बाळासाहेब म्हणाले, “नितीन जातीपातीचा फालतूपणा आम्हाला शिकवू नकोस.”

ग्राम पंचायत असो कि राष्ट्रपती निवडणूक कुठेही जावा सगळीकडे निवडणूका जातीवर लढवल्या जातात. फक्त भारतात नाही तर सगळ्या जगातल्या मतपेटीचे हेच सत्य आहे.  गठ्ठा मतदानाच्या साठी सोयीस्कर जातीचे उमेदवार उभे करणे हि राजकीय पक्षांची स्ट्रॅटेजी असते.

पण हे सगळं खोटं ठरवलं एका माणसाने,

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार होते. मुख्यमंत्रीपद मनोहर जोशींकडे तर उपमुख्यमंत्रीपद गोपीनाथ मुंडेंकडे अशी वाटणी होती. मात्र सत्तेचा रिमोट बाळासाहेब ठाकरेंच्या हातात होता.

नितीन गडकरी तेव्हा पहिल्यांदाच मंत्री बनले होते. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते देण्यात आले होते. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वगैरे कामांची जोरदार सुरवात करून त्यांनी चांगलंच नाव कमावलं होतं.  धडाक्यात निर्णय घेणारा  म्हणून नितीन गडकरी फेमस झाले होते.

त्यांचा स्वभाव देखील असाच अघळपघळ होता. कोणालाही भीडभाड न ठेवता दिलखुलास बोलणारे गडकरी अगदी बाळासाहेबांचे लाडके होते. कित्येकदा गप्पा मारायला म्हणून ते मातोश्रीवर जायचे. मनोहर जोशी देखील बाळासाहेबांना काही सांगायचं असेल तर गडकरींना मध्ये घालायचे.

१९९६ च्या लोकसभा निवडणुका आल्या होत्या. युतीच्या उमेदवारांच तिकीट वाटप सुरु होतं. प्रत्येक जागेवर तुंबळ युद्ध सुरु होतं. कधी नव्हे ते शिवसेना आणि भाजपकडून तिकीट मागण्याऱ्यांची संख्या वाढली होती. बाळासाहेब स्वतः शिवसेनेचे उमेदवार ठरवत होते.

एकदा गडकरी मातोश्रीवर गेले होते. त्यांच्या बाळासाहेबांबरोबर तिकीट वाटपाच्या गप्पा सुरु होत्या. बोलता बोलता त्यांनी सहज  अमरावतीच्या निवडणुकीबद्दल विषय काढला. जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटणीला आला होता. बाळासाहेबांनी तिथे अनंतराव गुढे यांना तिकीट दिलं होतं.

गडकरी बाळासाहेबांना म्हणाले,

“साहेब, अमरावती हा मतदारसंघ पाटील कुणबी समाजाचा आहे. अनंत गूढेचे चारशे पण मत नाहीत. त्याला तिकीट दिलं तर लंब होईल दुकान आपलं. हा काही जिंकत नाही साहेब. हट्ट असेल तर द्या त्याला तिकीट.”

नितीन गडकरी यांचा स्वभाव स्पष्टवक्ता आहे हे बाळासाहेबांना देखील ठाऊक होतं. ते त्यांना म्हणाले,

“ए नितीन हा जातीपातीचा फालतूपणा मला शिकवू नकोस. जातपात मी पाळत नाही. माझा जो सैनिक असेल तोच निवडणुकीला उभा राहील. मला हे बिलकुल शिकवायचं नाही.”

गडकरी त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करत राहिले. पण बाळासाहेबांनी जराही ऐकून घेतलं नाही. त्यांनी अनंत गुढे यांनाच उभं केलं.

अमरावती म्हणजे प्रतिभा ताई पाटील यांचा मतदारसंघ. त्यांची राज्यपालपदी निवड झाल्यामुळे हि जागा रिकामी झाली होती. त्यांच्याजागी काँग्रेसने तगडा उमेदवार उभा होता याशिवाय रिपब्लिकन पक्षाचे रा.सु.गवई देखील उभे होते. गुढे यांचं डिपॉजिटदेखील जप्त होईल असा विश्वास काँग्रेसचे कार्यकर्ते व्यक्त करत होते.

मात्र घडलं उलटंच. काँग्रेस उमेदवार तिसऱ्याच क्रमांकावर फेकला गेला. जातीपातीची गणिते फोल ठरवत बाळासाहेबांचा शिवसैनिक निवडून आला होता.

गडकरी यांनी स्वतः हा किस्सा सांगितला आहे. ते म्हणतात मी बाळासाहेबांकडून खूप शिकलो. निवडणुकीत जातीपातीच्या गणिताला घाबरायचं नाही. आजही ते आपल्या भाषणात बाळासाहेबांचं एक वाक्य नेहमी सांगतात,

“माणूस जातीने नाही तर गुणाने मोठा होतो.”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.