च्यवनप्राशची जाहिरात केली म्हणून डॉ. लागूंचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात आला होता.?

ट्विटरवर अंकुर भारद्वाज यांच्यामार्फत एक ट्विट करण्यात आलं. या ट्विटमध्ये जेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्या एका जून्या जाहीरातीचा संदर्भ देण्यात आला. ही जाहिरात होती चवनप्राशची. श्रीराम लागू यांनी चवनप्राशची जाहीरात १९८० साली केली होती.

या जाहीरातीमुळे MCI अर्थात महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने त्यांचा वैद्यकिय परवाना रद्द केल्याबाबत सांगण्यात आलं होतं.

सोबतच कोरोनिल सारख्या बोगस औषधांचा प्रसार व जाहीरात केल्याबद्दल किती डॉक्टरांचा परवाना रद्द केला असा सुर देखील होता.

खरच अशा काही घडामोडी घडल्या होत्या का? श्रीराम लागू यांनी च्यवनप्राशची जाहीरात केली म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती का? याचा शोध आम्ही घेतला. त्यासाठी सर्वात योग्य संदर्भ होता तो म्हणजे डॉ. श्रीराम लागू यांचे लमाण हे आत्मचरित्र. हे आत्मचरित्र चाळल्यानंतर डॉक्टरांनी या संपुर्ण प्रकारावर लिहलेलं दिसलं.

डॉ. श्रीराम लागू यांनी आपल्या पुस्तकात लिहलेला हा मजकूर जसा च्या तसा इथे देण्यात येत आहे. 

डॉक्टर श्रीराम लागू लिहतात,

एक दिवस देशातल्या सगळ्या इंग्रजी, मराठी वृत्तपत्रांत बातमी झळकली (इतर भाषांतही असणार)

डॉ. श्रीराम लागूंचा वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने रद्द केला!

‘च्यवनप्राश’ या आयुर्वेदिक औषधाची चित्रपट, टी.व्ही. आदी माध्यमातून जाहिरात केल्याचे ‘ अनैतिक’ कृत्य केल्याचा मेडिकल कौन्सिलने डॉ. लागू यांना हि शिक्षा ठोठावली आहे !

यापुढे वैद्यकीय व्यवसाय केल्यास डॉ. लागूंचे ते कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचे मानले जाईल !

बातमी झळकताच सगळीकडे खळबळ माजली, कारण सिनेसृष्टीत मी एव्हाना स्टार या नट प्रकारात मोडू लागलो होतो. देशभर माझी भूमिका असलेले चित्रपट दाखवले जात होते. त्यातले अनेक गाजत होते आणि चित्रपट गाजो न गाजो, माझे काम लोकांना आवडत होते. मी अभिनय करीत असताना, अनेक नाट्यविषयक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांविषयी माझी मते जाहीरपणे, परखडपणे. त्यामुळे ‘नट असूनही विचारवंत’ अशी माझी एक प्रतिमा तयार झाली होती.

त्यामुळे हि बातमी झळकताच माझ्या बाजूने सहानुभूतीची लाटच उसळली ! अनेकांनी मेडिकल कौन्सिलचा धिक्कार केला, माझी बाजू मोठ्या हिरीरीने मांडली. मग मेडिकल कौन्सिलने आपली बाजू हिरीरीने मांडली.

मी सगळ्या गदारोळात शांत बसून होतो. एकतर मी वैद्यकीय व्यवसाय बंद केलेल्याला वीस वर्षे होऊन गेलेली होती. माझ्या दृष्टीने रद्द केलेला परवाना हा कस्पटासमानचं होता.परवाना रद्द केल्याने माझे काहीच बरे वाईट होणार नव्हते. आणि मला हे हि कळत होते कि कौन्सिलने माझा परवाना रद्द करून त्याला एवढी प्रसिद्धी दिली होती ती स्वतःच्या निःस्पृह न्यायदानाचा टेंभा मिरवण्यासाठी. माझ्यासारख्या सुप्रसिद्ध अभिनेत्याचा परवाना रद्द करण्याचे ‘ धाडस ‘आपण करू शकतो हे जगाला दाखवण्यासाठी.

कौन्सिलच्या उघड्या डोळ्यांदेखत अनैतिकतेची प्रचंड बजबजपुरी वैद्यकीय व्यवसायात माजत होती ती कौन्सिलला जणू दिसतच नव्हती. चार रुपड्यांसाठी महारोगी भिकाऱ्यांचे रक्त काढून घेऊन ते ब्लड बँकांना विकणारे डॉक्टर त्यांना दिसत नव्हते. काहीतरी आमिशाने पेशंटला भूल देऊन त्याचे मूत्रपिंड नकळत काढून घेऊन ते अरबस्थानात लाखो रुपयांना विकणारे ‘बडे’ सर्जन त्यांना दिसत नव्हते. खून, बलात्कार, भ्रष्टाचार असल्या गंभीर गुन्ह्यांच्या खटल्यात अडकलेले डॉक्टर्स त्यांना दिसत नव्हते. पण ऍलोपॅथीची पदवी घेऊन  आयुर्वेदिक औषधाची जाहिरात करणारा डॉक्टर मात्र ‘हद्दपारीच्या’ सर्वोच्च शिक्षेला पात्र होता, कारण त्यामुळे कौन्सिलच्या ‘रामशास्त्री बाण्या’ चे डिंडिम देशभर निनादणार होते !

