प्रशांत भाऊंना एक कळलंय, ज्याचे खावे मीठ त्याचे करावे नीट..

पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालाचा कल जाहीर झाला. मोदी अमित शाहना गेले काही दिवस अक्षरशः बंगालने पछाडलं होतं. तृणमूलचे आमदार फोडले. नेते फोडले. ममता दीदींना एकटं पाडलं.  भाजपने प्रयत्नाची शर्थ केली. गेल्या निवडणुकीच्या मानाने त्यांनी मोठं यश खेचून देखील आणलं. पण ममता दीदींचा किल्ला पाडू शकले नाहीत.

निवडणुकीच्या आधी कित्येक पंडितांनी अंदाज केला होता कि भाजपचा जोर वाढलाय. बंगाल मध्ये सत्ते पर्यंत तर ते जातील नाही झालं तरी कमीत कमी शंभर च्या वर एकदा तर ते सहज गाठतील.

एकच माणूस होता जो म्हणत होता भाजप दोन आकडी संख्येच्या वर जाणार नाही. 

तो माणूस होता निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर

कोण आहेत प्रशांत किशोर?

प्रशांत किशोर यांचा जन्म 1977 साली बिहारच्या बक्सर जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील श्रीकांत पांडे पेशाने डॉक्टर होते. तर आई हाऊसवाईफ होती. प्रशांत किशोर यांचं सुरवातीचं शिक्षण बिहारमध्ये झालं. नंतर त्यांनी हैद्राबाद मध्ये इंजिनियरिंग केली.  पुढे त्यांना युनिसेफमध्ये ब्रँडिंग इंचार्जची नोकरी मिळाली. तेथे त्यांना मार्केटिंग तसेच मीडिया मॅनेजमेंट बद्दलचं प्रशिक्षण तर भेटलंच सोबतच ते त्यात पारंगत झाले.

भाजपासाठी निवडणूक रणनिती

2011 साली युनिसेफची नोकरी सोडून प्रशांत किशोर भारतात परतले. त्यांनी गुजरातमध्ये झालेल्या ‘व्हायब्रॅंट गुजरात’ या प्रसिद्ध बिझनेस फोरमला भेट दिली. तिथे त्यांची भेट नरेंद्र मोदींशी झाली. या भेटीनंतर त्यांनी मोदींसाठी काम करायला सुरुवात केली.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या निवडणूक प्रचाराची धुरा प्रशांत किशोरांच्या खांद्यावर होती.

त्यांनी मोदींच्या सभेपासून प्रत्येक इलेक्शन कॅम्पेनला सांभाळलं. इतकंच नाही तर त्यांनी ” चाय पे चर्चा” आणि “थ्रीडी सभा” ह्या युनिक योजना पण राबवल्या. त्यांचा यशस्वी प्लॅनिंगमुळे भाजपची विजय निश्चिती झालं असं म्हटलं जात होतं. “अबकी बार मोदी सरकार” ची घोषणा घरोघरी पोहचवण्याचे कार्य त्यानी यशस्वीरीत्या केलं होतं.

narendra b 260218
नरेंद्र मोदी यांच्या समवेत प्रशांत किशोर

भाजपाला सोडचिट्ठी

पुढे 2014 नंतर भाजपासोबत काही वाद झाल्याने त्यांनी भाजपाला सोडचिट्ठी दिली. त्यानंतर ते जदयु कडे वळले .त्यांनी नितीश कुमारांसाठी  प्रचार आरंभ केला . प्रशांत किशोर यांच्या विशिष्ट प्रचार तंत्रामुळे बिहारच्या निवडणुकीत जदयु – काँग्रेस- राजद युतीला विजयश्री प्राप्त झाली.भाजपाचा धोबी पछाड झाला.

पुढे त्यांनी पंजाब इलेक्शनला काँग्रेसला विजयी करून किंगमेकर ही पदवी मिळवली होती.

परंतु त्यानंतर झालेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीत मात्र प्रशांत किशोर यांची रणनीती सपशेल फेल गेली. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले. त्यामुळे प्रशांत किशोर यांची किंगमेकर ही प्रतिमा धुळीस मिळाली. काँग्रेसने त्यानंतर प्रशांत किशोर यांना डच्चू दिला. त्यानंतर मात्र प्रशांत किशोर यांनी नितीश कुमारांशी संबंध मजबूत केले. याच्यावर बऱ्याचदा भाजपा जो जदयुचा मित्र पक्ष होता त्याने आक्षेप घेतला होता. परंतु नितीश कुमार यांनी त्यांना जुमानल नाही.

जदयु प्रवेश.

पुढे तर त्यांनी थेट जेडीयूमध्ये प्रवेश करून राजकारणात एन्ट्री मारली. किंगमेकर आता किंग होणार याच्या चर्चा सुरु झाल्या.  त्यांच्यामुळे नितीश कुमार यांनी लालूंच्या महागटबंधनची साथ सोडून भाजपबरोबर पुन्हा युती केली असं म्हटल गेल. पण प्रशांत किशोर फार काळ राजकारणात टिकले नाहीत.

निवडणुकीचे मॅनेजमेंट आणि प्रत्यक्ष पक्षाचे राजकारण यांचा मेळ त्यांना घालायला जमले नाही. जेष्ठ नेत्यांशी त्यांनी पंगा घेतला होता. नितीश कुमार यांनी त्यांना जे आश्वासन दिले होते ते पूर्ण देखील झाले नाही.

