निग्रो म्हणून हेटाळणी करणाऱ्या पोर्तुगीजांंना बाजीराव पेशव्यांनी कायमची अद्दल घडवली

सध्या अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूनंतर कृष्णवर्णीयांच्या वर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वर्णभेदी चळवळ जोर धरु लागली आहे. भारतीयांना देखील वर्णभेदाच्या टीकेचा सामना करावा लागतो.

याच विषयाला अनुषंगाने आमचे भिडू प्रसाद बापट यांना प्रश्न पडला की पूर्वीच्या काळी फक्त सर्वसामान्य प्रजाच नाही तर राजे महाराजे यांना देखील वर्ण द्वेषाचा सामना करावा लागला होता.

अगदी बाजीराव पेशव्यांंनादेखील पोर्तुगीजांनी निग्रो म्हटलं होतं हे खरं आहे काय?

गोरा रंग हाच श्रेष्ठ ही भावना आपल्यात रुजवण्यात भारतावर राज्य करणाऱ्या युरोपीय सत्ता कारणीभूत ठरल्या.

व्यापाराच्या नावाखाली भारतात आलेल्या इंग्रज, डच, पोर्तुगीजांनी अठराव्या शतकापर्यंत आपलं सैन्य उभारून सत्तानी हळूहळू आपले पाय रोवण्यास सुरवात केली होती.

विशेषतः पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीजांचे वर्चस्व होते.

या फिरंगी व्यापाऱ्यांचा मनसुबा ओळखूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली, सिंधुदुर्ग सारखा किल्ला उभारला.

छत्रपती संभाजी महाराजांनी देखील पोर्तुगीजांवर चांगलाच वचक ठेवला होता. पण पुढे औरंगजेब दक्षिणेत उतरला. त्याच्याशी लढाईच्या धामधुमीत व पुढे शंभुराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे काहीसे दुर्लक्ष झाले आणि पोर्तुगीजांची ताकद वाढली.

गोष्ट आहे सतराशे तीसच्या दशकातली.

मराठा रियासतीचे कारभारीपण तरुण पेशवा बाजीराव पहिला यांच्या कडे आले होते.

बाजीराव राज्यकारभारात पारंगत होताच शिवाय तो महापराक्रमी देखील होता. छत्रपती शाहू महाराजांनी या चाणाक्ष पेशव्यावर कमी वयात मोठी जबाबदारी टाकली होती आणि त्यांनी ती व्यवस्थित पार देखील पाडली होती. निजामापासून ते उत्तरेतल्या मुघलांपर्यंत त्यांनी मराठी सैन्याची धडकी बसवली होती.

बाजीराव पेशवे अजिंक्य होते. त्यांना युद्धात हरवणे अजून कोणाला जमलं नव्हतं.

मराठा साम्राज्याच्या जवळ पोर्तुगीजांचे साष्टी, वसई,मुंबई आणि गोवा इथे सत्ता होती.

हे पोर्तुगीज राज्यकर्ते अन्यायी होते. तिथल्या प्रजेला जुलूमाने ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लावणे, मंदिरे पाडून चर्च उभा करणे, इतर धर्मियांच्या रूढी परंपरेवर बंदी आणणे असे अत्याचार पोर्तुगीज राजवटीत चालले होते.

बाजीरावापर्यंत या तक्रारी येत होत्या. त्यांनी पिलाजीराव जाधव व कृष्णाजी महादेव या दोघांना तिकडे पाठवले. त्यांनी कॅम्बे येथे पोर्तुगिजांचा पराभव केला. पोर्तुगीजांनी मराठ्यांंकडे मैत्रीचा हात पुढे केला.

तेव्हाच्या तहानंतर दोन्ही सत्तांमध्ये काहीकाळ शांतता होती.

पण १७३७ नंतर परत संघर्षास प्रारंभ झाला. याला कारणीभूत ठरला नवा पोर्तुगीज गव्हर्नर सँडोमिल. तो आक्रमक वृत्तीचा होता, त्याने मराठयांविरुद्ध भूमिका घेतली होती.

यातूनच त्याने ठाण्यामध्ये नवीन किल्ला उभारण्यास सुरवात केली होती.

