एका पीरिअड लीव्ह ची किंमत तुला काय कळणार भिडू ?

पीरियड्स आले म्हणजे झालं …महिन्यातले ते ५ दिवस आपण पुरते कामातून जातो…

त्यातल्या त्यात पहिले ३ दिवस म्हणजे जीव गेल्यात जमा..यात ना कुठे बाहेर निघायची हिंमत होते ना काम करण्याची. मग झालं आपण ऑफिस ला मेसेज करून सांगतो ‘मला बरं नाहीये’ झालं मग हि सुट्टी  ‘सिक लिव्ह’ म्हणून ग्राह्य धरतात आणि तिथेच विषय सुरु होतो…

मला ‘पीरिअड लीव्ह’ मिळू शकते का ?

आता तुम्ही म्हणाल हे जरा अति होतंय… पीरिअड लीव्ह असते का कुठं ?

हे अति नाहीये तर नॉर्मल आहे…काही महिला, मुली अतोनात त्रास होत असला तरीही ऑफिसात जातात त्यांना अपराधीपणाचं वाटतं, आता ऑफिसात कसं सांगायचं कि मला असा असा त्रास होतोय, पीरियड्स तर आहेत त्यात काय एव्हढं? पोटात गोळा आला तरी मी कशीबशी करेल काम असं म्हणत स्वतःच्या आरोग्याला दुर्लक्षित करणाऱ्या मुली मी पाहिल्यात…

कित्येक मुलींप्रमाणे मी सुद्धा कित्येकदा असंच केलंय..स्वतःकडे दुर्लक्ष !

प्रेगनन्सी लिव्ह असते तर मग पीरिअड लीव्ह पण असायला हवी का ?

मासिक पाळीच्या काळात एक किंवा दोन दिवसाची रजा असावी का, थोडक्यात हा मुद्दा जगभरात च चर्चेला असतो, पण तो मुद्दा तिथपर्यंतच मर्यादित असतो. कारण सरकारने याबाबतीत काही मनावर घेतलेलं दिसत नाही.

मात्र काही खाजगी कंपन्यांनी मनावर घेतल्याचं दिसून आलं, परदेशातल्या कंपन्यांचं बोलत नाहीये मी भारतातल्या अशा काही कंपन्या ज्यांनी वर्षातून १२ दिवस या पिरीयड लीव्ह्स म्हणून घोषित केलं गेलं.

गुजरात मधील सुरत येथील एका डिजिटल कंपनीने त्यांच्या महिला एम्प्लॉयीसाठी वर्षातून १२ दिवसांची, तर झोमॅटो या कंपनीने वर्षातली १० दिवस पेड पिरीयड लिव्ह घोषित केली आहे.

मुंबईच्या कल्चरमशीन या मिडिया कंपनीत एक दिवसाची पेड पिरीयड लिव्ह घेण्याचा पर्याय FOP म्हणजेच ‘फर्स्ट डे ऑफ पीरियड’ या नावाने उपलब्ध केला आहे. 

चीन, तैवान, इंडोनेशिया तसेच जपान सारख्या देशात असा कायदाच करून टाकला आहे कि, जॉब वाल्या महिलांना मासिक पाळीच्या काळात एक किंवा दोन दिवसांची पेड लिव्ह द्यावीच लागणार असं तेथील सरकारने खाजगी आणि सरकारी कार्यालयांना अट घातली आहे.

आता भारतातही या बाबत मागणी चालू आहे.

खरं तर पाळीविषयी आपण किती खुलेपणाने बोलतो यावर अवलंबून आहे कि अशा प्रकारच्या मोहिमेला भारतातील पुरुष वर्ग किती गांभीर्याने घेतो.

ज्या पुरुषप्रधान समाजात मेडिकल आणि दुकानदार ड्रग्ज दिल्यासारखे काळ्या पिशव्यांमध्ये पॅड गुंडाळून देतात तिथे आपण पिरीयड लिव्ह बद्दल कसं बोलणार ?

कारण सेक्सप्रमाणे मासिक पाळीबद्दल बोलनं टॅबू मानला जातो.

खरं तर मासिक पाळीबद्दल उघडपणे बोलणाऱ्या स्त्रियांना बरं बोललं जात नाही.  मासिक पाळी असणे लाजिरवाणे आहे का? नैसर्गिक प्रक्रियेबद्दल असणारी ही गोष्ट लाजिरवाणी आहे का ?

फर्स्टली आपण हे मान्य केलं पाहिजे कि, पाळीच्या काळात काही जणींची काम करण्याची फिजिकल कंडीशनच नसते. जास्त प्रमाणात होणार्या ब्लीडींगमुळे, चिडचिडेपणामुळे महिला कामाकडे लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.

या समस्यांमुळे महिलांना या वेळी ऑफिसात जाऊन काम करणे कठीण होते, काही स्त्रियांना इतक्या  वेदना होतात की पेनकिलर्स घेतल्याशिवाय त्यांना काम करणे अशक्य होते.

अशावेळेस स्त्रियांकडे सुट्टीसाठी फक्त दोनच पर्याय असतात, एकतर या कठीण दिवसांमध्ये आणखी काही निमित्त बनवून रजा घेणे किंवा मग त्रास सहन करत काम करण्याचा प्रयत्न करणे.  कारण रजा टाकलीच तर पगार कापला जातो.

तर उद्देश हाच कि महिन्यात एक /दोन दिवसांची रजा देण्याची तरतूद झालीच पाहिजे, कारण

कुछ लीव्हस जरुरी होती है राहुल ….तुम नही समझोगे…

आता राहिला कंपनीच्या प्रगतीचा प्रश्न तर महिलांनी जरी पिरीयड लिव्ह घेतलीच तर त्या दिवशीचे काम इतर कोणत्या दिवशी देखील पूर्ण करण्याची तयारी त्या दाखवतात. त्यामुळे कंपनीच्या कामावर याचा फारसा परिणाम देखील होत नाही.
उलट पीरियड लीव्ह हे महिलांसाठी एक प्रगतीशील पाऊल ठरू शकते, कारण कित्येक महिला या त्रासामुळे नोकरीच्याच फंदात पडत नाहीत, त्यात पोलीस, आर्मी इत्यादी विभागात जायचं त्या टाळतात.  पीरियड लीव्ह ची तरतूद केलीच तर कोणत्याही क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढेल आणि प्रगतीही होईल…

तर मग आपले सरकार पीरियड लीव्ह बद्दल एवढ्यावर कन्वेंस होईल कि मी अजून काही बोलू ?

  • मोहिनी जाधव

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.