तृणमूलमधून आलेल्या या ‘४’ जणांच्या विश्वासावर भाजप बंगाल जिंकण्याच्या प्रयत्नांत आहे…

पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू ही तीन राज्य म्हणजे भाजपची दुखरी नस. आजवर कधीही न जिंकता आलेले गड. एका बाजूला दिल्ली दुसऱ्यांदा जिंकली तरी ही तीन राज्य मात्र जिंकता न आल्यानं भाजप आपला सगळा जोर या राज्यांमध्ये लावणार हे नक्की. त्यातही तामिळनाडू आणि केरळच्या तुलनेत भाजपनं पश्चिम बंगालवर जास्त लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळतं आहे.

मोदी – शहा यांच्या काळातील भाजपची राज्य जिंकण्याची रणनीती बघितली तर त्यातील एक टप्पा म्हणजे विरोधी पक्षातील दिग्गज आणि ताकदीच्या नेत्यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम. बंगालमध्ये भाजपचा हा कार्यक्रम २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुक किंवा त्याही आधीपासूनच सुरु झाला होता.

यात भाजपनं सगळ्यात जास्त कोणत्या पक्षातील नेते आणले असले तर तृणमूल काँग्रेसमधील ममतांच्या विश्वासातील. हि यादी बरीच मोठी आहे, पण त्यातील ४ जण असे आहेत ते भाजपसाठी अतिमहत्वाचे नेते आहेत. त्यांच्याच विश्वासावर आज भाजप बंगाल जिंकण्याचा प्रयत्न करत आहे…

१.  मुकुल रॉय :  

या यादीत पाहिलं नाव येत ते म्हणजे मुकुल रॉय यांचं. हे भारताचे रेल्वे मंत्री देखील होते. तृणमूल काँग्रेसमध्ये असताना त्यांची पक्षातील ओळख म्हणजे त्यांना ममता बॅनर्जी यांचं उत्तराधिकारी म्हणून ओळखलं जात होतं. जाणकारांच्या म्हणण्यानुसार पक्षात अभिषेक बॅनर्जी यांच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांनी २०१७ मध्ये भाजपत प्रवेश केला होता.

मुकुल रॉय यांना इलेक्शन मॅनेजर एक्स्पर्ट म्हणून ओळखलं जातं. भाजपनं २०१८ च्या बंगालमधील स्थानिक स्वराज्य संस्था आणि २०१९ मधील लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी रॉय यांच्या रणनीतीवर विश्वास दाखवला होता. त्यातूनच त्यांना बंगाल प्रचार समितीचे संयोजक बनवलं होतं.

सध्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ता आल्यास भाजपकडून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये मुकुल रॉय यांचं नाव पहिल्या ३ नावांमध्ये चर्चेत आहे.

२. दिनेश त्रिवेदी :

मागच्या महिन्यात भर सभागृहात ‘तृणमूलमध्ये घुसमट होतीय असं म्हणत’ अत्यंत नाट्यमय रित्या आपल्या खासदारकीचा राजीनामा देणारे माजी केंद्रीय रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी देखील नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केला आहे,

पश्चिम बंगालमधील तृणमूलचे दिग्गज नेता अशी ओळख असलेल्या त्रिवेदी यांना पक्षानं ३ एप्रिल २०२० मध्ये राज्यसभेवर पाठवलं होतं. अजून त्यांचा ५ वर्षांचा कार्यकाळ शिल्लक होता.

त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात १९८० च्या काळात जनता पक्षातून केली होती. पुढे काँग्रेसमध्ये आले. त्यानंतर १९९० ते १९९६ या काळात त्यांना गुजरातमधून राज्यसभेवर देखील पाठवलं होतं. १९९८ मध्ये ममतांनी नवीन पक्ष स्थापन केल्यानंतर ते तृणमूलमध्ये आणि पक्षाचे पहिले महासचिव म्हणून निवडले गेले. त्यानंतर २००२ ते २००८ पुन्हा राज्यसभा आणि २००९ मध्ये लोकसभा असा त्यांचा प्रवास होता.

