रोज वेगवेगळे डे साजरा होणाऱ्या देशात अटलजींनी टेक्नॉलॉजी दिवस साजरा करण्यास सुरवात केली..

आज जागतिक योग दिवस आहे. काल फादर्स डे झाला. या आधी कधी मदर्स डे तर कधी विमेन्स डे, व्हॅलेंटाईन डेला तर रोझ डे, टेडी डे, प्रपोज डे अशा दिवसांची भरमार असते. याचा अर्थ असा नव्हे कि या दिवसांना विरोध करावा. खरं तर हे दिवस म्हणजे त्या त्या गोष्टींच्या महत्वाचे उत्साहाचे सेलिब्रेशन. जुन्या काळातल्या रक्षाबंधन, भाऊबिजेप्रमाणे हा देखील एक उत्सवच.

मनुष्य प्राणी हा उत्सव प्रिय प्राणी आहे. प्रत्येक गोष्टींचा उत्सव करायला आपल्याला आवडतं. मात्र या साऱ्या उत्सवांमध्ये तंत्रज्ञानाचा दिवस साजरा करणे ही कल्पना अभिनवच. मंत्र तंत्राच्या पुढे जाऊन  तंत्रज्ञान दिवसाचा विचार ही कल्पना प्रत्यक्षात उतरवणारा दूरदृष्टीचा पंतप्रधान म्हणजे अटलबिहारी वाजपेयी.

अटलबिहारी वाजपेयी यांनी हि कल्पना कशी प्रत्यक्षात आणली या बद्दलचा किस्सा डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सांगितला आहे.

गोष्ट आहे १९९८ सालची. ११ मे रोजी बंगलोरच्या सी.एस.आय.आर च्या ४० प्रयोगशाळा प्रमुखांची वार्षिक परिषद होती. त्याच दिवशी एन ए एल या माशेलकरांच्या प्रयोगशाळेने तयार केलेल्या चार आसनी ‘हंसा’ विमानाचं पहिलं उड्डाण झालं. दुपारी बातमी आली की डी.आर.डी.ओ. ने ‘त्रिशूल’ या मिसाईलचं पहिलं उड्डाण केलं होतं. आणि संध्याकाळी बातमी आली की पोखरण मध्ये भारताने अणुचाचणी घेतली !

एकाच दिवसात देशाच्या दृष्टीने क्रांतिकारी असणाऱ्या तीन मोठ्या घटना घडून गेल्या होत्या. संपूर्ण जगात यावरून उलट सुलट चर्चा झाल्या. कोणी टीका केली तर अनेकांनी भारताचं कौतुक केलं. अटलबिहारी वाजपेयी या सर्व कौतुक आणि टीकेच्या सोहळ्याकडे स्थितप्रज्ञ होऊन पाहत होते.

या घटनेनंतर काहीच दिवसात जूनमध्ये अटलजींच्या हस्ते दिल्लीत शांती स्वरूप भटनागर पारितोषिक वितरणाचा समारंभ झाला. डॉ.रघुनाथ माशेलकर व डॉ. मुरली मनोहर जोशी अटलजींच्या उजव्या व डाव्या बाजूला बसले होते. त्या दोघांनी अटलजींना भारताने एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या क्षेत्रांत केलेल्या प्रगतीचं महान प्रदर्शन एकाच दिवसात ११ मे ला कसं घडलं हे सांगितलं.

माशेलकर म्हणतात,

“आम्ही पंतप्रधानांना सुचवलं कीं आपण ११ मे हा ‘टेक्नॉलॉजी डे’ म्हणजे ‘तंत्रज्ञान दिवस’ म्हणून साजरा करूया. त्यावेळी त्यांनी कांही उत्तर दिलं नाही.”

मुरलीमनोहर जोशी आणि रघुनाथ माशेलकर हे सांगतच होते इतक्यात पंतप्रधानांच्या भाषणाची वेळ अली. ते भाषण करायला उठले. इतरवेळीप्रमाणे समोर राजकीय पब्लिक नव्हती तर विज्ञानाचा अभ्यास  करणारे विद्यार्थी आणि संशोधक यांचा समावेश होता. मात्र तरीही वाजपेयींनी नेहमीच्या पठडीत आपलं जोरदार भाषण केलं, श्रोता वर्ग नेहमीप्रमाणे थक्क होऊन गेला होता.

टाळ्यांच्या जोरदार कडकडाटात वाजपेयींनी कागद खाली ठेवले.

माशेलकर देखील उभं राहून टाळ्या वाजत होते इतक्यात वाजपेयी माईक पाशी परत आले. आपल्या स्टाईलमध्ये काही सेकंद पॉज घेतला आणि त्यांनी ११ मे हा संपूर्ण भारतात ‘टेक्नॉलॉजी डे’ म्हणून घोषित केला.

डॉ. रघुनाथ माशेलकर यांना सुखद धक्का बसला. ते म्हणतात,

“गेली वीस वर्षे हा दिवस साजरा होतो आहे. यांत विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या हृदयाचा आवाज ऐकून ही उत्स्फूर्तपणे घोषणा केली.”

त्या दिवशी कार्यक्रम संपल्यावर वाजपेयी व माशेलकर चहापानासाठी चालत दुसऱ्या एका मंडपात चालले होते. अटलजी त्यांच्याकडे वळले आणि त्यांनी विचारलं,

‘ अणुचाचणी झाल्यावर अमेरिका लगेच निर्बंध आणतील तंत्रज्ञानावर तसेच काही, निवडक उपकरणांवर. त्याचा आपणा सर्व शास्त्रज्ञांवर काय परिणाम होईल?’

माशेलकर त्यांना म्हणाले

‘सर, अमेरिकेने काहीही निर्बंध घालू देत. जोपर्यंत आम्ही शास्त्रज्ञ आमच्या मेंदूवर निर्बंध घालत नाही तोपर्यंत अमेरिका आपलं काही बिघडवू शकत नाही’.

अटलजी जोरात हसले. थांबले. डॉ.माशेलकरांचा हात आपल्या हातात घेऊन म्हणाले,

“शाब्बास माशेलकरजी. याच भावनेनें आणि ऊर्जेने तुम्ही काम केलंत तर भारताला काहींचं चिंता नाही”.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.