मध्यंतरी प्रशांत किशोर यांनी आंध्रमध्ये जगनमोहन रेड्डी यांचा प्रचाराची जबाबदारी उचलली होती. समराला संवरवरम , अन्ना पिलुपु  वगैरे यात्रा काढून त्यांना विजयी बनवलं. आपली किंगमेकर ही जादू अजूनही कमी झाली नाही हे दाखवून दिलं. महाराष्ट्रात देखील आदित्य ठाकरे यांची प्रचार यंत्रणा राबवली आणि अखेर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदा पर्यंत नेऊन पोहचवल.

यामुळे वाढलेल्या आत्मविश्वासामुळे त्यांनी थेट पक्षावर टीका सुरु केली. मोदिजींच्या नागरिकता सुधारणा कायदा (कॅब) याच्यावर देखील ते तुटून पडले. मिडिया मध्ये डिबेट केले. नितीश कुमार या कायद्याला सपोर्ट करत आहेत म्हणून त्यांच्यावरही झाडून टीका केली.

अखेर गेल्या वर्षाच्या सुरवातीला त्यांना नितीश कुमार यांनी पक्षातून काढून टाकलं.

२०२० साली बिहारच्या निवडणुका आल्या तरी प्रशांत किशोर शांत होते. त्यांनी स्वतः निवडणूक लढवणार होते ते सुद्धा कॅन्सल झालं. मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहणारे प्रशांत किशोर एकदमच गायब झाले.  एकेकाळी संपूर्ण देशाचा किंग ठरवणारा हा किंग मेकर स्वतःच्या राज्यात निवडणुका होत असूनही गायब आहे यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता.

तेजस्वी यादव यांचा प्रचार प्रशांत किशोर मॅनेज करत आहेत अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु होती मात्र त्यांनी याचा इन्कार केला. बिहारच्या निवडणुकीच्या धामधुमीत हा माणूस बंगालमध्ये होता. तृणमूल काँग्रेसच्या ममता दीदींचा २०२१च्या विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार करत होता.

प्रशांत किशोर तब्बल सहा महिने ममता बॅनर्जींच्या सोबत सावलीप्रमाणे होते. ममता दीदी हुकूमशाही वृत्तीने सरकार चालवतात असं म्हणत त्यांचे अनेक सहकारी पक्ष सोडून गेले. भाजपने त्यांना फोडलं होतं. पण प्रशांत किशोर ठामपणे तिथे उभे राहिले. तृणमूलचा तळागाळातला कार्यकर्ता हि ममता दीदींची ताकद होती, प्रशांत किशोर यांच्या कॅम्पेनिंगने त्याला साद घातला.

खेला होबे  

जेव्हा ममता बॅनर्जींचे सगळे विरोधक एकवटत होते तेव्हा प्रशांत किशोर यांनी सांगितलं,

“भाजप बंगाल मध्ये दोन अंकी आकड्याच्या पुढे जाणार नाही.  जर माझं म्हणणं खोटं ठरलं तर मी माझ्या आय पॅक या कंपनीचा आणि निवडणूक रणनीतीच्या व्यवसायाचा त्याग करेन.”

अनेकांना प्रशांत किशोर यांच्या कॉन्फिडन्सचे आश्चर्य वाटले. कित्येकांनी त्यांना खुळ्यात देखील काढलं. अगदी मीडियावरच्या मुलाखतीमध्ये हा प्रश्न वारंवार विचारला गेला.  तुम्ही आयपॅक सोडल्यावर काय करणार असा कुत्सित सवाल केला गेला.

पण प्रशांत किशोर ठाम होते. 

बंगालच्या निवडणुकीचा निकाल आला तेव्हा ममता दीदींची जादू पुन्हा दिसली. भाजपने या निवडणुकीत कम्युनिस्ट, काँग्रेस या सगळ्यांना खाऊन टाकलं. पण तृणमूलच्या मतदान ते हरवू शकले नाहीत. या सगळ्यामध्ये कुठेना कुठे प्रशांत किशोर यांचा सिंहाचा वाटा आहे.

हे झालं बंगालच. पण ते सोडून तामिळनाडूच्या निवडणुकीत द्रमुकला जिंकवण्यात देखील प्रशांत किशोर किंगमेकर ठरले आहेत. आजवरचा त्यांचा रेकॉर्ड बघता इलेक्शन कॅम्पेनिंगमध्ये त्यांचा हात कोणी धरू शकत नाही.

भविष्यवाणी खरी ठरूनही त्यांनी आपल्या आयपॅक या कंपनीचा त्याग केला आहे. ते म्हणाले,

‘मैं जो कर रहा हूं उसे अब जारी नहीं रखना चाहता। मैंने काफी कुछ कर लिया  है। अब मेरे लिए एक ब्रेक लेने का समय है और जीवन में कुछ और करना चाहता हूं। मैं यह स्पेस छोड़ना चाहता हूं।”

नेहमी आपल्या सभोवती गूढ वलय असणारे प्रशांत किशोर यांनी हि घोषणा करून लोकांना आणखी घोळत टाकलं आहे. ते आता पूर्णवेळ राजकारणात सक्रिय होणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण लोकांचे अंदाज खोटे करत आपल्या मनाचं खरं करणारे प्रशांत किशोर आता काय नवीन खेला करतात हेच येत्या भविष्यात बघावं लागेल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.