बाबर आझमवर टिका म्हणजे, आपलं ठेवायचं झाकून दूसऱ्याचं बघायचं वाकून…

पाकिस्तानचा विराट कोहली कोणाय माहिती का?

गल्ली पासून दिल्लीपर्यंत क्रिकेट खेळणाऱ्या, क्रिकेट आमचं पहिलं प्रेम हाय असं जीव बडवून सांगणाऱ्या आणि टीव्हीपुरतंच आपलं क्रिकेट प्रेम मर्यादित ठेवणाऱ्या प्रियकरांना हा पाकिस्तानी विराट कोण सांगायची गरजच नाय.. तुम्ही ओळखणारच

नसेल ओळखलं तर भिडू सांगणारच ओ.. टेन्शन नाय घ्यायचं

बाबर आझम असं या पोराचं नाव. पाकिस्तानच्या क्रिकेट संघात वासरात लंगडी गाय शहाणी असं म्हणतात ना त्यो ह्योच पठ्ठ्या. आता यान असा काय पराक्रम केला की याच्यावर आपण बोलतोय असं विचाराल, तर हा लग्न करतोय.

त्याच्या चुलत बहिणीशी, अन त्यावरन ट्रोल होतोय बिच्चाराSSSS…

चुलत भाऊ किंवा बहीण किंवा जवळच्या नातलगाशी लग्न करणं पाकिस्तानसारख्या मुस्लिमबहुल देशात आणि मिडल ईस्ट मध्ये सर्वसामान्य आहे. अहो अशी लग्न आपल्या भारतात पण होतात, अगदी महाराष्ट्रात सुद्धा. पण या लोकांना कोणी ट्रोल करत नाही. संस्कृती आहे त्यांची. आता या संस्कृतीचा इतिहास लै मोठा आहे. तेवढ्या खोलात आपण नंतर कवातरी जाऊ.

आत्ता आपण जरा आपल्या घरातलं चंबूगबाळ बघू.. आपला पसारा झाकून, दुसऱ्याच कित्ती ते बघायचं, न्हाई का?

दुनियेत लग्नाच्या बऱ्याच प्रथा परंपरा आहेत. तशा काहीशा विचित्र पद्धती आपल्या घरात म्हणजेच भारतात पण आहेत. म्हणजे बाई – माणूस, माणूस – माणूस, बाई – बाई असं चालतंय ओ. मग त्यात भाऊ बहीण असा विषय येत नाही. माणसंच आहेत नव्ह ती.

मग बस्स्स. चला आता पुढं

बरं लग्न कुणाशी करावं इसपे तों किसीका बस नहीं. आणि भारतीय संस्कृतीनं तर यावर अजिबात निर्बंध घातलेले नाहीत.

प्राचीन भारतीय संस्कृतीचं बोलतोय भिडू, समजलं का.

ज्या नाठाळ आणि खोडकर लोकांना माणूस – माणूस, बाई – बाई चालत न्हाई त्यांच्यासाठी झ्याक इशय घावलाय.

तर विषय असाय की, आपला देश पशु, पक्षी, झाड, वेली, पान, फुल, फळ यांना विशेष महत्व देतो. इतकं महत्व की, आपल्यात कुत्र्या मांजरासंग सुद्धा खुळ्या टाळक्याची लोक लग्न करत्यात.

संस्कृती म्हणा अंधश्रद्धा म्हणा नाहीतर बाबर आझम सारखं प्रेम समजा, खरं हे खरंय..अगदी आईच्यान ओ.

झारखंडच्या एका छोट्याशा गावात मंगली मुंडा नावाची १८ वर्षांची मुलगी राहते. तिच्यावर कसली तरी काळी सावली होती आणि तिच्या पत्रिकेत मंगळदोष होता. तिच्या या दोषामुळे तिच्या घरच्यांना त्रास होईल, त्यामुळ तीच लग्न एका कुत्र्याशी लावण्यात आलं. मोठ्या धुमधडाक्यात शेरू नावाच्या गल्लीतल्या कुत्र्याबर तीच लग्न लावण्यात आलं. (तुम्हाला लाडू दिले नाहीत म्हणून लग्न खोटाय असा काय विषय न्हाई)

आता हे एकच लग्न असं विचित्र नाही तर अख्या झारखंड मध्ये अशी लग्न होतात. विशेष म्हणजे या लग्नाने ना पोरी उदास होतात ना त्यांच्या घरचे. सगळीकडं आनंदाचं भरत आलेलं असत. जो या पोरीचा नवरदेव असतो त्या, आपल्या श्वान पतीची काळजी घेणं या पोरीचं आद्य कर्तव्य असत.

आता पुढं आहे उत्तर प्रदेश.. यांना तर सगळीकडं नंबर लावायचाच असतो.

प्रयागराज इथल्या मनकवार गावात एक विचित्र लग्न पार पडलं होत. ९० वर्षांच्या शिवमोहन यांना ९ मुल होती. यातल्या सगळ्यात लहान असलेल्या पंचराज याच हे लग्न होतं. त्याच्या वडिलांची इच्छा होती की ते जिवंत असेपर्यंत मुलाच लग्न पाहायला मिळू दे. त्याच लग्न काही केल्या जुळेना.

