३०० वर्षांपूर्वी वारणेचा तह झाला होता, त्यानंतर आता सातारा-कोल्हापूर गाद्या एकत्र येत आहेत

सातारा आणि कोल्हापूर. हिंदवी स्वराज्याच्या दोन ऐतिहासिक गाद्या. दोन्ही गाद्यांना राज्यात तेवढाच मान दिला जातो. सध्या सातारच्या गादीचे वारसदार आहेत खासदार उदयनराजे तर कोल्हापूरच्या गादीचे वारसदार खासदार संभाजीराजे.

हे दोन्ही राजे सध्या चर्चेत आहेत ते राज्यातील मराठा आरक्षण या प्रश्नावर. मात्र चर्चेत असले तरी ते या प्रश्नावर कायमचं वेगवेगळे असल्याचं दिसून येतं. यात अगदी मग कायदा रद्द झाल्यानंतर आरक्षण प्रश्नावर नेतृत्वाच्या मुद्द्यापासून ते अगदी आंदोलनाच्या भूमिकेपर्यंत.

संभाजीराजेंनी सध्या १६ जून पासून आंदोलन करणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे. तर दुसऱ्या बाजूला उदयनराजे आरक्षण मिळण्यासाठी आग्रही आहेत, मात्र अजूनही त्यांनी कोणती जाहीर भूमिका घेतली असल्याचं दिसून येतं नाही. 

काल पुण्यात आरक्षण प्रश्नावर उदयनराजे आणि संभाजीराजे यांची भेट होणार होती, पण ती उदयनराजेंनी कामानिमित्त रद्द केली. मात्र संभाजीराजे माझे भाऊ असून पुढे २ ते ४ दिवसात त्यांची भेट नक्की भेट होईल असं उदयनराजेंनी सांगितलं आहे. त्यामुळे लवकरच आता या दोन्ही गाद्या एकत्र येत आहेत.

मात्र या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न काय विचारला जातो कि आता पर्यंत उदयनराजे आणि संभाजीराजे हे दोघे एकत्र का नाहीत?

तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला मागे इतिहासात जावं लागतं. किती मागे तर अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या वर्षात.

शिवाजी राजेंचा १६८० साली रायगडावर आकस्मिक मृत्यू झाला. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज हे त्यांचे दोन पुत्र. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावर युवराज संभाजीराजेंनी राज्याभिषेक करवून घेतला आणि छत्रपतीची सूत्रे हाती घेतली. मराठा साम्राज्याच्या विनाशाची प्रतिज्ञा घेऊन दक्षिणेत आलेल्या औरंगजेबाशी लढताना संभाजी महाराजांचा मृत्यू झाला.

संभाजीराजेंसोबतच त्यांच्या पत्नी राणी येसूबाई आणि मुलगा शाहू यांनाही औरंगजेबानं कैद केलं होतं.

संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर छत्रपतीपद आले धाकटे बंधू राजाराम महाराज यांच्याकडे. राजाराम महाराज काही काळ महाराष्ट्रात राहिले आणि नंतर त्यांच्या मागावर असलेल्या मुघलांना झुगारा देऊन ते आपल्या कुटुंबियांसह विश्वासू सैनिकांबरोबर पन्हाळ्यामार्गे जिंजीकडे गेले. तिथून ते महाराष्ट्र आणि जिंजीचा कारभार रामचंद्र पंत अमात्य बावडेकर, संताजी घोरपडे, धनाजी जाधव या सरदारांच्या यांच्या सहाय्याने चालवत होते.

तिथून ८ वर्षे राज्यकारभार चालवल्यानंतर १६९८ साली ते महाराष्ट्रात परतले आणि त्यानंतर पुढचे २ वर्ष ते महाराष्ट्रातच होते. १७०० साली वयाच्या ३० व्या वर्षी त्यांचा सिंहगडावर मृत्यू झाला.

छत्रपती राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी महाराणी ताराराणी यांनी आपला मुलगा शिवाजी (दुसरे) यांना पन्हाळ्यास गादीवर बसवून स्वतः राज्यकारभार सुरू केला.

मात्र याच दरम्यान १७०७ साली औरंगजेबच्या मृत्यूनंतर आझमशाह याने दिल्लीच्या मार्गावर असता शाहू महाराजांची सुटका केली.

