विरोधकांना देखील कसं जिकायचं हे वसंतदादा पाटलांकडून शिकावं..

जयवंतीबेन मेहता. कम्युनिस्ट, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या प्रभाव असलेल्या मुंबई मध्ये तळागाळापासून भाजपला रुजवणाऱ्या राजकीय कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख आहे. महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून त्यांनी काम सुरु केलं आणि केंद्रात मंत्रिपदापर्यंत मजल मारली.

मुरली देवरांच्या सारख्या दिग्गज नेत्याला धूळ चरणाऱ्या जयवंतीबेन मेहता यांनी सांगितलेला काँग्रेसच्या वसंतदादा पाटील यांचा एक किस्सा.

जयवंतीबेन मेहता मूळच्या औरंगाबाद मराठवाड्याच्या. याच मातीत त्यांची जडणघडण झाली. मराठी माध्यमाच्या शाळेत त्यांचे शिक्षण झाले. त्यांचं कुटूंब गुजराती असूनही महाराष्ट्रच त्यांच्यासाठी कर्मभूमी होती.

लग्नानंतर त्या मुंबईला आल्या. त्यांचे पती तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. त्यांच्यामुळे जयवंतीबेन देखील आरएसएसशी जोडल्या गेल्या. त्यांच्यावर लहानपणापासून संघाचे संस्कार घडले होते. यातूनच संघाची पॉलिटिकल विंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जनसंघामध्ये त्यांनी काम सुरु केलं. ध्यानी मनी नसतानाही एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सामान्य गृहिणी राजकारणात सक्रिय झाली.

१९६८ साली जयवंतीबेन मेहता यांनी पहिल्यांदा महानगरपालिकेची निवडणूक लढवली.पहिल्याच प्रयत्नात त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. पुढची दहा वर्षे त्यांनी पालिकेत प्रतिनिधित्व केलं होतं.समाजकारणाचे आणि राजकारणाचे धडे त्यांनी महानगरपालिकेत गिरवले.

आणीबाणीच्या काळात १९ महिने त्यांनी बंदीवास भोगला.  त्यानंतर १९७८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्या विजयी झाल्या व विधानसभेत दाखल झाल्या. विधिमंडळात संघबंदीवर झालेल्या चर्चेत त्यांनी केलेलं जोरदार भाषण प्रचंड गाजल. पुढे १९८० साली जनसंघ विसर्जित करून नव्याने स्थापन झालेल्या भाजपच्या कार्यकारिणीत त्यांना स्थान देण्यात आलं.

मातृभाषा गुजराती असूनही अस्खलित मराठी मध्ये त्यांनी केलेली भाषणे विधानसभेत चांगलीच गाजायची. काँग्रेस सरकारला त्यांनी बऱ्याचदा धारेवर धरलं होत.

गोष्ट आहे १९८५ सालची. 

त्या काळात एकदा जयवंतीबेन मेहतांच्या पतींना हृदय विकाराचा झटका आला. त्याकाळी त्यांचे घर भुलेश्वर येथे चौथ्या मजल्यावर होते. त्या इमारतीला लिफ्ट नव्हती. त्यांचे पती इतक्या उंचावर जिने चढून जाऊ शकत नव्हते. अखेरीस जयवंतीबेन मेहता यांनी शासनाकडे भाड्याची निवासी जागा मिळावी म्हणून अर्ज केला.

त्यावेळी मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील. फक्त चौथी पर्यंत शिक्षण झालेले दादा व्यवहारचतुर होते. विधिमंडळात त्यांचा अनेक वर्षांचा अनुभव होता पण जनतेतही ते प्रचंड लोकप्रिय होते. लोकांची नस अचूक पकडली होती. विरोधकांशी जुळवून घेऊन जनतेचे प्रश्न मार्गी लावणे हि दादांची हातोटी होती.

त्यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळात उदयसिंगराव गायकवाड हे सामान्य प्रशासन विभागाचे मंत्री होते.  जयवंतीबेन मेहता यांचा शासनाकडे घराची मागणी  केलेला अर्ज त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे नेला. मंत्र्यांनी दादांकडे हा अर्ज नेण्याचं एक खास कारण देखील होतं. कारण काही दिवसांपूर्वीच विधानसभेत बोलताना जयवंतीबेन मेहता यांनी महाराष्ट्र शासनाच्या घरदुरुस्ती मंडळावर आक्रमकतेने टीका केली होती.

वसंतदादांनी तो अर्ज काळजीपूर्वक पाहिला. गायकवाडांशी चर्चा केली. ते म्हणाले,

“मेहतांची टीका तुम्ही देखील ऐकली होती ना ? मात्र ते काहीही असलं त्या विरोधी पक्षाच्या नेत्या असल्या तरी माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांना सहकार्य करा आणि जागा द्या.”

दादांनी आपल्या मंत्र्याला समजावलं,’ अडचणीत सापडलेल्या माणसाला मदत करताना पक्ष पाहायचा नाही.’

जयवंतीबेन मेहता म्हणतात शासन कस चालवायला हवे याची हि श्रेष्ठ प्रचिती मला आली.

राज्याच्या विधी मंडळाच्या या आठवणी मला चिरसमरणीय राहतील. ज्या काळात मी राजकारणात वावरले तो काळ आता बदलेला आहे. आज जनसेवेचे ऐवजी स्वार्थी,संधीसाधू, भ्रष्ट,सत्ता लोलुप लोक जास्त बघायला मिळतात हे लोकशाहीच आणि भारताचं दुर्दैव.

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.