दादागिरीमुळे महाराजा नावाची चीड गांगुलीला क्रिकेटचा महाराजा बनवून गेली.

८ जुलै १९७२ या दिवशी सौरव गांगुलीचा जन्म झाला. इंडियन क्रिकेटला जागतिक पातळीवर दादागिरी करायचा फंडा कुणी शिकवला असेल तर तो सौरव गांगुलीने. जर कोणी नडत असेल तर त्याला खेळातून कसं उत्तर द्यायचं हे सौरव गांगुलीने दाखवून दिलं. परदेशात जाऊन क्रिकेट मध्ये बादशाहत मिळवणारा सौरव गांगुली त्याच्या दादागिरीमुळे क्रिकेटचा दादा झाला.

लॉर्ड्सच्या मैदानावर शर्ट काढून विजयी जल्लोष करणारा सौरव गांगुली कित्येक वर्षे विसरला जाणं अशक्य आहे. आपल्या क्रिकेट करियरमध्ये उंचच उंच आणि थेट मैदानाबाहेर सिक्सर ठोकणारा भिडू म्हणून गांगुली ओळखला जायचा. भारतीय क्रिकेटला सोन्याचे दिवस आणणारा गांगुली आणि आपला उत्तराधिकारी म्हणून महेंद्रसिंग धोनीकडे सूत्र सोपवणारा गांगुली मात्र ग्रेट वाटतो.

क्रिकेटमधल्या बड्या नावांपैकी एक म्हणून गांगुली ओळखला जायचा पण तो कायम वादग्रस्त म्हणून फेमस होता. त्याने आपला हिसका दाखवून देऊन विरोधकांची तोंडं बंद केली होती. दादागिरी काय गांगुलीला सुटली नाही . क्रिकेटमध्ये ज्युनिअर असल्यापासून त्याने आपला हिसका दाखवायला सुरवात केली होती. आज असेच काही किस्से जाणून घेऊया सौरव गांगुलीच्या दादागिरीबद्दल….

गांगुली त्याच्या ज्युनिअर काळात सुद्धा बंडखोर होता. एका स्पर्धेत राखीव खेळाडू म्हणून त्याने पाणी नेण्यास नकार दिला होता, त्यावर तो म्हणाला होता की, अशी कामं करायला आमच्याकडे गडी नेमतात. आधीपासूनच गांगुली बाणेदारपणे उत्तर देण्यात तरबेज होतात.

त्याच्या दादागिरी मुळे सुनील गावस्कर गांगुलीला महाराजा म्हणून चिडवायचे. पुढे ही महाराजा नावाची चीड गांगुलीला क्रिकेटचा महाराजा बनवून गेली.

१९९१-९२ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या काळात सौरव गांगुली भारतीय संघाचा नवा कोरा खेळाडू होता. इथून त्याने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. १९९६ मध्ये इंग्लंडविरुद्ध पुनरागमन होण्यासाठी त्याला चार वर्षे लागली पण हा त्याचा पहिलाच दौरा होता. या दौऱ्यावर गांगुलीने बेंचवर बसलेल्या खेळाडूंकडून ड्रिंक्स घेण्यास नकार दिला होता. जे संघात खेळत आहे अशा लोकांनीच ड्रिंक्स आणावं असा त्याचा हट्ट होता. खरंतर हा गांगुलीवर लावला गेलेला आरोप होता.

रेडिफला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये गांगुलीने बऱ्याच वर्षानंतर खुलासा केला की मला माहिती नाही ही बातमी तुमच्याकडे कशी आली. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना भारतीय संघाचे मॅनेजर रणबीर सिंह यांनी ही हुल उठवली होती. तो माणूस भारतीय क्रिकेटला मिळालेली एक लाजिरवाणी गोष्ट होती. माझ्या आयुष्यात पाहिलेला तो सगळ्यात वाईट माणूस होता.

२००० च्या काळात गांगुली लँकशायर कडून कौंटी क्रिकेट खेळत होता. अँड्र्यू फ्लिनटॉपने त्याच्या बीईंग फ्रेडी नावाच्या पुस्तकात लिहिलं आहे की गांगुली इतका डेंजर होता की तो स्वतःची किट बॅग सुद्धा इतर खेळाडूंनी उचलावी अशी अपेक्षा करायचा. एका मॅचमध्ये त्याने जब्रि ५० धावांची खेळी केली तेव्हा बाल्कनीत एकही खेळाडू त्याच्यासाठी टाळ्या वाजवत नव्हता.

कारण संघातल्या खेळाडूंवर तो दादागिरी करायचा. संघात १० खेळाडू एका बाजूला आणि गांगुली एका बाजूला तरी गांगुली भारी पडायचा अशी परिस्थिती झाली होती. पण गांगुलीवर अशा गोष्टींचा कधीच फरक पडला नाही. कारण तो महाराजा होता.

२००१ मध्ये झालेल्या भारत ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये गांगुलीने धमाल आणली होती. धोनी अगोदर स्टीव्ह वॉ हा सगळ्यात थंड डोक्याचा कर्णधार म्हणून ओळखला जायचा. पण त्यातसुद्धा टेम्पर गांगुलीने हलवलं होतं.

म्हणजे एका मॅचच्या वेळी गांगुली काही टॉसला येतच नव्हता. अंपायर आणि स्टीव्ह वॉ इकडे गांगुलीची वाट पाहत बसलेले.

पण खरतर इकडे गांगुली तिसऱ्याच भानगडीत सापडला होता. टॉस साठी लागणारं ब्लेझर गांगुलीला सापडत नव्हतं. स्टीव्ह वॉ इकडे रागाने लालबुंद झाला होता. एका मुलाखतीत तो म्हणाला होता की गांगुली टॉसच्या वेळी लेट आला तरीसुद्धा तो काहीच घडलं नाही असं वावरत होता. हा प्रकार इतर खेळाडूंसाठी अनादर असल्याचं दर्शवतो.

अशा अनेक गोष्टी गांगुली बद्दल वर्तवल्या जातात पण गांगुली आपली दादागिरी दाखवतच राहिला. पाकिस्तानला जाऊन पाकिस्तानला हरवून त्याने विक्रम रचला होता. सचिन द्रविड आणि गांगुली या त्रिकुटाने अनेक सामने भारताला जिंकवून दिले. गांगुलीने कर्णधार असताना अनेक युवा खेळाडूंना संधी दिल्या.

आजही क्रिकेटच्या पंढरीचा गांगुली महाराजा म्हणून ओळखला जातो.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.