शिवरायांना ‘गुरू’ मानून स्वतंत्र राज्य स्थापन करणारे श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे सासरे

“शिवाजी पिछे हुआ बुंदेला बलवान
प्राणनाथ का शिष्य यह छत्रसाल महान”

ही वाक्य कोरली आहेत बुंदेलखंड नरेश महाबली छत्रसाल बुंदेला यांच्या समाधीवर. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू कोण यावरून आजच्या काळात प्रचंड वाद सुरू आहेत.

WhatsApp Image 2021 03 16 at 9.48.59 AM

पण शिवरायांना गुरू मानून त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवून स्वतंत्र राज्य स्थापन करणाऱ्या समकालीन योध्याची ही कहाणी..

मिर्झा राजाची स्वराज्यावर स्वारी झाली होती. प्रचंड मोठे परचक्र महाराष्ट्रावर चालून आले होते. स्वराज्यातील एकूण एक सैनिक एक-एक किल्ल्यासारखा लढत होता. त्याचवेळेस एक सोळा-सतरा वर्षाचा तरुण शिवाजी महाराजांच्या आश्रयास आला. मराठ्यांच्या सैन्यात सामील होण्यासाठी. स्वराज्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करण्यासाठी.

बुंदेलनरेश वीर चंपतराय बुंदेला यांचे पुत्र ‘छत्रसाल’..

औरंगजेबाच्या विरोधात लढता लढता चंपतरायांना वीरमरण आले. आपल्या पित्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हा तरुण अक्षरशः मुघलांच्या फौजेतून मराठ्यांकडे आला होता. तत्कालीन भारतात औरंगजेबाला नेस्तनाबूत करायला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हेच एकमेव समर्थवान राजा होते, याची सर्वांनाच खात्री वाटत होती.

पण आश्रयास आलेल्या या तरुणाला आपल्याकडे नोकरीस ठेवण्याचे सोडून शिवाजी महाराजांनी उदात्त कार्य केले. त्याला अनेक विद्या शिकवल्या. धनुष्यबाण-तलवारबाजी सारख्या कलांमध्ये माहीर केले. राजनीती, युद्धनीती मध्ये त्याला भगीरथ मिळवून दिली.

संपूर्णपणे व्यक्तिमत्व विकास केल्यावर शिवरायांनी छत्रसाल बुंदेलाला ‘स्वराज्य’ स्थापन करण्यास सांगितले.

धन्य धन्य ते छत्रपती.. आपल्या आश्रयास म्हणून आलेल्या एका सामान्य मुलाला असामान्य बनवून त्यास त्याचे राज्य परत मिळवण्यासाठी प्रेरणा दिली. इतकेच नव्हे तर सोने, नाणे, द्रव्य आणि स्वतःकडे असलेली एक तलवार सुद्धा राज्यप्राप्तीसाठी ‘भेट’ म्हणून शिवाजी महाराजांनी दिली. या प्रेरणेतून छत्रसाल मायदेशी परतला. मुघलांच्या सैन्याला अत्यंत कडवा विरोध करत आपले राज्य त्याने वापस मिळवले.

‘छत्रसाल महाबली, कर दे भली कर दे भली’ अशी प्रार्थना संपूर्ण बुंदेलखंडात घुमू लागली.

छत्रसाल आता स्वतःच्या राज्याचा अधिपती बनला.. केवळ आणि केवळ शिवरायांच्या प्रेरणेमुळे.

पुढे, थोरल्या शाहू छत्रपतींच्या काळात बुंदेलखंडावर महंमदशाह बंगशचे आक्रमण झाले. ज्या ज्या वेळेस बुंदेलखंडावर आक्रमण होईल, त्या त्या वेळेस मदत करण्याचे वचन शिवरायांनी दिले होते.याचीच आठवण छत्रसाल महाराजांनी शाहू छत्रपतींना करून दिली. थोल्या शाहू महाराजांनी तात्काळ बाजीराव पेशवे, पिळजीराव जाधव आणि मराठा सरदारांना बुंदेलखंडात जाऊन छत्रसालांची मदत करण्याचा हुकूम दिला. मराठ्यांनी हे सर्वात मोठे संकट अगदी सहजपणे दूर केले.

याच लढाईनंतर छत्रसालाची मुलगी ‘मस्तानीबाईसाहेब’ यांचा बाजीराव पेशवे यांच्यासोबत खांडा पद्धतीने विवाह लावण्यात आला. तसेच, जावई म्हणून बाजीरावांना बुंदेलखंडाचा एक हिस्सा सुद्धा छत्रसालांनी देऊ केला.

त्यांच्या मृत्यू कसा झाला याविषयी कोणतेही ठोस पुरावे मिळत नाहीत. त्यांचे मृत शरीर आजतागायत सापडले नाही. छत्रसाल महाराज जिथे अंतर्धान पावले तिथे त्यांचा घोडा, तलवार आणि त्यांच्या वापरातील काही वस्तू मिळाल्या.त्याचजागी छत्रसालांची मोठी समाधी बांधली आणि त्यावर छत्रपती शिवरायांचे शिष्य छत्रसाल बुंदेला हे वाक्य कोरण्यात आले.

आजही बुंदेलखंडात छत्रपती शिवराय आणि छत्रसाल या गुरूशिष्यांच्या जोडगोळीवर कित्येक कवने रचल्या गेली आहेत. त्यांच्या छत्रसाल उत्सवात, छत्रसाल महाराजांच्या मूर्तीमागे अजूनही गुरू आणि पाठीराखे म्हणून छत्रपती शिवरायांची प्रतिमा उभी केलेली असते.

महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या छत्रपतींची प्रेरणा समस्त भारताने घेतली होती.. अगदी गुरू मानून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली. एवढेच काय, तर राजपूताना आणि आसाम मध्ये सुद्धा शिवाजी महाराजांना प्रेरणास्रोत मानून मुघलांना सळो की पळो करून सोडले होते..

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठ्यांचेच नव्हे तर राष्ट्राचे निर्माते होते. शिवराय ‘राष्ट्रपुरुष’ होते हेच खरे..

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.