हजार वर्षांचा इतिहास सांगतो आगरी समाज मुंबईचा खरा भूमिपुत्र आहे

सध्या नवी मुंबईच्या विमानतळाच्या नावावरून वादंग पेटलाय. राज्य सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव या विमानतळासाठी निश्चित केलंय तर रायगड अलिबाग नवी मुंबई परिसरात राहणाऱ्या आगरी कोळी शेतकरी समाजाने शेतकरी कामगार नेते दि.बा.पाटील यांचं नाव विमानतळाला द्यावे अशी मागणी केलीय.

एका भूमिपुत्राचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं असा आग्रह स्थानिकांचा आहे. आपल्या या मागणीसाठी सुरु केलेल्या आंदोलनामुळे संपूर्ण देशपातळीवर ओळखला जाऊ लागलेला आगरी समाज फक्त नवी मुंबईचं नाही तर संपूर्ण मुंबई व परिसरातला खरा भूमिपुत्र म्हणून ओळखला जातो.

काय आहे आगरी समाजाचा इतिहास?

आगर म्हणजे भात पिकवणारे खाचर किंवा मीठ पिकवणारे मिठागर. अशा आगरात काम करणारे ते आगरी होय. मुळात समुद्राच्या जवळ राहत असल्याने त्यांना मासळी अधिक प्रिय म्हणून ते खाडीमध्ये अथवा समुद्रात जाऊन मासे पकडतात. त्यामुळे भातशेतीसोबतच गोड्या पाण्यात मत्स्यशेतीचाही व्यवसाय सुरू केला. आगरी समाजामध्ये पाटील,मढवी,भगत,गावंड,ठाकूर,भोईर, म्हात्रे,मोकल,घरत आडनावाची लोक जास्त आहेत.

आगरींचा इतिहास पाहायचा झाला तर हे लोक रावणाच्या दरबारी गायक-वादक होते, असे म्हणतात. त्यामुळे ते उत्तम कलाकार होते,  त्यांच्या या कलेवर खूश होऊन रावणाने त्यांना पश्चिम किनाऱ्यावरील जागा देऊ केली, अशी आख्यायिका आहे.

राजा नहुषाचा नातू ययाती याचा वंशज बलिभद्र आणि त्याची पत्नी आगलिका यांचा पुत्र आगला. आगला हा बलिभद्र राजाच्या पश्चात मुंगी पैठण येथे राहू लागला. हे ‘आगले’ लोक १३व्या शतकात मुंगी पैठणच्या बिंबराजाच्या सैन्यात तैनात झाले.

साधारण ११३८ सालच्या काळची गोष्ट. हे बिंब राजे चंपानेर नावाच्या राज्यात राज्य करीत होते. त्यांना महाराष्ट्रिक म्हणून ओळखले जात. त्यांचे पैठणच्या भौम राजांशी जवळचे संबंध होते.

गोवर्धन बिंब हा गादीवर बसला होता. त्याचा लहान भाऊ होता प्रताप बिंब. 

बादशहाच्या राजवटीत कोकणातील सागरगडावरील एक यवन सरदार बादशहाला डोईजड झाला. सागरगडाशेजारील हिंदू राजवटीवर ताबा मिळवून स्वतंत्र राज्यकारभार करू लागला. बादशहाने पाठवलेल्या सर्व सरदारांचा पराभव झाल्याने, त्याने बलाढय़ बिंबराजाला मदतीची विनंती केली. बिंबराजाने आपल्या धाकट्या भावाला कोकणात पाठवले.

आगले लोकांची ताकद बिंबराजाकडे होती. तो मुंगीपैठणहून कोकणात निघाला. त्याचे सैन्य वाटेत नाशिक, घोटी, इगतपुरी, शहापूर, कल्याण येथे राहिले. कलांमध्ये निपुण असल्यामुळे त्यांनी दगडांमध्ये शिल्पे कोरली. तेच पुढे आगरी पाथरवट म्हणून ओळखले जाऊ लागले.

नंतर बिंबराजाने सैन्यानिशी कोकणात येऊन अलिबाग, आवास, सासवणे आणि सागरगडावर सरदाराचा पाडाव केला. त्याला बादशहाच्या ताब्यात दिले आणि स्वत: राज्यकारभार पाहू लागला. या भागाला त्या काळात महिकावती म्हणून ओळखत असत. तो भाग म्हणजे आजचा मुंबई मधला माहीम.

बिंबराजाने स्वतःच्या राजधानीचे गाव म्हणून केळवे-माहीम निश्चित केले.

