अप्पासाहेबांनी कोल्हापूरच्या उजाड माळावर विद्यानगरी उभी केली : शिवाजी विद्यापीठ

‘ज्ञानमेवामृतम्’ हे ब्रीद घेऊन दक्षिण महाराष्ट्राच्या तळागाळातील, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणाची गरज भागविण्यासाठी सुमारे 50 वर्षांपूर्वी दि. 18 नोव्हेंबर 1962 रोजी शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली.

शिक्षणाची गंगा प्रवाहित करण्याचे कार्य विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांच्यापासून सुरु झाले. कोण आहेत हे अप्पासाहेब जाणून घेऊया..

महाराष्ट्रातील एक शिक्षणतज्ज्ञ, मुरब्बी प्रशासक, मराठ्यांच्या इतिहासाचे ख्यातकीर्त संशोधक, तसेच महाराष्ट्र राज्याचे ते पहिले शिक्षण संचालक होते. अशी ओळख असलेले अप्पासाहेब गणपतराव पवार यांची अजून एक महत्वाची ओळख म्हणजे, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे शिल्पकार!

अप्पासाहेब यांचा जन्म कुरुंदवाड संस्थानातील मुचंडी या बेळगावपासून जवळ असलेल्या एका खेडेगावातला.

मूळचे शेतकरी कुटुंबात वाढलेले अप्पासाहेबांच्या वडिलांचे नाव गणपतराव, तर आईचे नाव गंगाबाई होते. त्यांना श्रीपतराव व बसवंतराव नावाचे दोन भाऊ आणि विमलाबाई (विमलाबाई वसंतराव बागल) ही एक बहीण होती. त्यांचे वडील कुरुंदवाड संस्थानचे सनदी वकील होते.

व्यवसायाने वकील असल्यामुळे गणपतरावांची बदली जवळच्याच वडगावला झाली. १९१२ साली  गणपतरावांनी मुचंडीहून बेळगाव जवळच्या वडगावला १९१२ साली सहकुटुंब स्थलांतर केले. त्यामुळे आप्पा साहेबांचे प्राथमिक शिक्षण वडगाव येथे, तर माध्यमिक शिक्षण शहापूर येथील चिंतामणराव हायस्कूलमधून (पूर्वीचे सर परशुरामभाऊ पटवर्धन हायस्कूल) झाले, आणि १९२४ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.

आणि त्यानंतर आप्पासाहेब उच्चशिक्षणासाठी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये दाखल झाले. कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षेत भौतिकशास्त्र आणि इंग्रजी या विषयांत आप्पासाहेब प्रथम आल्यामुळे त्यांना करवीर दरबारची ‘आल्फ्रेड स्कॉलरशिप’ मिळाली.

त्यावेळी डॉ. बाळकृष्ण हे इतिहास संशोधक व शिक्षणतज्ज्ञ राजाराम कॉलेजचे प्राचार्य होते. अप्पासाहेबांनी बी. ए. साठी इतिहास, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र हे विषय निवडल्यामुळे ते डॉ. बाळकृष्ण यांच्या सानिध्यात आले. बाळकृष्ण सरांची विद्वत्ता, त्यांचे प्रभावी वक्तृत्व व अभ्यासू वृत्ती या गोष्टींचा आप्पासाहेब यांच्यावर मोठा प्रभाव पडला

आप्पासाहेबांनी मुंबई विद्यापीठामध्ये १९२८ मध्ये बी. ए. पदवी संपादन केली. या पदवी परीक्षेतील उच्च गुणवत्तेमुळे त्यांना पुढील शिक्षणासाठी कोल्हापूर संस्थानाची फेलोशिप व मुंबई प्रांतिक सरकारची स्कॉलरशिप मिळाली. १९३० मध्ये त्यांनी इतिहास व अर्थशास्त्रात एम. ए. पूर्ण केलं तर १९३१ साली एलएल.बी पूर्ण केलं.

आणि मग ते पुढील शिक्षणासाठी काही वेगळा विचार करण्यात गुंतले, इतिहास विषयात ‘डॉक्टरेट’ मिळवण्यासाठी त्यांनी इंग्लंडला जाण्याचं त्यांनी ठरवलं. परदेशात शिकायचं म्हणलं कि, समोर आर्थिक प्रश्न होताच. मात्र त्यांना या उच्च शिक्षणासाठी आवश्यक ते आर्थिक मदत करणाऱ्यांमध्ये अनेक मोठी मंडळी होती.

