्तरामुळे छत्रपतींचे कंपनी सरकारशी  खटके उडू लागले. स्वाभिमानी असलेल्या छत्रपतींना इंग्रजांची बंधने आता बोचू लागली.

अखेर छत्रपतींवर इंग्रजांनी राजद्रोहाचा आरोप ठेवला. आरोप कबूल केल्यास गादीवर ठेवू अन्यथा राज्यास मुकाल, असा तिढा त्यांना टाकला. या गोष्टीस छत्रपतींनी बाणेदारपणे नकार दिला. तेव्हा त्यांना गादीवरून दूर करून त्यांची रवानगी काशी येथे केली गेली. तेव्हा आपला स्वामीनिष्ठ वकील रंगो बापूजी यास आपली कैफियत मांडण्यासाठी त्यांनी इंग्लंडला पाठवले.

‘‘राज्य जाईल अशी धमकी कशाला देता? मी राज्याची हाव कधीच धरली नाही.’’

असे बाणेदार उत्तर त्यांनी इंग्रजांना दिले होते. पण अखेर १४ ऑक्टोबर १८४७ रोजी प्रतापसिंह भोसले यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या काही वारसांना इंग्रजांनी गादीवर बसवते. परंतु पुढे दत्तक वारस नामंजूर करून १८४८ च्या सुमारास सातारचे राज्य खालसा करण्यात आले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.