फडणवीस ३ दिवस कोकणात तळ ठोकून होते तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ६ तासात आटोपलं

राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे बुधवारी चक्रीवादळाच्या नुकसानीचा दौरा करण्यासाठी बाहेर पडल्यावर साहजिकच सर्वांचं लक्ष लागलं होतं ते राज्याचे नेतृत्व ज्यांच्याकडे आहे त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाहणी दौऱ्याकडे. फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील शुक्रवारी आपला दौरा केला…

मात्र याच दौऱ्यावरून उद्धव ठाकरे सध्या टीकेचं लक्ष होताना दिसतं आहेत.

कारण राज्याचे नेतृत्व म्हणून त्यांच्या दौऱ्याकडून कोकणातील अनेक गावातील हजारो नुकसानग्रस्तांना अपेक्षा होती. मात्र त्यांचा हा पाहणी दौरा ठरला अवघ्या ६ तासांचा. त्यानंतरच त्यांची तुलना देवेंद्र फडणवीस यांच्या ३ दिवसांच्या दौऱ्यासोबत होऊ लागली आहे.

तसे आरोप-प्रत्यारोप, टीका टिपणी देखील भाजप-शिवसेनेमध्ये सध्या सुरु आहे. त्यामुळे या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ३ दिवसांच्या दौऱ्यात काय साध्य केलं आणि उद्धव ठाकरे यांनी ६ तासात काय केलं हे बघणं महत्वाचं ठरतं.

याचाचं ‘बोल भिडू’ने घेतलेला हा आढावा. 

हा आढावा बघण्यापूर्वी आपल्याला या चक्रीवादळामुळे नेमकं कोकणत नेमकं कोणत्या भागांना फटका बसला आहे हे बघणं गरजेचं आहे. त्यावरून आपल्याला या दोघांनी या नुकसानग्रस्त ठिकाणी काय केले हे बघता येईल.

कोणत्या भागांना वादळाचा फटका बसला आहे?

तौत्के चक्रीवादळाचा मोठा फटका बसला तो प्रामुख्यानं रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना. यात रायगड जिल्हात तब्बल ४ जणांचे मृत्यू या वादळामुळे झाले आहेत. सोबतच प्रशासनाच्या अंदाजानुसार ५ ते ६ हजार घरांचं नुकसान झालं आहे. तर तब्बल ५ हजार हेक्टरमध्ये फळपिकांना फटका बसला आहे.

तर रत्नागिरीमध्ये देखील प्रशासनाच्या अंदाजानुसार,

सुमारे ५ हजार घरांची पडझड झाली असून १ हजार २०० गावांमध्ये अद्याप वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. तर सुमारे २ हजार ५०० हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान झालं आहे. सोबतच १०० बोटींचे नुकसान झालं आहे. तर तब्बल १०० शाळांचे देखील नुकसान झालं आहे.

यानंतर या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला तो सिंधुदुर्ग जिल्ह्याला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्ग, मुख्य रस्ते आणि रेल्वे सेवा अद्याप देखील बंद आहे. वादळामुळे जवळपास ८० टक्के विजेचे खांब कोसळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वीज सेवा खंडीत झाली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यातील मोबाईल टॉवरही कोसळले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी कोकणात ३ दिवस तळ ठोकून काय केले?

१९/०५/२०२१, बुधवार.

रायगड जिल्हा : 

देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली बुधवारी १९ मे रोजी. मुंबईतून निघाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा भेट दिली ती थेट फटका बसलेल्या रायगड जिल्ह्याला. इथं त्यांनी सुरुवातीला जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली आणि जिल्हातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.

यानंतर फडणवीसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेली माहिती माध्यमांसमोर मांडली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,

त्यावेळी पर्यंत जवळपास रायगड जिल्ह्यात ४ जणांचे मृत्यू या वादळामुळे झाले होते. सोबतच ८ ते १० हजार घरांचं नुकसान झाला होतं. तर तब्बल ५ हजार हेक्टरमध्ये फळपिकांना फटका बसला होता. जवळपास २०० शाळांचं, २५ वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या इमारतींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं देखील फडणवीसांनी सांगितलं.

