पोर्तुगीजांच्या गोव्यावर मराठ्यांच्या वर्चस्वाची साक्ष म्हणजे शांतादेवी मंदिर

गोवा. पोर्तुगीजांनी नानाविध अत्याचार केलेली भूमी. इथल्या जनतेला कायम परकीय आक्रमणाचा सामना करावा लागला. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून पोर्तुगीज कित्येक प्रकारे जनतेवर धार्मिक बंधने लादत असत. पिण्याच्या पाण्यात, विहिरीत ब्रेडचा एखादा तुकडा टाकायचा आणि ते पाणी पिले तर तुमचे धर्मांतर झाले, अशी भीती याच पोर्तुगीजांनी सर्वत्र पसरवली होती.

पोर्तुगीजांच्या धर्मांध अत्याचारामुळे साऱ्या गोव्यातील सामान्य लोकांचे प्रचंड हाल सुरू होते.

याच गोव्यातील ‘केलोशी’ गावात शांतादुर्गा देवीचे मंदिर होते. छोटेखानी असले, तरीही ही गोव्याची आराध्यदेवता. सोळाव्या शतकाच्या मध्यानास पोर्तुगीजांनी हे मंदीर उध्वस्त केले. स्थानिक जनतेने पोर्तुगीजांच्या विरोधात फार मोठे युद्ध पुकारले, प्रतिकार केला पण सर्वांना अपयश आले. देवीच्या मूर्तीची विटंबना होऊ नये म्हणून मूर्ती गुपचूप कवळे (केवळे) गावी आणली.

मंदिराच्या अभावी मूर्ती तशीच दीडशे वर्ष केवळे गावी स्थापन करण्यात आली होती.

महाराष्ट्रात याकाळात थोरले शाहू छत्रपती शासन करत होते. संपूर्ण भारतात मराठ्यांची तुफान घोडदौड सुरू होती. महाराजांच्या पराक्रमाने साऱ्या दिशा दणाणून गेल्या होत्या. भारताच्या विविध भागावर मराठ्यांनी आपला अंमल बसवला. आपले वडील पराक्रमी संभाजी महाराज यांच्याप्रमाणेच शाहू छत्रपतींनी गोव्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

इसवी सन 1730 मध्ये त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. आपले मंत्री ‘नारो शेणवी’ याच्या स्मृती जपल्या जाव्या म्हणून त्यांनी केवळे गावात ‘शांतादुर्गा’ देवीचे मोठे मंदिर बांधण्याचे काम हातात घेतले.

EkyuwngVMAAhp8c

जवळ जवळ 9 वर्षे या मंदिराचे बांधकाम चालले. अखेर इसवी सन 1739 साली हे मंदिर जनतेसाठी खुले करण्यात आले. गोव्यात बांधण्यात आलेले हे सर्वात मोठे मंदीर. शाहू महाराजांनी या देवीला स्वता सोन्याची पालखी दिली. देवीच्या खर्चासाठी केवळे गाव इनाम म्हणून दिले.

थोरल्या शाहू छत्रपतींचे आजोबा स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोव्यात सप्तकोटेश्वरचा जीर्णोद्धार केला होता. इ.स. 1664 मध्ये शिवरायांनी भतग्राम महाल जिंकून घेतला. त्यानंतर शिवरायांनी 1668 मध्ये सप्तकोटेश्वराचे मंदिर बांधले. यासाठी 13 नोव्हेंबर 1668 रोजी महाराजांनी आज्ञा दिली. मंदिराच्या महाद्वारावर याचा शिलालेख आहे.

‘श्री सप्तकोटीश शके 1590 किलकाब्दे कार्तिक कृष्ण पंचम्यां सोमे श्रीशिवराजा देवालयस्य प्रारंभ:”

असा शिलालेख सुद्धा कोरण्यात आला. याचदरम्यान, समस्त गोवा काबीज करुन पोर्तुगीजांचे गोव्यातून उच्चाटन करावे असा महाराजांचा बेत होता. जुने गोवा या देवालयापासून एक तासाच्या आंतरावर असल्यामुळे तेथेच शिवराय मंदिर जिर्णोद्धाराच्या निमित्ताने काही सैन्यानिशी हल्ल्याच्या तयारीत होते. मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे सामान जमा करण्याच्या बहाण्याने सैन्याच्या अनेक छोट्या तुकड्या गोव्यात शिरवल्या जात होत्या.

अशा प्रकारे सैन्याची जमवा जमव करुन अचानक एका रात्री हल्ला करण्याचा महाराजांचा मनसूबा होता. पण याचा सुगवा ‘जुवांव नुनिस हे कुंज कोन्हि हे सां व्हिसेत’ या व्हाइसरॉयला आला आणि हा बेत तडीस गेला नाही.

आपल्या आजोबांचा हाच आदर्श थोरले शाहू छत्रपतींनी आपल्या डोळ्यासमोर नक्कीच ठेवला असणार.

केवळ हे शांतादुर्गाच नव्हे, तर जवळच असणारे नागेशी मंदीर, मंगेशी मंदिराचाही जीर्णोद्धार थोरल्या शाहूंनी केला. एवढेच नव्हे, तर पुरी जगन्नाथ मंदिराचा रथोत्सव सुरू करण्यामागे थोरले शाहू छत्रपतीच कारणीभूत होते. कित्येक वर्षांपासून बंद असलेले मीनाक्षी मंदिर थोरल्या शाहू छत्रपतींच्या आदेशानेच पुन्हा खुले करण्यात आले. भारतातल्या सर्व महत्वाच्या तीर्थक्षेत्रांना या छत्रपतीने पुनर्जीवन दिले.

आपल्या पराक्रमाचा दरारा साऱ्या भारतावर बसवणाऱ्या थोरल्या शाहू छत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा..!!

  • केतन पुरी

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.