ममता आणि शुभेन्दू विरोधात उभं राहण्यास कोण नव्हतं त्यावेळी ही तरुणी पुढे आली….

पश्चिम बंगालचा नंदीग्राम विधानसभा मतदारसंघ. सगळ्या देशाच लक्ष आज या मतदारसंघाकडे लागून राहील आहे. खुद्द पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या जागेवरून उभ्या आहेत. तर त्यांच्या विरोधात एकेकाळचे त्यांचेच पटशिष्य शुभेन्दू अधिकारी उभे आहेत. या दोन्ही पक्षांच्या मोठ्या सभा, केंद्रीय नेत्यांनी केलेला प्रचार तर दुसऱ्या बाजूला ममता बॅनर्जींची ताकद.

एका बाजूला तृणमूलच्या खेला होबेच्या घोषणा तर दुसऱ्या बाजूला जय श्री रामचा आसमंतात घुमणारे नारे.

मात्र या सगळ्या राड्यात एक ३६ वर्षाची तरुणी होती, जी या दोन्ही मुद्द्यांपलीकडे जाऊन ऑटो, प्रसंगी पायी प्रचार करत होती. बेरोजगारी, शिक्षण अशा मुद्दयांवर बोलत होती. तिच्यामागे पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी नव्हती. पण तरी देखील तिनं ममता बॅनर्जी आणि शुभेन्दू अधिकारी अशा दिग्गजांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवली होती.

हि तरुणी आहे नंदीग्राम मधूनच डाव्या आघाडीची उमेदवार असलेली मीनाक्षी मुखर्जी.

मूळची पश्चिम बर्दवान जिल्ह्यातील छलबलपुर गावची रहिवासी असलेली मीनाक्षी राज्यशास्त्र विषयात २००५ साली बर्धवान विद्यापीठातुन पदवी घेतल्यानंतर २००७-०८ साली डाव्यां पक्षांचं स्टूडंट विंग असलेल्या एसएफआय सोबत जोडल्या गेल्या. आक्रमक भाषण करणं, बोलण्याचा चांगला बाज, उत्तम वक्तृत्व शैली या जोरावर त्यांनी पक्षात लवकरच ओळख मिळवली.

या दरम्यान नोकऱ्यांची मागणी करून कोलकात्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या युवा मार्च मध्ये पोलिसांच्या काठ्या खाल्ल्यानंतर त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. अशा आंदोलनामुळे पक्षात त्यांचं स्थान मजबूत होत गेलं. त्यांना वरच्या पदांवर घेतलं गेलं. २०१८ पर्यंत त्या या विंगच्या प्रमुख पदावर गेल्या.

कसं मिळालं मीनाक्षी मुखर्जी यांना तिकीट?

निवडणुकीच्या काळात डावे आणि काँग्रेस आघाडीसोबत फुरफुरा शरीफचे मुस्लिम नेते अब्बास सिद्दीकी देखील जोडले गेले. त्यामुळे या आघाडीकडून सुरुवातीला त्यांना मैदानात उतरवण्याचा विचार सुरु होता. मात्र जसं ममता विरुद्ध शुभेन्दू असा सामना सुरु झाला तेव्हा अचानक हा मतदारसंघ हायप्रोफाइल झाला. त्यावेळी अब्बास सिद्दकी यांनी माघार घेतली.

अशा परिस्थिती डाव्यांकडे एक हि या दोघांच्या विरोधात निवडणूक लढवू शकेल असा दिग्गज नेता नव्हता. त्यावेळी मीनाक्षी मुखर्जी स्वतः पुढे आल्या. डाव्यांनी देखील या हाय व्होल्टेज सामन्यात ट्विस्ट आणण्यासाठी तरुण चेहरा उतरवायचं ठरवलं आणि मीनाक्षी मुखर्जी यांना तिकीट मिळालं.

तिकीट मिळाल्यानंतर मीनाक्षी यांची प्रतिक्रिया होती,

मान्य आहे कि हि हाय प्रोफाईल सीट आहे, पण या मतदार संघातून असे लोक उभे आहेत ज्यांनी मागच्या काळात काहीच काम केल नाही. माझी उमेदवारी केवळ याच मतदारसंघासाठी नाही, तर २९४ मतदारसंघातील लोकांसाठी आहे ज्यांना रोजगार हवा आहे, शिक्षण हवं आहे, चांगलं राहणीमान हवं आहे. धार्मिक ध्रुवीकरणातून लोकांना अभिमान मिळेल पण आर्थिक गुंतवणूक मिळणार नाही.

थोडक्यात ज्यावेळी त्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात नव्हत्या तेव्हापासून ते अगदी तिकीट मिळाल्यानंतर देखील लोकांना रोजगार मिळाला पाहिजे या मुद्दयांवर बोलत होत्या.

नंदीग्राममध्ये पक्षाची ताकद किती होती?

डाव्यांची नंदीग्राममध्ये ताकद होती का? जर आकडेवारीत बघायचं म्हंटलं तर नंदीग्राममधील १७ पैकी १२ पंचायतींमध्ये डाव्यांची कसलीच ताकद नव्हती. २०११ मध्ये परिवर्तन होण्याआधी नंदीग्राम डाव्यांचा गड होता, २०१६ साली इथून अधिकारी विजयी झाले, पण त्यानंतर देखील मीनाक्षी यांनी या मतदारसंघातून उभ्या राहिल्या.

मोजक्या कार्यकर्त्यांच्या जोरावर प्रचार केला, एका बाजूला डाव्यांचा गड ढासळत असताना त्या पक्षात पाय रोवून उभ्या राहिल्या. सध्या मीनाक्षी मुखर्जी इथून पराभूत झाल्या असल्या तरी राजकारण बाजूला ठेवून त्यांनी दाखवलेली हिम्मत नक्कीच कौतुकास्पद आहे. आणि ते कौतुक केलंच पाहिजे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.