या नुकसानी सोबतच जिल्ह्यातील वीज वीजपुरवठ्याचं मोठं नुकसान झालं असल्याच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले, अजूनही १७२ गावांमध्ये ७० हजार घरं अशी आहेत ज्यांना वीज पूर्ववत झालेली नाही. विजेचे खांब उन्मळून पडले आहेत.

त्यामुळे या सगळ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली. हा आढावा घेऊन झाल्यावर त्यांनी प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन पाहणी करण्यास सुरुवात केली.

यात फडणवीसांनी अलिबाग बंदर येथे भेट देवून मच्छीमार समुदायाशी संवाद साधला, आणि त्यांच्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी बोटींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शासनाच्या वतीने तातडीने आणि भरघोस मदत देण्यात यावी, अशी मागणी केली.

यावेळी त्यांनी अलीबाग जेट्टी इथं वाळायला ठेवलेले ‘जवळा’ या पावसाने पूर्णपणे खराब झालं असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं. यामुळे मासेमाऱ्यांपुढे कशा आणि काय समस्या उभ्या राहू शकतात याबद्दल देखील सांगितलं.

यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील खानाव, उसर आणि वावे या गावांमध्ये जातं वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सोबतच नुकसान झालेल्या नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशीही संवाद साधला.

पुढे फडणवीसांनी रोहा तालुक्यातील मेढा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. इथं देखील मोठं नुकसान झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. सोबतच कोरोनाच्या काळात आरोग्य सेवांमध्ये खंड पडणे परवडणारे नाही. त्यामुळे या केंद्राच्या फेरउभारणीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज देखील त्यांनी बोलून दाखवली.

२०/०५/२०२१, गुरुवार.

रायगड जिल्हा :

दुसऱ्या दिवशी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्ह्यातील महाडला भेट देऊन इथल्या नुकसानीचा आढावा घेतला सोबतच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारने केवळ गुजरातला मदत केली असल्याच्या आरोपांना उत्तर दिलं. ते म्हणाले,

तौक्ते चक्रीवादळग्रस्त आठही राज्यांना केंद्र सरकार मदत करणार आहे. त्यात महाराष्ट्राला सुद्धा मदत मिळणार, हे कालच केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. 

यानंतर त्यांनी रत्नागिरीला जाताना वाटेतील पोलादपूर या गावाला भेट दिली, आणि इथल्या नागरिकांशी संवाद साधला. यात त्यांनी काही शाळांना भेटी देत निसर्ग चक्रीवादळात या शाळांचे छत गेलं होत पण अद्याप ते दुरुस्त झालं नसल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं, आणि केवळ घोषणा करून चालणार नाही, तर घोषणा अंमलात येतात की नाही, हे ही पाहिले पाहिजे अशा देखील सूचना दिल्या.

रत्नागिरी जिल्हा दौऱ्याला सुरुवात :

रत्नागिरी जिल्हाच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांनी खेड तालुक्यातील बोरज घोसाळकरवाडी इथं विजेची तार पडल्यामुळे मृत्यूमुखी झालेल्या वंदना आणि प्रकाश घोसाळकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी या कुटुंबातील अपत्याला नोकरीत सामावून घेण्याची मागणी राज्य सरकारकडे केली.

यानंतर फडणवीस यांनी संगमेश्वर गाठले. इथं त्यांनी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला भेट देऊन वैद्यकीय अधिकारी आणि इथल्या नागरिकांशी नुकसानीबाबत चर्चा केली. 

पुढे रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी या गावाला त्यांनी भेट दिली, आणि नुकसानग्रस्त घरांची पाहणी करत नागरिकांशी चर्चा केली.

३ गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यलयाला भेट दिली, आणि चक्रीवादळामुळे झालेले नुकसान आणि एकूणच कोरोनाची स्थिती याबाबतची माहिती जाणून घेतली. 

यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीला माध्यमांशी शेअर केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,

रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ५ हजार घरांची पडझड झाली असून १ हजार २०० गावांमध्ये अद्याप लाईट आलेली नाही. तर सुमारे २ हजार ५०० हेक्टरमध्ये पिकांचे नुकसान झालं आहे. सोबतच १०० बोटींचे नुकसान झालं आहे. तर तब्बल १०० शाळांचे देखील नुकसान झालं असून अजून पंचनामे सुरु आहेत त्यानंतर नेमकं चित्र समोर येईल असं देखील फडणवीस यांनीही सांगितलं.

