महात्मा गांधींच्या उपचारासाठी डॉ. बिधानचंद्र रॉय कोलकात्यावरून थेट पुण्यात आले होते…

कोरोना महामारीनं सगळ्या जगाला नुसतं झपाटून सोडलंय. कित्येकांना या साथीच्या आजारमुळं आपला जीव गमवावा लागलाय. पहिली लाट, नंतर दुसरी लाट आणि आता काय तर म्हणे तिसरी लाट सुद्धा येणार आहे. लोकांनी या आजाराची धास्तीचं घेतलीये.

पण या सगळ्यात आशेचा किरण होते ते म्हणजे डॉक्टर. ज्यांच्यामुळेच आपण या साथीवर नियंत्रण ठेवू शकतोय.  रात्रं दिवस पुढचा – मागचा विचार न करता हे आरोग्य कर्मचारी लोकांचा जीव वाचवण्यासाठी धडपडतात. त्यामुळेच त्यांना जमिनीवरचा ‘देवमाणूस’ म्हंटलं जात, आज त्यांचाच विशेष दिवस.

म्हणजे आज ‘नॅशनल डॉक्टर्स डे’

दरवर्षी १ जुलैला डॉ. बिधान चंद्र रॉय अर्थात डॉ. बीसी रॉय यांच्या आठवणीत हा डॉक्टर्स डे साजरा केला जातो, ज्यांनी महात्मा गांधींवर उपचार केले होते. महत्वाचं म्हणजे डॉ. रॉय यांचा जन्मदिन आणि पुण्यतिथी दोन्ही १ जुलैच आहे. त्यामुळेच हा दिवस त्यांना एक प्रकारे आदरांजली म्हणून वाहिला जातो.

एका बंगाली कुटुंबातून असलेले रॉय, मात्र त्यांचा जन्म आणि पदवी पर्यंतच शिक्षण हे पाटण्यात झालं. तर पुढं डॉक्टरकीच शिक्षण कोलकात्यात झालं. रॉय हे एक प्रसिद्ध डॉक्टर तर होतेच या सोबत ते पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री देखील होते. तर १९४७ मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशाचं राज्यपाल पदही सांभाळलं.

त्यांच्याबद्दल म्हंटल जात कि, त्यांनी आपल्या आयुष्यात कधीही प्रॅक्टिस करणं सोडलं नाही. अक्षरशः राज्याचे मुख्यमंत्री असताना सुद्धा.  डॉ. रॉय यांनी अनेक मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयांची स्थापना केली. एवढं काय तर त्यांनी स्वतःच्या घराला सुद्धा नर्सिंग होममध्ये बदललं.

त्यांनी अनेक मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय बनवण्यात सुद्धा महत्वाची भूमिका बजावली, ज्यात  जादवपुर टीबी अस्पताल, चित्तरंजन सेवा सदन, कमला नेहरू मेमोरियल अस्पताल, व्हिक्टोरिया इंस्टीट्यूशन आणि चित्तरंजन कँसर हॉस्पिटल सारख्या मोठ्या संस्थांचा समावेश आहे.

डॉक्टरकीच्या पेशात ते स्वतःला पार झोकून द्यायचे. ते जेव्हा कोलकत्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकवायचे तेव्हा स्टाफच्या मदतीसाठी ते नर्सचं कामही करायचे. तिथं स्टाफ कमी होता, त्यामुळं नर्सची गरज पडायची. त्यामुळं डॉक्टर साहेब वेळ पडली कि, नर्स सुद्धा बनायचे.

आपल्या सेवेत वाहून देण्याच्या सवयीमुळे अशाच एकदा प्रसंगी डॉ. रॉय यांनी गांधीजींच्या उपचारासाठी कोलकत्यावरून थेट पुणे गाठलं होतं

१९३३ चा तो काळ. महात्मा गांधी त्यावेळी आत्मशुद्धीसाठी पुण्यात उपवास करत होते. मात्र या दरम्यान गांधीजींची तब्येत जास्तच खालावली. त्यावेळी डॉ. रॉय कोलकात्याचे महापौर होते. गांधीजींच्या तब्येतीची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि वेळ न घालवता त्यांनी घाईघाईने कोलकत्यावरून पुणे गाठलं. डॉक्टरांनी महात्मा गांधींना औषध घ्यायला सांगितलं.

त्यावेळी गांधी त्यांना म्हणाले,

मी तुझं औषध का घेऊ? तू आपल्या देशाच्या ४० कोटी जनतेवर फुकट उपचार केलेत काय?

यावर डॉ. रॉय म्हणाले,

“नाही बापू, मी सगळ्या रुग्णांचा मोफत उपचार नाही करू शकत. पण गरजूंचा मोफत उपचार नक्कीच करतो. मी इथं महात्मा गांधींचा नाही, तर त्यांचा उपचार करतोय ज्यांच्याकडून देशाच्या ४० कोटी लोकांना अपेक्षा आहे”

यावर गांधींनी डॉ. रॉय यांची मस्करी करत म्हंटल कि,

‘तू थर्ड क्लास वकीलसारखं वाद घालतोय’

यानंतर डॉक्टरांचं म्हणणं ऐकून महात्मा गांधींनी औषध घेणं सुरु केलं.

डॉ. रॉय महात्मा गांधींबरोबर मोतीलाल नेहरू यांसारख्या बड्या नेत्यांचे मेडिकल कन्सल्टंट सुद्धा होते. दुसरे मोठे नेते देखील त्यांच्याकडून डॉक्टरी सल्ले घ्यायचे. आजकाल आपल्या देशातील नेतेमंडळी उपचारासाठी परदेशात जात असलेले दिसून येतात, पण ५० च्या दशकात डॉ. बिधानचंद्र रॉय यांनी अमेरिकेच्या राष्ट्रपतींवर उपचार केले होते.

त्यावेळी डॉ. रॉय बंगालचे मुख्यमंत्री असताना अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्या दरम्यान त्यांनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती जॉन एफ कॅनेडी यांची भेट घेतली.

या भेटीतच डॉक्टरांना राष्ट्रपतींच्या आजाराबद्दल शंका आली. त्यांनी राष्ट्रपतींना विचारलं, तुम्ही Addison’s आजाराने ग्रसित आहात. यानंतर कॅनेडी यांनी आपल्या डॉक्टरांच्या टीमकडून चेकअप करून घेतलं तर डॉ. रॉय यांचं बोलणं खरं ठरलं. यानंतर राष्ट्रपती कॅनेडीने डॉ. रॉय यांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतले. 

दरम्यान, १ जुलै १९६२ ला डॉ. बिधान चंद्र रॉय यांचा मृत्यू झाला. पण त्याच्या एक वर्षाआधीच म्हणजे १९६१ ला सरकारनं त्यांना त्यांच्या कामासाठी भारतरत्न देऊन सन्मान केला. त्यांना आधुनिक पश्चिम बंगालचा निर्माता सुद्धा मानलं जातं.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.