होळकर घराण्याचे खरे वारसदार कोण आहेत?

होळकर घराणे म्हणजे उत्तरेत मराठ्यांचा राज्यविस्तर करून डौलाने झेंडा फडकवत ठेवणारे घराणे. त्यांचे संस्थान म्हणजे मध्यप्रदेशातील इंदोर.

त्यांचा मूळ पुरुष म्हणजे हिंगोजी. त्यांना दोन मुलं. एक खंडोजी आणि दुसरा जिवाजी. खंडोजी हे धनगर जातीचे आणि पेशाने शेतकरी होते. त्यांच्याकडे चौगुला हे वतन होते.

याच खंडोजी यांचा मुलगा मल्हारराव (१६९३–१७६६) यांनी या होळकर घराण्याची स्थापना केली.

इतिहासकार म. रा. कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार मल्हारराव यांचे पूर्वज खान्देशातील वामगावी राहायचे. तर काही इतिहासकरांचे मते पूर्वी हे घराणं खेड तालुक्यातील वाफगावमध्ये राहायचे. मात्र नंतर ते नीरेच्या होळ या गावी स्थायिक झाले, त्यावरून त्यांना होळकर हे नाव मिळाले.No photo description available.

२. खंडेराव होळकर : 

मल्हारराव यांचा एकुलता एक मुलगा खंडेराव यांचा विवाह अहिल्याबाईंशी झाला. त्यांना मालेराव हा मुलगा तर मुक्ताबाई ही मुलगी होती. खंडेराव मल्हाररावांबरोबर युद्धावर देखील जात असतं. १७४० मध्ये त्यांना शिलेदारीची वस्त्रे मिळाली. १७५४ साली कुंभेरीच्या वेढ्यात खंडेरावांना तोफेचा गोळा लागला आणि त्यातच त्यांचं निधन झाले. 

३.मालेराव होळकर – अहिल्यादेवी होळकर :

त्यांच्या मृत्यूनंतर मल्हारराव होळकर यांनी खंडेरावांचा मुलगा मालेराव यांना गादीवर बसविले. मात्र पुढे अवघ्या १० महिन्यांमध्येच मालेराव यांचा मृत्यू झाल्याने राज्य कारभाराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आई अहिल्याबाई होळकर यांच्यावर आली. त्यांनी आपल्या पराक्रमाने संस्थानचे रक्षण केले. 

४. अहिल्यादेवी होळकर – तुकोजीराव होळकर :

याच काळात मल्हाररावांनी आपले काका जिवाजी होळकर यांची तिसरी पिढी आणि खंडेराव यांचे मोठे भाऊ तुकोजीराव होळकर यांना आपले मानसपुत्र मानले. पुढे १७६६ साली मल्हारराव होळकर यांचं निधन झाले, आणि होळकरशाहीत दुहेरी राज्यव्यवस्था सुरु झाली.

अहिल्याबाईनी मल्हाररावाचा मानसपुत्र तुकोजीराव यांस सेनापतिपद दिले.

यात प्रशासकीय गोष्टीवर अहिल्यादेवी नियंत्रण ठेवत असत तर लष्करी कारवायांमध्ये तुकोजीराव प्रत्यक्ष भाग घेत असत. याकाळात अहिल्यादेवी होळकर या होळकरशाहीच्या रिजंट महाराणी होत्या. 

पुण्याजवळील वानवडी येथे १५ ऑगस्ट १७९७ रोजी ते मरण पावले. 

५. मल्हारराव होळकर दुसरे : 

तुकोजीरावांना काशीराव आणि मल्हारराव (दुसरे) हे दोन औरस पुत्र तर यशवंतराव व विठोजी असे यमुनाबाई या दासीपासून झालेले पुत्र होते. तुकोजीरावांनी मृत्यूपूर्वी आपल्यानंतर काशीराव या मोठ्या मुलाने सुभेदार व्हावे, अशी व्यवस्था केली होती पण ते कर्तृत्ववान नव्हते.