त्याप्रमाणे ते काही काळ निनादलेही आणि मग थंड झाले. ”मी किमान औपचारिक माफीची याचना करावी, म्हणजे कौन्सिलचे अध्यक्ष माझी शिक्षा रद्द करतील !” अशी मित्रत्वाची सूचना कौन्सिलच्या एका सदस्याने, अध्यक्षांचे वतीने मला ‘अनधिकृतरित्या’ ‘अनौपचारिकपणे’ केली. मी अर्थातच तिकडे दुर्लक्ष केले.

माझं अवैद्यकीय व्यवसाय १९६९ सालापासून बंद असला तरी ‘प्रॅक्टिस’ कधीच बंद केली नव्हती. मला वाटते डॉक्टरीचे शिक्षण घेतलेला, (माझ्यासारखा पदव्युत्तर शिक्षण घेतलेला) डॉक्टर प्रॅक्टिस न करता राहणेच शक्य नाही. सगळे जग तुम्हाला डॉक्टर म्हणूनच ओळखते. नाटकात तर सोडाच- सिनेसृष्टीतसुद्धा तुम्ही ‘डॉक्टरसाब’ म्हणूनच ओळखले जाता आणि भोवतालचे सबंध जग पेशंटांनीच भरलेले आहे. कुणाला सर्दी -खोकला- डोकेदुखी आहे तर कुणाला खोकल्यावाटे किंवा शौचावाटे रक्त जाते आहे.

क्षय, कॅन्सर असलेले रोग असण्याचीही शक्यता आहे. अज्ञान किंवा (आणि) दारिद्र्य यामुळे वैद्यकीय तपासणी होतंच नाही. आणि तुम्हाला सगळेच डॉक्टर म्हणतात तेव्हा, नाटकात काय किंवा सिनेमात काय, काम करणारे असंख्य अडाणी आणि दरिद्री कामगार, त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी तुमच्याजवळ बोलणारचं आणि तुमचे काळीज दगडाचे नसल्यामुळे तुम्ही त्यांना योग्य तो सल्ला देणार, औषधं सुचवणार, कोणत्या स्पेशालिस्टकडे जावं हे सांगणार, तुमच्या ओळखीच्या स्पेशालिस्टला ओळखीची चिठ्ठी देणार, प्रसंगी औषधे-इंजेक्शने याना पैसेही देणार.

हि अशा तर्हेची ‘ प्रॅक्टिस ‘ कुठल्याही डॉक्टरला करावीच लागणार- टाळता येणार नाही. मलाही टाळता आली नाही, टाळायची नव्हतीच.

मी तर खूप हौसेने हि ‘प्रॅक्टिस’ करत होतो. दंडीच्याही प्राप्तीची अपेक्षा नव्हती. उलट खुप कष्टपूर्वक मिळवलेले ज्ञान कामास येते आहे, अगदीच वाया जात नाही समाधान होते !

माझी एक गरजू म्हणाली, मेडिकल कॉलेजमध्ये एका गरजू मुलाची (वा मुलीची) जागा तू अडकवलीस आणि डॉक्टर झालास. पुढे डॉक्टरी सोडून नट होताना तुला त्या गरजू विद्यार्थ्याची आठवण होऊन तू हळहळला असशील आणि मग – ‘पापक्षालना’ च्या कल्पकतेने तू पैसे न घेता डॉक्टरी करत असशील ”शक्य आहे , असो !

एक दिवस पुन्हा अचानकच , मेडिकल कौन्सिलचे मला पत्र आले.

” आपली गेल्या तीन वर्षाची फी आपण भरलेली नाही- ती अमुक तारखेच्या आत भरावी. तरच आपले रजिस्ट्रेशन चालू राहील !”

माझे रजिस्ट्रेशन काढून का घेतले आणि परत देऊन का टाकले, सगळेच अनाकलनीय !

पुढे काही दिवसांनी वृत्तपत्रात वाचले कि कौन्सिलचे अध्यक्ष हे निष्णात, पदवीधर सर्जन असूनदेखील त्यांनी वकिलीची सनदही घेतलेली आहे आणि ते प्रत्यक्षात कोर्टात वकिलीचा व्यवसायही करतात.

या बेकायदेशीर कृत्यासाठी अध्यक्षपदावरून त्यांची उचलबांगडीही झाली आहे !

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.