पठाण असल्याचं सिद्ध करण्यापायी कंट्रोल सुटला आणि पाकिस्तानची वर्ल्ड कप मधून सुट्टी झाली

३० मार्च २०११, मोहाली चंदीगड

भारत आणि पाकिस्तान दरम्यान एक महायुद्ध होणार होते. क्रिकेट वर्ल्ड कप. 

अनेक वर्षांनी या दोन्ही टीम एकमेकांच्या विरुद्ध उभ्या ठाकल्या होत्या. संपूर्ण जगाचं लक्ष या मॅचकडे लागलं होतं. यंदाचा वर्ल्डकप आपलाच म्हणून दोन्ही टीम त्वेषाने उतरल्या होत्या. वर्ल्ड कप फायनल पेक्षाही जास्त प्रेशर या मॅचचं होतं.

पाकिस्तानी कप्तान शाहिद आफ्रिदी प्रचंड प्रेशर खाली होता. तर भारताचा कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी नेहमी प्रमाणे निवांत होता. त्याने टॉस जिंकून पहिली बॅटींग निवडली.

सचिन आणि सेहवागने नेहमीप्रमाणे धुंवाधार सुरवात केली. विशेषतः सेहवाग आज वेगळ्याच फॉर्ममध्ये होता. त्याने आपल्या ३८ धावांमध्ये तब्बल ९ चौकातच मारले होते. पण याच मारामारीच्या गडबडीत तो आउट झाला. पुढे मात्र कोणीही खूप चांगली बॅटिंग करू शकलं नाही.

सचिन एकटाच एका बाजूला टिकून होता. त्याच्या समोरून थोड्याफार धाव करून एकेक खेळाडू आउट होत गेले. सुरवातीला सचिनला अनेक जीवदान मिळाले. पण तो दिवस भारताचाच होता. सचिनने केलेल्या ८५ धावांच्या जोरावर आपण पाकिस्तान पुढे २६१ धावांचे लक्ष्य दिले.

पाकिस्तानच्या दृष्टीने हा स्कोर अगदी सहज पार करण्यासारखा होता.

त्यांची सुरवात तशी ठिकठाकच झाली. कामरान अकमल फक्त १९ धावा करून आउट झाला. मोहम्मद हाफिज आणि तीन नंबरचा असद शफिक यांची जोडी जमेल असं वाटत होत पण मुनाफने त्याची विकेट काढली. पुढे रेग्युलर अंतरावर त्यांचे विकेट्स पडत गेले.

३६ व्या ओव्हरला त्यांचा रझाकच्या रूपात ६ वा गडी आउट झाला. पुढच्या १५ ओव्हर मध्ये त्यांना ११० धाव करायच्या होत्या अजून एक पॉवर प्ले शिल्लक होता. क्रीझवर शाहिद आफ्रिदी आणि सेट झालेला मिस्बाह उल हक असे दोघे जण होते.

दोघेहि स्ट्रोक प्लेअर म्हणून फेमस होते. पण आता वेळ विकेट टिकवायची होती.

आयुष्य भर बेधडक खेळणारा शाहिद आफ्रिदी आता मात्र जपून खेळू लागला. आपण आउट झालो तर पुढे फक्त बॉलर्स आहेत याची त्याला जाणीव होती. मिस्बाह सेट झाला होता, एका बाजूला नांगर गाडून पार्टनरशिप लावून धरायची आणि पॉवरप्ले आला की पिटाई करून मॅच खिशात टाकायची असा आफ्रिदीचा प्लॅन होता.

सगळं त्याच्या प्लॅन प्रमाणे व्यवस्थित चालू होतं. आल्यापासून पाच ओव्हर झाले तरी आफ्रिदीने फक्त एकच फॉर मारला होता. सिंगल सिंगल घेऊन त्याने स्ट्राईक रोटेट करत नेलं होतं.

अशातच एकेचाळिसावी ओव्हर टाकण्यासाठी धोनीने हरभजनला बोलावलं.

भज्जी आणि आफ्रिदीची दोस्ती खूप जुनी पुराणी आहे. दोघांचे ऑनफिल्ड बरीच टोमणेबाजी चालते. त्या दिवशी हरभजनने हळू खेळणाऱ्या आफ्रिदीला पठाण असण्याच्या अहंकारावरून डिवचलं होतं. पण आफ्रिदीने स्वतःची एकाग्रता ढळू दिली नाही.

स्ट्राईक वर असलेला मिस्बाह हरभजनच्या फिरकीला जपून खेळू लागला. पहिला बॉल डॉट गेला. दुसऱ्या बॉलला त्याने सिंगल काढली आणि आफ्रिदी स्ट्राईक वर आला.  भज्जीने त्याच्यासाठी ओव्हर द विकेट आला आणि फुल टॉस बॉल टाकला. आफ्रिदीला राहवलं नाही त्याने त्या बॉलला पुढं येऊन वाईड लॉन्ग ऑनला फटका दिला.

धोनीने तिथे प्लेअर उभा करून ठेवला असल्यामुळे बाउंड्री अडली आणि दोन रन्स मिळाले.

मिस्बाह आणि आफ्रिदीमध्ये बोलणं झालं. रिस्क घेण्याची गरज नाही निवांत खेळू असं म्हणत आफ्रिदी परत स्ट्राईक वर आला. ओव्हरचा पाचवा बॉल हरभजन ने पुन्हा फुल टॉस टाकला. सगळं पाकिस्तान म्हणत होता की सोड बाबा पण बूम बूम आफ्रिदीला कंट्रोल झालं नाही.

पाकिस्तानचा फेमस ओपनर आणि फिल्मस्टार मोहसीन खानचा एक डायलॉग त्याला आठवला.

“वो पठान ही क्या जो फुलटॉस छोड़ दे.”

आधीच हरभजनने त्याला बडबड करून बरच खिजवल होतं. त्यात आपण पठाण असण्याचा गर्व दाखवण्याची खुमखुमी आफ्रिदीमध्ये खच्चून भरली होती. त्या क्षणाला तो आपण पाकिस्तानी कप्तान आहे हे विसरला अन  पुन्हा पठाण बनत तो फुल टॉस बॉल उचलला.

द्विधा मनस्थितीमध्ये शॉट बरोबर बसला नाही. मारायचं होत एकीकडं बॉल गेला वेगळीकडं. तिथं एक त्याच्यासारखाच बेधडक माणूस किशोर कुमारची गाणी गुणगुणत फिल्डिंगला उभा होता. बॉल अगदी एखाद फळ टपकाव तसा वीरेंद्र सेहवागच्या हातात जाऊन पडला. बूम बूम आफ्रिदी आउट झाला होता.

त्याच वेळी पाकिस्तानच्या मॅचचा निकाल लागला होता. 

मोहोलीचा स्टेडियम आणि त्याच्याहून अधिक हरभजन सिंग सेलिब्रेशन करत होते. सिंग इज किंग पठाणला भारी पडला होता.  पुढे मिस्बाहने शेवटची शेपूट सोबतीला घेऊन थोडा वेळ वळवळ केली पण मॅचच्या शेवटच्या बॉलला तो स्वतः आउट झाला आणि पाकिस्तान २९ धावांनी वर्ल्ड कप मधून बाहेर पडली.

त्या दिवशी आफ्रिदीला फक्त भारतातच नाही तर संपूर्ण पाकिस्तानातून शिव्या बसल्या असाव्यात. हात तोंडाशी आलेला मौका त्याच्या मुळे पुन्हा गमावला होता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.