शेवटी  पुरोहीत मंडळींनी सांगितल की पंचराजने लाकडी बाहुलीशी लग्न करावे म्हणजे त्याच लग्न ठरेल. पंचराज याला राजी नव्हता, मात्र वडिलांच्या इच्छेखातर त्याने या विचित्र लग्नाला होकार दिला. या लग्नासाठी रितसर मुहुर्त काढण्यात आला, पाहुणे मंडळींना आमंत्रणं पाठवण्यात आले, सोशल डिस्टन्सिंग पाळत पंगती उठल्या आणि हा विवाह सोहळा संपन्न झाला. (लॉकडाऊनच्या काळातलं लग्न बर का)

चला पुढं चला, पुढची लग्न उरकायची हैत.. कुंभ लग्न, पिंपळ लग्न, वटवृक्षाशी लग्न, रुईशी लग्न, अश्वत्थाची (पिंपळाची) मुंज व तुळशीचं लग्न.. नुसता ढीग

हिंदुधर्मानुसार मंगळाचा दोष असलेल्या मुलीला आपल्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर लग्न करण्याआधी पिंपळ किंवा वटवृक्षाच्या झाडासोबत लग्न कराव लागत. तसेच ती एका मातीच्या भांड्यासोबतही लग्न करू शकते. याला कुंभ लग्न म्हणतात. या सर्व रितीरिवाजा नंतर त्या मातीच्या भांड्याला तोडून टाकतात. या वरून अस समजल जात की ती मुलगी आता विधवा झाली असून ती मंगळ दोषातून मुक्त झाली आहे.

असं लग्न झालंय आपल्या मिस वर्ल्डचं..

आपल्या ऐश्वर्याच ओ. तिच्या कुंडलीत मांगलिक दोष होता आणि अभिषेक सोबत लग्न करण्यापूर्वी ऐश्वर्याने कुंडलीतील दोष दूर करण्याकरिता एका पिंपळाच्या झाडाशी लग्न केले होत.

आता या झाडांशी लग्न का करतात ?

तर काहींच्या मते देव, दानव, गंधर्व, किन्नर, यक्ष, इ. दैवी व अतिमानवी योनीतील अद्भूत, अलौकिक कृत्ये करणाऱ्या शक्तींचा वास प्राधान्याने वृक्षांवर असल्याची मानवाची कल्पना होती. त्यामुळे यात असणाऱ्या अद्भुत शक्तींच्या वासामुळे काही वनवासींमध्ये मुलीचे लग्न प्रथम एखाद्या वृक्षाशी लावतात व नंतर वराशी लावतात. आता या वनवासीयांमध्ये आपण शहरवासीय ही आलोय.

काही ठिकाणी मुलीचा विवाह प्रथम कुंभाशी ,विष्णू प्रतिमेशी किंवा अश्वत्थ वृक्षाशी करतात. काही ठिकाणी माणसाचे तिसरे लग्न लावण्यापूर्वी रुईशी लग्न करण्याची प्रथा आहे. या प्रथेला ‘अर्कविवाहः’ असे नाव गीर्वाण लघुकोशात पाहायला मिळाते.

आता हे झालं आपल्या घरच थोडथोडकं विचित्र लग्न पुराण. पाकिस्तान भले ही आपला चोमडा आणि लबाड शेजारी असला तरी त्यांची उणीदुणी काढण बरं नव्ह. चिखलात दगड फेकला तर चिखलाच्या थोड्या का होईना चिकळ्या तर आपल्या अंगावर पण उडत्यात.

वर दिलेली सर्व प्रतीकात्मक लग्न जरी असली तरी काही प्रतीकात्मक लग्नांनी असभ्यतेचा कळस गाठलाय ओ. बाबर आजम आपल्या बहिणी बरोबर लग्न करतोय कारण तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केलाय. आपल्या सौंदत्तीच्या बायांनी कुणाकुणाला धरावं..

लोकांचा आणि प्रथांचा वाईटपणा पाहण्यासाठी पाकिस्तानातच कशाला जायला पाहिजे. सांगलीच्या थोडं पुढं सौंदत्तीला जाऊन बघा. मग समजतंय प्रतीकात्मक लग्न काय असतय. आयुष्यभर घूम बनून राहणाऱ्या, देवाशी लग्न करणं लै अवघड असतय राव.. लग्न झालेल्या आपल्या पतीशी समागम करता न येणं, त्याऐवजी कुणी पण यावं टिकली मारून जावं अशी गत होते त्या देवदासींची. विनाकारण देवाच्या दरबारातल्या पोरी वेश्याव्यवसायात ढकलल्या जातात.

आणि कसाय न आपल्या लोकांचं लै चुकत, स्वतःच ठेवात्यात झाकून आणि दुसऱ्याच बघत्यात वाकून. बाकी आपलं चंबूगबाळ लै बाहेर काढून चालत नसतंय…लोक रुस्त्यात राव..

हे हि वाच भिडू.

1 Comment
  1. Soms says

    पाकिस्तान बद्दल विषय निघाल्यावर तुमची का जळते

Leave A Reply

Your email address will not be published.