त्यात कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापुरातील मराठा समाजातील सधन धान्य व्यापारी बळवंतराव सखाराम शिंदे यांच्या मदतीमुळे अप्पासाहेब पुढे जाऊ शकले. 

ऑगस्ट १९३१ ला ते इंग्लंडला गेले. लंडन विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ ऑरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज्’ मध्ये त्यांनी प्रा. बार्नेट यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षे संशोधन करून ‘दि रेन ऑफ शाहू छत्रपती’हा सातारच्या छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीचा समग्र अभ्यास करणारा प्रबंध सादर केला व त्यांना लंडन विद्यापीठाची इतिहास विषयाची पीएच. डी. पदवी मिळाली.  इंग्लंडमधील त्या काळामध्ये त्यांनी अडचणींना तोंड दिले.

भारतात परत आल्यानंतर १९३५ च्या ऑगस्टमध्ये अप्पासाहेबांनी कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयामध्ये इतिहास व अर्थशास्त्रचे प्राध्यापक म्हणून शैक्षणिक पेशा सुरु केला. इतिहासाचा मोठा व्यासंग व वक्तृत्व गुण, विद्यार्थ्यांबद्दलचे प्रेम यामुळे अल्पावधीतच उत्तम प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकिक झाला.

त्याकाळात त्यांनी महाविद्यालयाचे ग्रंथालय समृद्ध केले. ते खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचे, ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव हे याच कालावधीत राजाराम महाविद्यालयाचे विद्यार्थी होते.

त्यांचा १९३६ मध्ये बळवंतराव शिंदे यांच्या ‘सुशीला’ या कन्येशी विवाह झाला. त्यांना पाच मुली व दोन मुलगे अशी सात अपत्ये होती.

आप्पासाहेब राजाराम कॉलेजमध्ये १९३५–४५ पर्यंत प्राध्यापक आणि १९४५ ते १९४९ या कालावधीत प्राचार्य होते. प्रभावी अध्यापन आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक ही त्यांची वैशिष्ट्ये.

कोल्हापूर संस्थानाच्या विलीनीकरणानंतर १९४९ मध्ये त्यांची गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात बदली झाली. गुजरातमधील विसनागर येथील महाविद्यालयाचे ते प्राचार्य म्हणून काम पाहू लागले. तीन वर्षात विविध प्रकल्प राबवून त्यांनी कॉलेजला उत्तम दर्जा प्राप्त करून दिला. तेथे ते गुजराती भाषाही शिकले.

१९५२ ते १९५४ ह्या काळात पुणे येथे ते शिक्षण उपसंचालक पदावर होते. काही काळ त्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाचे अध्यक्षपद भूषविले.

१९५९ ते १९६० महाराष्ट्र राज्याचे शिक्षण सहसंचालक व १९६० ते १९६२ पर्यंत शिक्षण संचालक म्हणून समर्थपणे जबाबदारी पेलली. ग्रामीण भागात महाविद्यालये सुरू करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. माध्यमिक शाळांच्या इमारतींना अनुदान देण्याची प्रथा सुरू केली.

दक्षिण व पश्‍चिम महाराष्ट्रासाठी स्वतंत्र विद्यापीठ हवे असा विचार करून, महाराष्ट्र शासनाने सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या चार जिल्ह्यांसाठी १९६२ मध्ये शिवाजी विद्यापीठाची स्थापना केली. त्या नवीन विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून शासनाने आप्पासाहेबांची नियुक्ती केली.

विद्यापीठाचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांच्या हस्ते झाले. नव्याने स्थापन झालेल्या या विद्यापीठाच्या उभारणीचे मोठे आव्हान त्यांनी समर्थपणे पेलले. विद्यापीठाच्या कार्यास गती आली ती त्यांच्यामुळे.

अप्पासाहेबांना १९७५ पर्यंत कुलगुरू पद मिळाल्याने त्यांनी विद्यापीठाचे नियोजनपूर्वक सर्व कामे पूर्ण केली. विद्यापीठासाठी कोल्हापूर शहराच्या बाहेर १०४७ एकर जमीन मिळाली. बांधकामास सुरूवात झाली. इमारती उभ्या केल्या.  विद्यापीठास प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होण्यासाठी, विद्यापीठ खर्‍या अर्थाने लोकपीठ व्हावे यासाठी अप्पासाहेबांनी खूप प्रयत्न केले.

गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका योजना सुरू केली. व्याख्यानमाला सुरू केल्या. विविध विषयांच्या संशोधनास चालना दिली.

