शहीद अब्दुल हमीदच्या विधवा पत्नीला हेलिकॉप्टरमधून त्यांच्या समाधीवर नेण्यात आलं..

२४ सप्टेंबर १९९५. सकाळची वेळ होती. देशाचे पंतप्रधान वर्तमानपत्रे चाळत होते. सहज वाचता वाचता त्यांची नजर एका बातमीवर पडली.

 ‘शहीद हमीद की विधवा पत्नी पती की मजार पर जाने को तरस रही है. तीस साल बाद भी उनकी विधवा पत्नी के लिए यह एक सपना बना हुआ है.’

ती बातमी वाचताच नरसिंहराव यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्यांच्या रागाचा पारा अगदी टोकाला पोहचला होता. संबंधित अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं.

वीर अब्दुल हमीद म्हणजे १९६५ सालच्या युद्धाचे हिरो. पंजाबच्या खेमकरण भागात पाकिस्तानी ३०० रणगाड्यांची बटालियन घुसली होती. तेव्हा भारताने त्यांच्यावर उलट हल्ला सुरु केला. दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात मोठे रणगाडा युद्ध म्हणून हे युद्ध ओळखले जाते. 

‘४ ग्रेनेडीयर’चा कंपनी हवालदार अब्दुल हमीद यांनी आपल्या जीपवर ‘रिकॉनसाईल गन’ बसवली व पाकिस्तानच्या अनेक रणगाड्यांच्या ठिकऱ्या उडवल्या. पाकिस्तानी रणगाडे त्यांच्या मागे हात धुवून लागले. या युद्धाच्या धामधुमीत एक ग्रेनेड अब्दुल हमीद यांच्या जीपवर येऊन पडली. 

अब्दुल हमीद जागीच शहीद झाले. 

त्यांच्या शौर्यामुळे इतर साथीदारांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी जोरदार लढा दिला. अखेर पाकिस्तानला माघार घ्यावी लागली.  या युद्धात पाकिस्तानने आपले ९७ रणगाडे गमावले.  पॅटन रणगाड्याच्या इतिहासात प्रथमच एखाद्या देशावर इतकी मोठी नामुष्की ओढावली गेली. 

पाकिस्तानच्या  पॅटन टँकला दिलेले ‘अस्सल उत्तर’ म्हणून या युद्धाला ओळखले गेले.

आजही खेमकरण शहराची ओळख रणगाड्यांची स्मशानभूमी अशीच आहे.अब्दुल हमीद याना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आलं. त्यांची समाधी भारत-पाक सीमेवरील खेमकरण सेक्टरमध्ये उभारण्यात आली. 

अब्दुल हमीद यांच्या पराक्रमाचे गुणगान आजही गायले जाते. त्यांच्या चरित्राचे धडे शाळेत अभ्यासले जातात.

पण देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या अब्दुल हमीद यांच्या विधवा पत्नीचे रसूलनबी यांचे मात्र प्रचंड हाल सुरु होते. त्या उत्तरप्रदेश मधील गाजीपूर जिल्ह्यातील धामुपुर या खेड्यात राहायच्या. त्यांच्या पदरी चार मुले आणि एक मुलगी होती. अब्दुल हमीद यांच्या पेन्शनमधून कशीबशी त्यांची गुजराण होत होती. पण गेली अनेक वर्षे त्यांना आपल्या पतीच्या समाधीचे दर्शन घ्यायला जाण्याची संधी मिळाली नव्हती. 

कोणत्या तरी एका स्थानिक पत्रकाराने रसूलनबी यांची मुलाखत घेतली आणि ३० वर्षे झाली वीर अब्दुल ह्जमीड यांच्या पत्नी पतीच्या स्मारकाचे दर्शन घेण्यासाठी प्रतीक्षेत अशी बातमी छापली. 

योगायोगाने पंतप्रधान नरसिंहरावांच्या नजरेत ही बातमी पडली. 

त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले की तातडीने रसुलनबी यांना अब्दुल हमीद यांच्या समाधीवर नेण्यात यावे. 

अधिकाऱ्यांनी रेल्वे रिझर्व्हेशन करण्याची व्यवस्था करतो असं सांगितलं तर नरसिंहराव म्हणाले,

“त्यांना मदत करण्याची सरकारी कर्मचाऱ्यांची मानसिकता दिसत नाही त्यामुळे तुम्ही स्वतः लक्ष घालून तातडीने यासंदर्भातील व्यवस्था रेल्वेने नव्हे, तर हेलिकॉप्टरने करा व सोबत त्यांच्या नातेवाईकांना देखील घ्या.

स्वतः पंतप्रधानांचे आदेश आल्यावर प्रशासकीय सूत्रे वेगाने हलली. दुसऱ्याच दिवशी  वीर अब्दुल हमीदची यांच्या पत्नी रसुलनबी या त्यांच्या चारही मुले आणि एका मौलवीसह हमीदच्या समाधीला हेलिकॉप्टरमधून पाठवले. हे हेलिकॉप्टर खेमकरण भागात जाऊन अब्दुल हमीद यांच्या युनिटला भेट देऊन आले. त्यांच्या पत्नीची दर्शनाची इच्छा पूर्ण झाली. 

नरसिंह राव यांचे माजी स्वीय सचिव राम खांडेकर सांगतात,

 एवढेच नव्हे, तर पुढे जाऊन नरसिंह रावांनी तिच्या घराच्या दुरुस्तीसाठी आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी नियमित आर्थिक मदत देण्याच्या सूचना कॅन्टोन्मेंट बोर्डाला दिल्या.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.