शाहू महाराजांच्या स्वराज्यातील आगमनामुळे राजकारणाला नवी कलाटणी मिळाली.

शाहू मोगली छावणीत सोळा-सतरा वर्षे राहून आल्यामुळे त्यांना राज्यकारभाराचा अनुभव नव्हता. मात्र बाळाजी विश्वनाथ पेशव्याच्या प्रयत्नामुळे पातशाहीकडून त्यांना स्वराज्य, चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मिळाले. त्यांच्या पाठबळावर शाहू अहमदनगरमार्गे सातारला येत असताना, १७०७ साली भीमेकाठी खेड येथे ताराबाई त्यांच्या विरोधात उभ्या राहिल्या.

मात्र शाहू महाराज साताऱ्यास आले आणि त्यांनी छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. यानंतर ताराराणींच्या पक्षातले एकेक सरदार बाहेर पडून तिकडे जाऊन मिळू लागले. यामुळे शाहू महाराजांचं पारडं अधिकाधिक जड होऊ लागलं. अखेर धनाजी जाधव शाहूंच्या पक्षात गेल्यानंतर सर्व परिस्थिती पालटली.

शाहू महाराजांनी ताराराणींच्या ताब्यातील पन्हाळ्यावर हल्ला केला. त्यानंतर ताराराणी काही काळ रांगणा किल्ल्यावर गेल्या. आणि अशा पद्धतीने १७०८ साली छत्रपती शाहू महाराजांची साताऱ्यात सत्ता स्थापन झाली. 

काही काळानंतर ताराराणी यांनी पन्हाळा, विशाळगड पुन्हा जिंकून घेतले आणि १७१० साली कोल्हापूर राज्याचा पन्हाळ्यावरती पाया रचला. त्यामुळे एका स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली.

त्यामुळे स्वराज्यात सातारा आणि कोल्हापूर अशी दोन राज्य तयार झाली.

पुढचे जवळपास ४ वर्ष हीच स्थिती काय होती. मात्र १७१४ साली राजाराम महाराज यांची दुसरी पत्नी राजसबाई आणि त्यांचे पुत्र संभाजी (दुसरे) यांनी अचानक ताराराणींना बाजूला केलं आणि राज्यकारभार हातात घेतला. सोबतच ताराराणी आणि शिवाजी (दुसरे) यांना पन्हाळगडावरच नजरकैदेत ठेवण्यात आलं. याच नजरकैदेत शिवाजी (दुसरे) यांचा १७२७ साली मृत्यू झाला.

दुसरे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराराणी साताऱ्याला शाहू महाराजांच्या आश्रयाला गेल्या.

अखेरीस १७३२ साली शाहू महाराज आणि कोल्हापूरचे संभाजी (दुसरे) यांच्यामध्ये वारणेचा तह झाला. या तहानुसार वारणा नदीच्या उत्तरेस शाहू महाराज यांचे सातारा संस्थान आणि दक्षिण संभाजी यांचे कोल्हापूर संस्थान अशा दोन राजगाद्या तयार झाल्या.

१. सातारची गादी :

शाहू महाराज यांना कोणतेही अपत्य नव्हते. त्यामुळे साताऱ्याच्या गादीला शाहू महाराजांनंतर वारस नसल्याचे चित्र महाराणी ताराबाई यांना स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी रामराजा (राजाराम दुसरे) हा आपला नातू आहे, आणि थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा थेट वंशज आहे. असे सांगून त्यांना सत्तेवर बसवण्यास शाहू महाराज यांना तयार केलं.

पुढे १७४९ साली शाहू महाराजांच्या निधनानंतर रामराजे साताऱ्याच्या गादीवर आले. मात्र रामराजे काही काळानंतर पेशव्यांच्या सल्ल्यानुसार वागत असल्याचं लक्षात आलं आणि महाराणी ताराराणी यांनी रामराजाला १७५० साली तो खरा वारसदार नसल्याचं सांगत कैदेत टाकलं आणि स्वतः साताऱ्याच्या गादीचा कारभार हातात घेतला.