प्रताप बिंबाला हा निसर्गरम्य परिसर प्रचंड आवडला. त्याने चंपानेर येथे आपल्याला मुलाला म्हणजेच मही बिंब याला बोलावून घेतले. तो मजल दरमजल करत महिकावतीस पोहोचला. त्याने देश वसाहत वसवण्यासाठी सोबत अनेक लोक आणले होते. यात वैश्य वाणी या पासून ते आगरी कोळी समाजापर्यंत अनेक समाजाचे लोक होते.

यातील प्रमुख कुळे घेऊन प्रताप बिंब वालुकेश्वर येथे स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला.

प्रताप बिंब याने आजच्या मुंबई ठाणे भागात लोकांना वसवले आणि या उजाड भागाचे रूपांतर गावात केले. पुढे काहीच वर्षांनी प्रताप बिंब माहीम येथे वारला. पुढे त्याचा मुलगा मही बिंब याने अनेक वर्षे राज्य केले. त्यामुळे त्यांना मुंबईचा आद्य राजा असे मानले जाते.

पुढच्या काळात पोर्तुगीज आले त्यांनी काही काळ राज्य केला व पुढे मुंबई इंग्रजांना लग्नात आंदण म्हणून दिली. इंग्रजानी सात बेटे एकत्र करून शहर बनवले इथून पुढचा इतिहास तर आपल्याला ठाऊकच आहे. पण मुंबई शहराचा खरा निर्माण कर्ता महाराज प्रताप बिंब यांना जाते याचा उल्लेख मात्र इतिहास सोयीस्कर रित्या विसरतो.

या प्रताप बिंब यांनी ज्या सैनिकांच्या जोरावर मुंबईवर राज्य केले ते म्हणजे आगरी समाज. 

पुढे काही वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिले आरमार उभे केले तेव्हा त्यात आगरी समाज आघाडीवर होता. पुढे अनेक वर्षे या लढवय्या समाजाने स्वराज्यासाठी आपले रक्त सांडले.

एकेकाळी आगरी समाजाची वस्ती मुंबईत चार भागात विखुरली होती. मूळ आगरी लोक चौदा गावांमध्ये राहत होते म्हणून त्यांना चौदा पाटील म्हटले जात असे. या चौदा गावांमध्ये मोठी शिवडी, धाकटी शिवडी, भोईवाडा,वडाळा,माटुंगा, माहीमआणि परळ यांचा समावेश होता.

काही आगरी स्वतःला बावन्न पाटील म्हणत असत.

गोवंडी, मानखुर्द,तुर्भे,गवाण,माहूल, चेंबूर भागात जे आगरी लोक राहत, तेथे त्यांची बारा गावे होती. म्हणून हे आगरी बारा पाटील नावाने ओळखले जात होते. आगरी माणसे प्रामुख्याने अलिबागच्या पोयनाड,चरी,पेझारी, सांबरी, फणसापूर गावातून मुंबईत आली. त्यांच्या पाठोपाठ वडखळ, रोहा, कोलाड, माणगाव, आणि त्यानंतर हाशिवरे, माणकुळे – रेवस भागातून आगरी मुंबईत आले. अखेरीस रेवदंडा, सुडकोली, श्रीवर्धन, म्हसळा भागातून आलेले आगरी बांधव मुंबई सेंट्रल परिसरात स्थायिक झाले.

चेंबूरच्या आरसीएफ (राष्ट्रीय केमिकल्स ॲन्ड फर्टिलायझर्स) आणि बीएआरसी (भाभा ॲटॉमिक रिसर्च सेन्टर) प्रकल्पांमुळे आगरी समाजाची जवळपास बारा गावे उठवली गेली, त्याने समाजाचे मोठे नुकसान झाले. 

आज फक्त मुंबईच नाही तर नवी मुंबई ठाणे बोरिवली विरार पर्यंतचा भाग त्याचे मालक हे आगरी, कोळी भंडारी समाजाचे लोक होते. शहराचा जसा जसा औद्योगिक विकास होत गेला तसतसे एकेकाळचे हे मुंबईचे पाटील आपल्या जमिनी, घरादारापासून विस्थापित झाले. अनेक वर्षांपासून या भूमिपुत्रांचा लढा सुरूच आहे. कुळकायद्या विरोधातल्या चरीच्या शेतकरी आंदोलनापासून ते आजच्या दि.बा.पाटील यांच्या विमानतळाच्या मागणीपर्यंत गेली कित्येक वर्षे आगरी समाज प्रस्थापिथाना, सरकारला धडक देण्याचं काम करतच राहिलेला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.