पोर्तुगीजांशी सलोखा ठेवून व्यापार वाढवण्याच्या दृष्टीने बाजीरावांनी साष्टी येथे वखार उभारणीची परवानगी मागितली.

१७३२च्या तहानुसार मराठ्यांना वखार उभारू देणे पोर्तुगीजांना बंधनकारक होते.

तेव्हाच्या गव्हर्नरने तशी परवानगीही दिली. परंतु वखारीची जागा निवडण्याची जबाबदारी साष्टीच्या सेनापतीच्या होती. पण तो नेमका पोर्तुगालला गेला होता आणि हे काम गव्हर्नरचा पुतण्या लुई बेटेल्लो याच्याकडे आले.

हा लुई बेटेल्लो स्वभावाने रागीट होता. मराठ्यांच्या प्रति त्याच्यात द्वेषाची भावना होती.

परवानगी घेण्यासाठी गोवा दरबारात आलेल्या व्यंकोजी जोशी या वकिलाचा त्याने अपमान केला. तहाचा करारभंग करून त्याने परवानगी तर नाकारलीच वरून

बाजीराव पेशव्याला संबोधून निग्रो ही शिवी हासडली.

हा वृत्तांत पेशव्यांच्या पर्यंत पोहचवण्यात आला. जोशींनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की,

” फिरगियांनी लबाडी केली. पत्र पाठविले त्याचे उतर मगरूरपणे लिहिले याकरिता त्याला ठेचगा द्यावा म्हणून लिहिले. निदान दोन अडीच हजार माणूस व दीड हजार व दोन हजार स्वार सिद्ध करावे म्हणजे स्वामींचे प्रतापे कार्य सिद्धीस जाते.’

पोर्तुगीजांचे वागणे पाहून बाजीराव पेशवे संतप्त झाले. हा फक्त त्यांचा वैयक्तिक नाही तर संपूर्ण मराठा रियासतीच्या पेशवेपदाचा अपमान होता.

पोर्तुगीजांना कायमची अद्दल घडवायची याचा मनसुबा पेशव्यांंनी आखला.

अतिशय गुप्तपणे हल्ल्याची तयारी सुरू केली. त्यावेळी पुण्यात भवानी मातेच्या उत्सवाची धामधूम सुरू असल्यामुळे कोणाला शंका आली नाही.

शंकराजी पंत यांची सेनापती म्हणून निवड करण्यात आली. वसईच्या स्वारीचा प्रमुख गंगाजी नाईक तर साष्टीच्या स्वारीचा प्रमुख म्हणून खंडोजी मानकर यांची नेमणूक केली.

स्वतः बाजीराव पेशवे उत्तरेच्या मोहिमेवर होते

म्हणून या पोर्तुगीजांवरच्या हल्ल्याची जबाबदारी चिमाजी अप्पा यांच्यावर होती.

६ एप्रिल १७३७ रोजी मराठ्यांनी ठाण्याच्या किल्ल्यावर हल्ला चढवला.

पोर्तुगीजांनी तीव्र लढा देण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना अपयश आले. पुढे चिमाजी अप्पांनी साष्टी, धारावी, अर्नाळा ही ठिकाणे जिंकून घेतली.

शेवटी वसईच्या किल्ल्यावर हल्ला केला. हा किल्ला मात्र पोर्तुगीजांनी चिवटपणे लढवला. अनेक दिवसांच्या वेढ्यानंतर चिमाजी आप्पा स्वतः युद्धात उतरले. माणोजी आंग्रे, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे यांच्या मदतीने वसई चा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.

याच बरोबर इचलकरंजीच्या व्यंकोजी घोरपडे यांनी गोव्यात खोलवर चढाई करून पोर्तुगीजांना नामोहरम करून सोडले.

मराठ्यांच्या पेशव्याला निग्रो म्हणायची एक छोटीशी चुक त्यांना बरीच महागात पडली.

या निमित्ताने बाजीरावांनी पोर्तुगीजांना राजशिष्टाचाराचा नवा धडा शिकवला होता.

संदर्भ- पोर्तुगीज मराठे संबंध पांडुरंग पिसुरलेकर

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.