२००९ मध्ये त्रिवेदी पहिल्यांदा मंत्री बनले, आणि त्यानंतर २०११ मध्ये ममता बॅनर्जी राज्यात मुख्यमंत्री म्हणून परतल्यानंतर त्रिवेदी यांना ममता यांच्या जागी रेल्वे मंत्री बनवण्यात आलं.

एकूणच काय तर ममता बॅनर्जी यांच्यासाठी दिल्लीमधील महत्वाचा दुवा आणि पक्षाचा चेहरा म्हणून त्रिवेदी यांना ओळखलं जात होतं. 

३. शुभेंदु अधिकारी :

ममता बॅनर्जी यांना २०११ मध्ये पहिल्यांदा सत्तेच्या चाव्या जेव्हा हातात मिळाल्या, त्याच कारण ठरलेलं २००७ च नंदीग्राम आणि सिंगूर आंदोलनामागे संपूर्णपणे ब्रेन शुभेंदु अधिकारी यांचा होता. त्यांनी या भूमि अधिग्रहणा विरोधातील गावकऱ्यांच्या अस्वस्थतेला हेरून आंदोलन उभे केले, भूमि उछेड प्रतिरोध कमेटी (BUPC) या बॅनरखाली सर्व गावकऱ्यांना एकत्रित आणले होते.

आंदोलनाच्या यशानंतर शुभेंदु बंगालच्या जनतेमध्ये हिरो होते.

२०१६ मध्ये अधिकारी यांनी आंदोलन झालेल्या याच नंदीग्राम मतदारसंघातून विजय मिळवला. त्यानंतर त्यांना ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले. त्यांच्याकडे परिवहन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. खात जरी वजनदार नसलं तरी मुकुल रॉय यांच्या पक्षातून जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी अधिकारी यांनी भरून काढली होती.

ममता यांनी देखील त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना २ नंबरच्या मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. थोडक्यात काय तर आपल्या नंतर ममता यांनी शुभेंदु अधिकारी यांना पक्षातील स्थान देऊ केलं होतं.

पण खासदार अभिजित बॅनर्जी यांचा आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांचा हस्तक्षेप वाढला असून यांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेत असल्याचं सांगत त्यांनी डिसेंबर २०२० मध्ये पक्ष सोडला. सध्या ममता बॅनर्जी यांनी त्यांना याच नंदीग्राममधून आव्हान दिल आहे.

४. अर्जुन सिंह :

हे सध्या भाजपचे खासदार आहेत. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर तृणमूलला राम राम करत त्यांनी भाजपचा झेंडा हातात धरला होता. यांची ओळख काय तर भाजपसाठी बंगालमधील हिंदी भाषिक चेहरा. पक्षात येताच त्यांना राज्य भाजपचं उपाध्यक्ष पद देऊ केलं होतं.

हिंदी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप त्यांच्यावर विश्वास ठेऊन आहे. उत्तर २४ परगण्यात त्यांची हिंदी भाषिकांवर मजबूत पकड देखील आहे.  

त्यांना मानणारा वर्ग कसा आहे याच उदाहरण सांगायचं झालं तर २०१९ मध्ये अर्जुन सिंग बैरकपूरमधून निवडणूक लढाऊ इच्छित होते. पण तृणमुलनं त्यांना डावलून दिनेश त्रिवेदी यांना तिकीट दिलं. त्यांनी बंड करत भाजपमध्ये प्रवेश केला आणि बैरकपूरसाठीच तिकीट मिळवलं. एका माजी केंद्रीय मंत्र्यांविरोधात निवडणूक लढवण नक्कीच सोपं नव्हतं.

पण त्यांनी हे आव्हान उचललं आणि दिनेश त्रिवेदी यांचा पराभव केला. त्यानंतर आपल्या मुलाला देखील त्यांनी तृणमूलच्या मदन मित्रा यांच्या विरोधात निवडणुकीत उतरवलं होतं, सिंग यांनी मित्रा यांना देखील पराभवाची धूळ चारली.

या नेत्यांसह तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेल्यांची यादी खूपच मोठी आहे, पण भाजपची मुख्य मदार या चार जणांवर अवलंबून आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.