प्रारंभी विद्यापीठ क्षेत्रात तेहतीस महाविद्यालये होती. डॉ. अप्पासाहेब पवारांच्या १२ वर्ष १ महिन्याच्या  कार्यकाळात चौर्‍याऐंशी महाविद्यालये झाली. शिवाजी विद्यापीठाला सक्षम विद्यापीठ बनवून डॉ. अप्पासाहेब पवार २० जानेवारी १९७५ रोजी कुलगुरू पदावरून निवृत्त झाले.

त्यांच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी दूरदृष्टीने शिवाजी विद्यापीठाच्या भावी वाटचालीची भक्कम पायाभरणी केली.

कठोर परिश्रम घेऊन त्यांनी कोल्हापूरच्या निर्जन, उजाड सागर माळावर चैतन्यशाली विद्यानगरी वसविली. नवोदित प्रादेशिक विद्यापीठाच्या सर्व गरजा लक्षात घेऊन त्यांनी शिवाजी विद्यापीठाची उभारणी केली. त्यांच्या कार्यकाळातील विद्यापीठ परिसराचा विकास, प्रशासनाची भक्कम चौकट, मजबूत अर्थव्यवस्था, नावीन्यपूर्ण उपक्रम, योजना यांमुळे शिवाजी विद्यापीठाचा सर्वत्र नावलौकिक झाला. विद्यापीठाच्या उभारणीतील त्यांच्या असामान्य योगदानामुळे त्यांना शिवाजी विद्यापीठाचे शिल्पकार म्हटले जाते.

तसेच अप्पासाहेब अव्वल दर्जाचे इतिहास संशोधक होते. मराठ्यांच्या इतिहास संदर्भातील त्यांची कामगिरी प्रशंसनीय आहे.

मराठ्यांच्या इतिहासातील १६०० ते १७६१ या कालखंडातील अनेक दुर्मिळ दस्तऐवज, पत्रे, दफ्तरे ह्यांचा अभ्यास व संशोधन करून त्यांनी ती प्रकाशित केली. जिजाबाई व ताराबाई कालीन कागदपत्रांबरोबरच छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची कागदपत्रेही त्यांनी प्रकाशित केली.

त्यांचे इतिहास संशोधनातील योगदान दोन प्रकारचे होते. एक म्हणजे प्रकाशित शोधनिबंध आणि दुसरा ऐतिहासिक कागदपत्रांचे संपादन. त्यांचे निवडक १४ शोधनिबंध स्टडीज् इन मराठा हिस्ट्री (खंड–१) या ग्रंथात प्रकाशित झाले. तसेच त्यांचा १९३४ साली लंडन विद्यापीठाला सादर केलेला पीएच. डी. चा प्रबंध २०१३ साली शिवाजी विद्यापीठाने प्रकाशित केला होता.

शिवाजी विद्यापीठाच्या ऐतिहासिक ग्रंथमालेत ताराबाईकालीन कागदपत्रे,  खंड 1, 2, 3 ‘ताराबाई पेपर्स: ए कलेक्शन ऑफ पर्शियन लेटर्स’  जिजाबाई कालीन कागदपत्रे आणि राजर्षी शाहू छत्रपती पेपर्स या ग्रंथमालेतील पहिला खंड फ्रॉम ॲडॉप्शन टू इन्स्टॉलेशन हे ऐतिहासिक कागदपत्रांचे सहा खंड संपादित करून प्रकाशित केले आहेत. करवीर राज्य संस्थापिका महाराणी ताराबाईंच्या कामगिरीचे साधार विवेचन व मूल्यमापन हे आप्पासाहेबांचे मराठा इतिहास अभ्यासातील महत्त्वाचे योगदान आहे.

अखिल भारतीय इतिहास परिषद, इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्डस् कमिशन, इन्स्टिट्यूट ऑफ हिस्टॉरिकल स्टडीज्, कोलकात्ता महाराष्ट्र इतिहास परिषद, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे या इतिहास संशोधन क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्था–संघटनांचे ते क्रियाशील सभासदही होते. १९७१ साली ‘भारत- लंका आंतरविद्यापीठ महामंडळ’ या संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती.

डॉ. अप्पासाहेब पवार हे आदर्श शिक्षक, उत्कृष्ट प्रशासक, व्यासंगी इतिहास संशोधक व चिंतनशील शिक्षणतज्ज्ञ होते.

त्यांचे पुणे येथे ३० डिसेंबर १९८१ मध्ये वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. शिवाजी विद्यापीठाचे शिल्पकार म्हणून त्यांचे नाव महाराष्ट्राचा इतिहासात त्यांचे नाव नेहेमीच गौरवाने घेतले जाईल.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.