त्या मानाने मल्हारराव हुशार व कर्तबगार होते. त्यामुळे पेशव्यांनी मल्हाररावांना सुभेदारीची वस्त्रे दिली. त्यांना दौलत-राव शिंदे यांनी क्लृप्तीने ठार मारले. त्याच सुमारास बापू गोखले यांनी विठोजी यांना पकडून पुण्यात आणून ठार मारले.

६. यशवंतराव होळकर : 

यशवंतराव होळकर यांनी आपल्या सर्व बंधूंच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी पुणे सोडून उत्तरेत गेले. आणि आपला पुतण्या खंडेराव (मल्हारराव होळकर दुसरे यांचा मुलगा) यांच्या नावाने कारभार सुरू केला. त्यांना होळकरशाहीतील जुन्या लोकांनी मदत केली.

यशवंतरावांची १ पेक्षा अधिक लग्न झाली होती. त्यांच्या पहिल्या पत्नी कृष्णा यांनी जिवाजी यांच्या पिढीतील मार्तंडराव, हरिराव, खंडेराव आणि तुकोजीराव (दुसरे) यांना दत्तक घेतले. तर केसरबाई या पत्नीपासून मल्हारराव (तिसरा) हा मुलगा झाला. 

७. मल्हारराव होळकर (तिसरे) – तुळसाबाई : 

याच मल्हारराव होळकर यांच्या नावे तुळसाबाई या तात्या जोग आणि गणपतराव या मुत्सद्द्यांच्या मदतीने कारभार पाहत होत्या. परंतु त्यांच्याच सैन्याने क्षिप्रा नदीकाठच्या महिदपूर येथे नेऊन त्यांचा शिरच्छेद केला आणि मृतदेह नदीत टाकला. 

त्यानंतर तिसरे मल्हारराव प्रत्यक्ष राज्यकारभार चालवू लागले.

८. हरिराव – खंडेराव होळकर : 

मल्हाररावांच्या मृत्यूनंतर हरिराव व खंडेराव हे गादीवर आले. पण ते अल्पायुषी ठरले. 

९. तुकोजीराव होळकर दुसरे :  

१८४३ मध्ये हरिराव यांचं अपत्यहिन मृत्यू झाल्याने ब्रिटिशांनी यशवंतरावांची पत्नी केसरबाई यांच्या सल्ल्यानुसार तुकोजीराव दुसरे यांना गादीवर बसविले. त्यांच्याकडे इंदोर संस्थानचा विकासपुरुष म्हणून बघितलं जाते. 

१०. शिवाजीराव होळकर : 

तुकोजीरावांच्या निधनानंतर १८८६ साली त्यांचे थोरले पुत्र शिवाजीराव हे गादीवर आले. मात्र त्यांच्या पोरकट स्वभावामुळे राज्यकारभारात सुधारणा तर झाली नाहीच पण १८९९ मध्ये इंग्रजांनी इंदूर दरबारी आपला एक स्वतंत्र प्रतिनिधी नेमला.

११. तुकोजीराव होळकर (तिसरे)

१९०३ मध्ये इंग्रजांनी इंदोर संस्थानचा कारभार शिवाजीराव होळकर यांचे पुत्र तुकोजीराव (तिसरे) यांच्याकडे सोपविला. त्यांनी देखील प्रजाहितामध्ये शिक्षण, शेती, उद्योगधंदे, व्यापार, वैद्यक यांत मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवून आणल्या.

१२. यशवंतराव होळकर (दुसरे) : 

तुकोजीराव होळकर (तिसरे) यांनी निवृत्ती घेऊन आपले पुत्र यशवंतराव दुसरे यांना गादीवर बसविले. त्यांच्या कारकिर्दीतच संस्थान भारत प्रथम विलीन झाले. यशवंतराव यांनी एकूण तीन लग्ने केली होती त्यांची पहिली पत्नी संयोगिता यांच्या पासून उषाराजे आणि मूळच्या  फ्रान्सच्या असलेल्या पत्नी युफेमिया यांच्यापासून रिचर्ड होळकर अशी दोन अपत्य झाली.