मात्र पेशव्यांनी सैन्यबळाचा वापर केल्यावर पुन्हा सोडून देखील दिला. अशातच १७६१ साली महाराणी ताराराणी यांचा साताऱ्यातच मृत्यू झाला. पुढे १७७७ साली रामराजे यांचा देखील मृत्यू झाला. त्यांनी शाहुराजे (दुसरे) यांना दत्तक घेतलं होतं. प्रतापसिंह महाराज हे त्यांचे पुत्र होते.

१८१८ साली मराठा साम्राज्य संपुष्टात आलं. पण साताऱ्यामध्ये प्रतापसिंहांना नव्याने राजपदावर स्थानापन्न करण्यात आलं. २५ सप्टेंबर १८१९ मध्ये इंग्रज शासन आणि प्रतापसिंह यांच्यामध्ये करार झाला. पुढे सप्टेंबर १८३९ मध्ये प्रतापसिंह यांना इंग्रजांनी पदच्युत केले. त्यानंतर ते वाराणसीला जाऊन राहिले.

प्रतापसिंह यांच्यानंतर त्यांचे भाऊ आप्पासाहेब म्हणजेच शहाजीराजे साताऱ्याच्या गादीची सूत्रं सांभाळू लागले. पुढे १८४९ साली साताऱ्याचे राज्यच खालसा झाले. याच भोसले घराण्याचे सध्या उदयनराजे भोसले थेट वंशज आहेत.

२. कोल्हापूर गादी : 

वारणेच्या तहानंतर संभाजीराजे (दुसरे) कोल्हापूरचा कारभार पाहत होते. मात्र अपत्य नसल्यामुळे त्यांनी शिवाजी (दुसरे) यांना दत्तक घेतले होते. हे शिवाजी (दुसरे) १७६२ ते १८१३ असे जवळपास ५१ वर्षे कोल्हापूरच्या गादीवर होते.

त्यानंतर पुढचे २५ वर्ष म्हणजे १८३८ पर्यंत संभाजी महाराज आणि शहाजी महाराज या दोन भावांनी कोल्हापूरची गादी सांभाळली.

त्यानंतर शहाजी महाराज यांचे पुत्र शिवाजी (तिसरे) यांनी १८६६ पर्यंत कोल्हापूरच्या गादीचा राज्यकारभार केला. त्यांनी राजाराम महाराजांना यांना दत्तक घेतले. हे राजाराम महाराज १८७० साली इटलीमध्ये वारले. मात्र त्यांनाही पुत्र नसल्यामुळे शिवाजी (चौथे) यांना दत्तक घेण्यात आले. त्यांचा १८८३ साली मृत्यू झाला.

शिवाजी (चौथे) यांच्या मृत्यूनंतर कागलकर घाटगे घराण्यातून यशवंतराव यांना दत्तक घेण्यात आलं. तेच आज सर्वत्र राजर्षी शाहू महाराज म्हणून ओळखले जातात.

राजर्षी शाहू महाराज यांचं १९२२ साली निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले. १९४० पर्यंत त्यांनी कोल्हापूरचा राज्यकारभार सांभाळला. त्यानंतर १९४६ पर्यंत शिवाजी हे कोल्हापूरचे राजे होते. ते साताऱ्याच्या भोसले घराण्यातून दत्तक आले होते.

त्यांच्यानंतर देवास संस्थानच्या पवार घराण्यातून शहाजी (दुसरे) दत्तक आले. १९८३ साली त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर नागपूरकर भोसले घराण्यातून दत्तक आलेले शाहू महाराज (दुसरे) यांनी पुढील धुरा सांभाळली आहे.

याच शाहू महाराज (दुसरे) यांचे संभाजीराजे आणि मालोजीराजे हे दोन पुत्र आहेत.

इतिहासात कोणत्या मुद्द्यावर या दोन्ही गाद्या कधी एकत्र आल्या आहेत का? 

सध्या ज्या पद्धतीने मराठा आरक्षण प्रश्नावर या दोन्ही गाद्यांच्या एकत्र येण्याबाबत चर्चा सुरु आहेत, त्या पद्धतीने या आधी कधी कोणत्या मुद्द्यावर सातारा आणि कोल्हापूर गाद्या एकत्र आल्या होत्या का?