निसर्ग चाकीवादळाच्या दरम्यान झालेल्या मदतीचा आढावा घेत फडणवीसांनी ‘ती मदत देखील पूर्ण झाली नसून आता पर्यंत केवळ १५० कोटी रुपयांच वाटप झालं असल्याची बाब उजेडात आणली.

सोबत राज्य सरकार स्वत:च्या निधीतून तत्काळ प्राथमिक मदत करू शकते असं देखील त्यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेत १०० कॉन्स्ट्रेटर्ससह ऑक्सिजन बँक जिल्हाधिकार्‍यांना सुपूर्द केली.

हि बैठक संपवून देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्था, पर्सनील नेट मच्छिमार रत्नागिरी तालुका मालक असोसिएशन, अशा विविध आंबा उत्पादक आणि मासेमारांच्या संघटनांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यात या संघटनांनी केलेल्या सर्व मागण्या शासनाकडे मांडण्यात येतील असं आश्वासन त्यांनी दिलं. 

इथं रत्नागिरी जिल्हयाचा दौरा संपवून देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्याला सुरुवात केली. 

इथं देखील प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करण्यापूर्वी गुरुवारी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांशी आणि अन्य अधिकार्‍यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रशासनाला काही सूचना आणि सातत्यानं येणाऱ्या समस्येवर उपाय सुचवला.

यात वीज पायाभूत सुविधा अंडरग्राऊंड करण्यासाठी केंद्र सरकारने जागतिक बँकेच्या मदतीने योजना तयार केली आहे. या योजनेचा लाभ घेत कोकणासाठी एक कालबद्ध कार्यक्रम ठरवून ही योजना पूर्णत्त्वास नेली पाहिजे. असे केल्यास वारंवार येणाऱ्या वादळांमुळे भविष्यात वीजेच्या बाबतीत असे नुकसान होणार नाही.

नियमित कर्जमाफीचा कोकणातील शेतकर्‍याला फायदा होत नाही. त्यामुळे आंबा बागायतदारांनी कर्जमाफीची केलेली मागणी अतिशय रास्त आहे, त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. मासेमारांना तर कोणतीच मदत नाही. ते सांगतात की, निसर्ग चक्रीवादळाच्यावेळी सर्वे झाले, पण पुन्हा परत फिरून कुणीच आले नाही.

अशा काही मुद्यांचा जिल्हाधिकारी आणि देवेंद्र फडणवीस भेटीत समावेश होता.

यानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, निसर्ग चक्रीवादळाच्यावेळी हेक्टरी ५० हजार म्हणजे एका झाडाला ५०० रूपये मदत घोषित केली होती. उद्या मुख्यमंत्री कोकणात येत आहेत, तर त्यांनी भरघोस मदत जाहीर करावी आणि निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी जशी निराशा झाली, तशी यावेळी होऊ नये, एवढीच आमची अपेक्षा आहे.

२१/०५/२०२१, शुक्रवार.

सिंधुदुर्ग जिल्हा. 

शुक्रवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या वतीनं चक्रीवादळग्रस्तांना तातडीची मदत म्हणून कौलं आणि पत्रे यांची व्यवस्था करून दिली, आणि त्याचवेळी या वस्तूंच्या वितरणाला प्रारंभ करण्यात आला.

यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड इथं भेट देऊन चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मासेमारांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर काही आरोप देखील केले.

ते म्हणाले,

वादळाची पूर्वकल्पना असताना सुद्धा राज्य सरकारने एनडीआरएफची मदत येथे घेतली नाही. ती घेतली असती तर मासेमार बांधवांना प्राण गमवावे लागले नसते. मासेमार बोटींचे मोठे नुकसान झाले आहे.

पण जिथं ४० लाखांचे नुकसान होते, तेथे ते २० लाखांचे दाखविण्यात येते. हे तर गरिबांचे कंबरडे मोडणारे आहे. प्रशासनावर वचक असला पाहिजे. असे प्रकार होणार असतील, तर लोकांना मदत कशी मिळणार?

