पंडित नेहरू यांच्या अस्थीकलशाच्या तांब्याचे बिल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले होते.

पंडित जवाहरलाल नेहरू !

भारतातील जनतेचं प्रेम यांच्याएवढं इतर कुठल्याच पंतप्रधानांना मिळालं नसेल हे नक्की..

२७ मे १९६४ रोजी पंडितजींचे निधन झाले आणि संपूर्ण देशच दुःखात बुडाला. साहजिकच होतं, त्यांच्या निधनाने भारताचे खूप मोठे भरून न निघणारे नुकसान झाले होते.

सर्वांच्याच मनात एकच भावना होती, आपण खूप मोठं काहीतरी गमावलं आहे !

ज्या नेत्याने स्वातंत्र्यानंतर या देशाला घडवले, मातीच्या भांड्याप्रमाणे आकार दिला अशा नेत्याला निरोप देणे म्हणजेच गांधीजींच्या निधनानंतरची भारतातील मोठी घटना होती. 

आपल्या लाडक्या नेत्याचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी लोकांनी दिल्लीच्या रस्त्या-रस्त्यावर गर्दी केली होती.  पार्थिवाच्या आजूबाजूला तर इतकी प्रचंड गर्दी झाली होती कि, या जमावाला आवरता आवरता पोलीस यंत्रणेला दमछाक झाली होती. गर्दीतून वाट काढत नेहरूंची अंत्ययात्रा राजघाटावर पोहचली

आणि त्या पवित्र देहाला गुंडाळण्यात आलेला तिरंगा काढण्यात आला आणि चंदनाच्या चितेला १७ वर्षांच्या राजीव गांधींच्या हस्ते अग्नी देण्यात आला.

त्या ठिकाणी इंदिरा गांधी, राजीव गांधी, नेहरूंच्या बहिण कृष्णा हत्तीसिंह तसेच विजयालक्ष्मी पंडित या देखील होत्या. विजयालक्ष्मी पंडित तेंव्हा महाराष्ट्राच्या राज्यपाल होत्या.

हे संस्कार आटोपले आणि विजयालक्ष्मी पंडित यांनी एका तांब्याच्या कलशात नेहरूंची अस्थीरक्षा घेतली आणि महाराष्ट्रात आणली. शिष्टाचार खात्याने तो कलश मिरवणूकीने मिरवत विमानतळापासून मंत्रालयापर्यंत आणला.

लोकांना त्या कलशाचे दर्शन घेता यावे आणि आदरांजली वाहता यावी या उद्देशाने काही काळ तो कलश प्रदर्शनासाठी ठेवला होता.

त्यावेळी मुख्यमंत्री होते महाराष्ट्राच्या कृषीक्रांतीचे जनक स्व.वसंतराव नाईक. वसंतराव नाईक हे जवाहरलाल नेहरू यांच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांपैकी एक होते. त्यांची नाईकांवर विशेष मर्जी होती. वसंतराव नाईक देखील नेहरूंच्या निधनामुळे आपल्या घरातील वडीलधारी व्यक्ती गेल्याप्रमाणे कष्टी झाले होते. जेव्हा नेहरूंचा अस्थिकलश मुंबईला आला तेव्हा वसंतराव नाईकांनी तो कलश नाशिकला गोदावरी नदीत अस्थीविसर्जन करण्यासाठी नेला.

अत्यंत भावपूर्ण समारंभात मुख्यमंत्र्यांनी नेहरूंची अस्थी गोदावरीच्या पवित्र पाण्यात विसर्जित केली.

या घटनेला काही दिवस झाले. विजयालक्ष्मी यांच्या दिल्लीतील वैयक्तिक सेक्रेटरीकडून काही दिवसांनी राजभवनात विजयालक्ष्मी यांच्याकडे एक बिल पाठवले गेले. त्यांनी हे बिल शिष्टाचार खात्याला पाठवून दिले. ते बिल होते नेहरूंच्या अस्थी ठेवलेल्या तांब्याच्या कलशाचे.

तेंव्हा शिष्टाचार विभागाला हे असे क्षुल्लक बिल येणे जरा आश्चर्यकारकच होते.

परंतु हे सर्वांच्या कानावर जायला नको, पंडित नेहरूंच्या एका तांब्याच्या कलशाचे पैसे महाराष्ट्र सरकार देऊ शकलं नाही अशी उगीच चर्चा नको व्हायला म्हणून हि गोष्ट मुख्यमंत्र्याच्या कानावर न घालता विभागाने ते बिल परस्पर मंजूर करून टाकले.

कितीही झालं तरी नेहरू हे विजयालक्ष्मी यांचे भाऊ होते त्यामुळे त्यांचे एका तांब्याचे बिल मागवणे जरा चमत्कारिकच होते.

पंडित नेहरू असतांना देखील याच विजयालक्ष्मी मुख्यमंत्र्यांचे स्वागत अगदी हात राखूनच अगदी काटेकोरपणे म्हणजेच काटकसरीने करायच्या. परंतु पंडितजींच्या जाण्यानंतर त्या मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या सुभेच्छा देखील पाठवायच्या. जरी मुख्यमंत्री दौऱ्यावर असतील तरीही विजयालक्ष्मी यांच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहचवायला विसरत नसत.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.