याबाबत बोलताना जेष्ठ इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी ‘बोल भिडू’शी बोलताना सांगितलं की,

वारणेचा तह हा या दोन्ही गाद्यांच्या राजकारणाला कलाटणी देणारा होता. या तहापूर्वी या दोन्ही गाद्यांमध्ये कमालीचा संघर्ष होता, टोकाची मतभिन्नता होती. हक्कांवरून अनेक लढाया झाल्या.

पण तहानंतर संपूर्ण चित्र पालटलं. स्वतः शाहू महाराज संभाजी महाराजांना साताऱ्याला घेऊन आले. एकाच अंबारीत दोघेही बसून गेले. त्यानंतर संभाजी महाराज अनेक दिवस इथं राहिले देखील. यानंतरचं मराठ्यांच्या दोन्ही गाद्यांमध्ये मधुर संबंधांना सुरुवात झाली. याचं तहानंतर सातारा आणि कोल्हापूर गाद्यांचे कधीही वाद झालेला नाही. तसे कोणतेही पुरावे आढळून येत नाहीत.

आजच्या उदयनराजे  आणि संभाजीराजे यांच्या वेगळेपणाला या सगळ्या संघर्षाच्या इतिहासाची काही पार्श्वभूमी असू शकते का?

याबाबत बोलण्यासाठी ‘बोल भिडू’ने जेष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयाबद्दल बोलण्यास स्पष्ट नकार दिला.  

मराठा आरक्षणासाठी आज का एकत्र नाहीत?

त्यांना काही मर्यादा आहेत का?

आज मराठा आरक्षणासाठी या दोन्ही गाद्या एकत्र का नाहीत, याबाबत उदयनराजेंवर काही मर्यादा असाव्यात का?

याबाबत सातारा पुढारी आवृत्तीचे संपादक हरीश पाटणे ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले, 

उदयनराजेंवर कोणतीही मर्यादा नाही. अगदी पक्ष किंवा नेतृत्वाच्या मुद्द्यावर देखील नाही. उलट ते मराठा आरक्षणासाठी अत्यंत आक्रमक असल्याचं दिसून येते. त्यांनी या पूर्वीच म्हणजे जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होता तेव्हांच त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

संभाजी राजेंनी आता सगळ्यांच्या भेटी घेतल्या असल्या तरी उदयनराजेंनी जवळपास ७ ते ८ महिन्यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे या सगळ्या नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या.

आता राहिला प्रश्न दोन्ही गाद्या एकत्र का नाहीत. तर उदयनराजेंनी याआधीच अनेकदा स्पष्ट केलं आहे की आमच्या दोघांचा कुठेही, कसलाही विरोध नाही, आणि ते यापूर्वी अनेकदा एकमेकांना भेटले आहेत. सोबतचं त्यांचे कौटुंबिक संबंध देखील अत्यंत चांगले आहेत हे मी स्वतः डोळ्यांनी बघितलं आहे.

ते केवळ एका व्यासपीठावर येत नाहीत, हाच काय तो अपवाद आहे. आज ना उद्या ते एका व्यासपीठावर देखील येतील. त्यामुळे ते एक नाहीत असं म्हणता येणार नाही.

अगदी या विरुद्ध मत जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे मांडतात. ते ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणतात,

या दोघांवरच्या मर्यादा बघण्यासाठी आपल्याला आधी आरक्षणावर असलेल्या मर्यादा लक्षात घ्यायला हव्या. कारण त्यातून या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे.

सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न दिल्ली दरबारी अवलंबून आहे. म्हणजे १०२ व्या घटनादुरुस्तीसाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल आहे. महाराष्ट्र सरकार देखील सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. तर इंद्रा सहानी खटल्याचा मर्यादांना बदलण्यासाठी संसदेने कायदा करणं गरजेचं आहे. 

त्यामुळे हे दोन्ही राजे सध्या या मुद्द्यावरून केवळ आपली राजकीय स्पेस तयार करत आहेत.

उदयनराजेंचा तर स्वभावचं पूर्ण वेगळा आहे. कधी त्यांना गांभीर्यांन सोबत घ्यावं अशी परिस्थिती नाही. त्यामुळे ते गांभीर्य नसलेले राजकारणी वाटतात. त्यामुळे देखील कदाचित सोबत नसावे. पण त्याच बरोबर जे संभाजीराजे मोर्चा बाबत भूमिका घेत आहेत, त्याला देखील फारसा तार्किक आधार आहे असं वाटत नाही.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.