यानंतर फडणवीस यांनी मालवण तालुक्यातील आचरा येथे गावुडवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट आणि तिथल्या नुकसानीची पाहणी केली. पुढे त्यांनी मालवण तालुक्यातील आंबा बागांची सुद्धा पाहणी केली. यानंतर ते म्हणाले,

झाडेच्या झाडे उन्मळून पडली आहेत. केवळ यंदाच्या वर्षीचेच नाही, तर दीर्घकालीन स्वरूपाचे हे नुकसान आहे.

पुढे दिवसाच्या शेवटाला देवेंद्र फडणवीस यांनी आचरा ग्रामपंचायतीला भेट देऊन या गावातील नागरिकांची निवेदन स्वीकारली आणि त्यांच्याशी नुकसानी संदर्भात संवाद साधला.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हा दौरा ३ दिवसांचा असेल असं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या तीन दिवसांत अनुक्रमे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हयांना भेटी दिल्या.

त्यांनी या नुकसानीचा इथल्या प्रशासनाकडून तर आढावा घेतलाच शिवाय प्रत्यक्ष जमिनीवर काय परिस्थिती हि देखील बघितीली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडून त्यांचा नुकसानग्रस्त पाहणी दौरा हा शुक्रवारी २१ मे रोजी एका दिवसाचा असेल असं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार काल म्हणजेच शुक्रवारी सकाळी ८:२० च्या दरम्यान उद्धव ठाकरे मुंबई विमानतळावरून कोकण दौऱ्यासाठी रवाना झाले.

साधारण ९ वाजून १० मिनिटांनी उद्धव ठाकरे रत्नागिरीत दाखल झाले. या जिल्ह्यात त्यांनी कोणत्याही गावांना भेटी न देता रत्नागिरी जिल्हा प्रशासनासोबत आणि अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. हि बैठक साधारण २५ मिनिटे चालली.

साधारण ९ वाजून ३५ मिनिटांनी हि आढावा बैठक संपवून उद्धव ठाकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले,

कोकणवासियांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आढावा घेतला. जास्त फिरण्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देणार आहे. पंचनामे पूर्ण होताच मदतीबाबत निर्णय घेणार असून कोणत्या निकषावर मदत जाहीर करावी हे आढावा घेतल्यानंतर ठरवणार.

सोबतच पंतप्रधान नरेंद्र महाराष्ट्रालाही योग्य मदत करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

यावेळी माध्यम प्रतिनिधींनी ठाकरेंना चार तासांच्या दौऱ्यावर विरोधकांनी केलेल्या टीका प्रतिक्रिया विचारली. त्यावर ते म्हणाले,

“मी हेलिकॉप्टरमधून नव्हे जमिनीवरुन पाहणी करतोय, फोटोसेशन करायला आलेलो नाही”

रत्नागिरी आढावा बैठक संपवून उद्धव ठाकरे विमानाने सिंधुदुर्गकडे रवाना झाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मालवण तालुक्यातील चिवले बीच परिसराला भेट देऊन इथल्या नुकसानीची पाहणी केली.

यानंतर मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग मधील चिपी विमानतळ बैठक सभागृह इथं सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली.

इथं देखील त्यांनी कोणतीही घोषणा केली नाही.

याच बैठकीनंतर साधारण २ वाजून २० मिनिटांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकण नुकसान पाहणी दौरा आटोपला आणि ते रत्नागिरी विमानतळावरून मुंबईकडे रवाना झाले.

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी सखोल दौरा करणं अपेक्षित होतं. विरोधकांकडून यावर टिका झाल्यानंतर त्यांनी आपल्या दौऱ्याची तुलना मोदींच्या दौऱ्यासोबत केली खरी मात्र त्याचवेळी विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस करत असणाऱ्या दौऱ्याकडे मात्र त्यांनी लक्ष दिले नाही.

फडणवीस यांनी तीन दिवस कोकणात तळ ठोकून ग्राऊंड परिस्थितीत समजून घेतली. तिन्ही जिल्ह्यांना भेटी दिल्या, मात्र उद्धव ठाकरेंनी एक दोन गावे, बैठक आणि दोन जिल्ह्ये व ६ तासात आपला एकदिवसीय दौरा आटोपता घेतला.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.