१३. उषाराजे होळकर:

द्वितीय यशवंतरावांच्या निधनानंतर होळकर घराण्याच्या गादीवर बसण्याचा मान उषाराजे यांना देण्यात आला. उद्योजक सतीश मल्होत्रा यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्या आता मुंबई येथे राहतात. उषाराजे यांना होळकर घराण्याचा शेवटचा वारसदार मानलं जातं. त्या हयात असे पर्यंत त्यांच्याकडे होळकर गादीचा अधिकार असणार आहे.

१४. प्रिन्स रिचर्ड ऊर्फ शिवाजीराव होळकर

द्वितीय यशवंतरावांच्या युफेमिया या पत्नीपासून झालेले रिचर्ड होळकर. यांचं बालपण फ्रान्समध्येच गेलं. त्यांच्या आई भारतीय नसल्यामुळे रिचर्ड यांना होळकरांच्या गादीवर बसण्याचा मान मिळाला नाही. हे सध्या महेश्वर येथील होळकरांच्या पारंपरिक अहिल्या किल्ल्यामध्ये  राहतात. रिचर्ड यांना दोन मुलं आहेत. सबरीना उर्फ संयोगिताराजे आणि तिसरे यशवंतराजे होळकर.

१५. यशवंतराजे होळकर (तिसरे) 

रिचर्ड होळकर यांचा ३५ वर्षीय पुत्र यशवंतराजे होळकर हे सध्या इंदोरमध्ये राहायला असतात. त्यांचा विवाह गोदरेज समूहातील जमशेद गोदरेज यांची मुलगी नियरिका हिच्याशी झाला असून ते व्यावसायिक आहेत. याच यशवंतराजे यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे उदघाटन होणार होते .

मग आता भूषणसिंहराजे होळकर कोण आहेत?

काल पासून माध्यमांमध्ये अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे उदघाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यास अहिल्यादेवींचेच वंशज भूषणसिंहराजे होळकर यांचा विरोध असल्याचं दिसून येत आहे. तसे त्यांनी पत्र देखील लिहिले.

मात्र यानंतर यशवंतराजे होळकर हे उदघाटनाला येणार असल्याने हा विरोध करणारे नक्की कोण वंशज आहेत, असा प्रश्न विचारला जावू लागला आहे.

तर सुभेदार मल्हारराव होळकर यांचे काका जिवाजी होळकर यांना जानोजी आणि बाबाजी अशी दोन मुलं होती. म्हणजेच हे दोघेही मल्हाररावांचे चुलत बंधू. पुढे जानोजी आणि बाबाजी यांचे कुटुंब विस्तारत गेले.

यात बाबाजी होळकर यांचे तिसरी पिढी भाऊसा होळकर यांना काशीराव हा मुलगा झाला. या काशीराव यांच्या मुलाचे नाव गणपतराव. पुढे गणपतरावांनी मल्हारराव या मुलास दत्तक घेतलं.

या मल्हाररावांना तीन मुलं. प्रतापसिंह, नरहरीराव आणि शिवनारायणराव.

यात शिवनारायण यांना गजेंद्रसिंह आणि संताजीराव अशी दोन मुलं.

याच गजेंद्रसिंह होळकर यांना भूषणसिंहराजे आणि शिवेंद्रसिंह राजे अशी दोन मुलं. 

थोडक्यात भूषणसिंहराजे हे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे काका असलेले जिवाजी होळकर यांची पिढी.

याबद्दल मत जाणून घेण्यासाठी आम्ही भूषणसिंहराजे होळकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तसा संपर्क होऊ शकला नाही. संपर्क झाल्यानंतर ही पोस्ट अपडेट करण्यात येईल.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.