मुंबईत दोन तासात लाईट आली, आमच्या कोकणात वादळानंतर गेलेली लाईट ३५ दिवसांनंतर आली

काही दिवसांपूर्वी दापोली, हर्णे, हरिहरेश्वर या किनारी भागाचा दौरा होता. हर्णे भागाच्या किनारपट्टीतून फिरल्यानंतर रात्रीचा मुक्काम दापोली जवळ असणाऱ्या लाडघरला गेला.  

नेहमी कोकण कसा बाप दिसतो. हिरवागार निसर्ग आणि आलेल्या सुपाऱ्या. पण यावेळी हा पट्टा भयानक होता. जगात कोरोना आला काय किंवा गेला काय इथल्या माणसांचं दुख: वेगळचं होतं. गेल्या दोन दोन पिढ्या जपलेली झालं पाळापाचोळ्यासारखी उडून गेलेली. 

साहजिक आपणाला वाटणारी कोणतीही वाईट गोष्ट क्षणिक असते. रात्र झाली आणि सागर सावली हॉटेलमध्ये मुक्कामाला आलो. दिवसभर पाहीलेली निसर्गाची किमया विसरुन चाललेलो. इतक्यात एक वेटर समोर आला. 

नेहमीप्रमाणे काय कुठलं? विचारून कोरोनाचा विषय काढला. हॉटेल बंद असल्याने धंदा बंद  पडलेला. आत्ता तो कोरोनाने कसं सगळं विस्कळीत झालं हे सांगणार म्हणून मी देखील लक्ष देऊन ऐकून घेऊ लागलो. पण त्याच्या जगात कोरोना नव्हताच. 

त्याला पूर्ण संपवलेलं ते निसर्ग या चक्रीवादळाने. 

तो म्हणाला, ४० दिवसानंतर आमच्या गावात लाईट आली. वादळ आलं आणि गेलं. मागचं सगळं सप्पय झालं. जंगलातून लाईनी येतात.  झाडं सगळी पडलेली. लाईट आणणारे खांब कोसळले होते. इथली गाव म्हणजे गट ग्रामपंचायती. एक मोठ्ठ गाव आहे. ते बंड करुन उठतं आणि सगळं कस सुरळीत होतं असा प्रकार इथे नसतो.

साहजिक ३५-४० दिवस लाईट येण्यासाठी कशी लागू शकतात हा माझा मुद्दा होता. 

तेव्हा तो सांगू लागला.

इथल्या अख्य्या भागासाठी एखादा लाईटमॅन असतो. डोंगरातून तारा येतात. खांब पडणं, लाईन पडणं हे सारखचं होतं असतं. आत्ता त्या दुरूस्त कशा करणार यापेक्षा महत्वाचं म्हणजे एखादा दुसरा माणूस हे सगळं कस करणार हे असतं. अशा वेळी सगळा गाव कामासाठी झटू लागतो. पटणार नाही पण तुटलेल्या लाईन जोडण्याचं काम माणसांसोबत बाईकांनी देखील केलं. तेव्हा कुठे महिन्यादिडमहिन्यांनी लाईट आली. 

म्हणजे आपल्या मढ्याला आपणच खांदा द्यायचा हा प्रकार होता. लाईटमॅन कमी आहेत. नैसर्गिक संकट आहे म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे लाईटमॅन आणावेत. युद्धपातळीवर काम पुर्ण करावं असा विचार कोणीही करत नाही.

कारण काय तर इथल्या माणसांना कशाला हवीय लाईट हा सरकारी समज..! 

आज मुंबईत दोन तास लाईट गेल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर बातमी होते. कारण औद्योगिक पट्टा. भलेभले उद्योग व्यवसाय बंद होतात. प्रभावित होणाऱ्या लोकांची संख्या मोठ्ठी असते अशी अनेक कारणे असतील. भले ही कारणे बरोबर देखील असतील. त्या मानाने कोकणात जगणाऱ्या शेतकऱ्यांना लाईट लागत नाही असा सरकारी समज देखील असेल म्हणून दिड दोन महिने लाईन व्यवस्थित करण्याचे कामच करायचे नाही हे उत्तर मात्र न पटणारे होते.

निसर्ग चक्रीवादळ होऊन तीन महिने होतं आहे. आजही काही भागात लाईन दुरुस्त करण्याच काम पुर्ण झालं नसल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात आलं. 

बाकी बातम्यांच सांगायचं झालं. साधारणं १५० कोटींच्या हाय टेन्शन लाईन, ट्रान्सफॉर्मर आणि इलेक्ट्रिक पोलचं नुकसान झाल्याची बातमी सांगण्यात आली होती. मंत्री महोदयांनी दुरुस्तीस होणाऱ्या विलंबाचं कारण देताना कोरोनामुळे कर्मचारी नसल्याचं तसेच आवश्यक साधनसामग्रीचा तुटवडा असल्याचं देखील सांगितलं होतं.

  •  प्रथमेश जोशी

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.