भाषणात अवघड इंग्लिश शब्द वापरल्याबद्दल शिवराज पाटलांची खरडपट्टी काढण्यात आली होती.

सध्या थरूर इंग्लिश प्रचंड फेमस झालंय. सोप्या शब्दांना अवघड करून करून सांगण्यामुळे आपली विद्वत्ता झळकते असं काही जणांचं म्हणणं असतं. फक्त इंग्लिशच नाही तर हिंदी मराठीतही भाषण करणारे मेम्बर संस्कृतप्रचुर भाषणे करून टाळ्या मिळवत असतात. दुर्बोध अगम्य असं काही तरी बोलणारा व्यक्ती हा विद्वान पंडित आहे असा काहीसा गैरसमज समाजात दृढ झाला आहे.

राजकारणात सुद्धा हाच पायंडा पडलेला दिसतो.  पण या अशाच अवघड इंग्लिश शब्दांमुळे माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांची खरडपट्टी काढण्यात आली होती.

मराठवाड्यातल्या लातूर जवळच्या चाकूर या छोट्याशा गावात शिवराज पाटलांचा जन्म झाला. ते मूळचे वतनदार शिवाय घरात पोलीस पाटीलकी चालत आलेली. शिवराज पाटलांच्या वडिलांना शिक्षणाची आवड होती. त्यांच्या घरात सुबत्ता असल्यामुळे तसेच मुळातच शिवराज पाटील हुशार असल्यामुळे त्यांना उच्चशिक्षणाची संधी मिळाली.

शिवराज पाटील यांनी झुलॉजी या विषयात बीएसस्सी मध्ये शिक्षण पूर्ण केलं. त्यांना डॉक्टर होण्य्ची इच्छा होती पण त्या काळच्या काही नियमांच्या घोळामुळे त्यांना डॉक्टर काही बनता आलं नाही. अखेर त्यांनी वकील व्हायचं ठरवलं. हैद्राबाद आणि मुंबई येथे शिवराज पाटलांनी कायद्याचं उच्च शिक्षण पूर्ण केलं. मधल्याकाळात त्यांनी लातूर मधल्या एका शाळेत शिक्षकाची नोकरी देखील केली.

मुंबई विद्यापीठातून एलएलएम चांगल्या मार्कानी पास झाल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिलीची प्रॅक्टिस करायचं ठरवलं. मुंबईत वकिली करायची तर आपल्याला इंग्रजी चांगलं जमलं पाहिजे हे शिवराज पाटलांना माहित होतं. याच काळात त्यांनी आपल्या इंग्लिशवर मेहनत घेतली आणि अस्खलित इंग्रजी बोलायला शिकले.

मात्र याच काळात औरंगाबाद येथील एका लॉ कॉलेजमधले एक प्राध्यापक सुट्टीवर गेले असल्यामुळे शिवराज पाटलांना काही काळासाठी लेक्चरर म्हणून येणार का अशी विचारणा करण्यात आली. शिवराज पाटलांनी होकार दिला व मराठवाड्यात परतले. सहा महिन्यांनी ते प्राध्यापक परतल्यावर पाटलांनी लातूरमध्येच वकिली करायचा निर्णय घेतला.

लातूर मध्ये मात्र त्यांच्या वकिलीने चांगलाच जम बसवला. कायद्याचा सखोल अभ्यास, भाषेवर प्रभुत्व आणि कोर्टात आपली बाजू मांडण्याची क्षमता यामुळे त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्याकडे अशिलाची रांग लागली.

अशातच लातूर नगरपालिकेच्या निवडणुका आल्या. मित्रांच्या आग्रहामुळे शिवराज पाटील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीस उतरले. इतकंच नाही तर भरघोस मतांनी निवडून देखील आले.  दोन वर्षे लातूरचा नगराध्यक्ष म्हणून त्यांनी चमकदार कामगिरी करून दाखवली. केशवराव सोनवणे यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं. 

१९७२ साली जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका आल्या तेव्हा केंद्रातून इंदिरा गांधींनी आदेश दिला की काँग्रेसकडून तरुण व उच्च शिक्षित उमेदवारांना तिकीट देण्यात यावं. यातूनच शिवराज पाटलांना विधानसभेची लॉटरी लागली. त्यांनी आपल्या मेहनतीने त्यात विजय देखील मिळवला.

मराठवाड्याचेच शंकरराव चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांनी शिवराज पाटलांना राज्यमंत्री बनवलं. विधानसभेत अल्पकाळात त्यांनी आपल्या अभ्यासू भाषणांनी छाप पाडली. म्हणूनच अगदी तरुण वयात त्यांना वसंतदादांनी विधानसभा अध्यक्ष बनवलं.

पुढे शिवराज पाटील हे काँग्रेसकडून लातूर लोकसभा निवडणुकीला उतरले. तिथे त्यांना सहज विजय मिळाला. लोकसभेत देखील त्यांनी अभ्यासू भाषणांनी चमक दाखवली. पाटलांना विधानसभा अध्यक्षपदाचा अनुभव असल्यामुळे लोकसभा पीठासीन अधिकाऱ्यांच्या यादीत त्यांचं देखील नाव टाकण्यात आलं.

शिवराज पाटील सांगतात,

“एकेदिवशी मला सभागृहात अचानक अर्थसंकल्पावर आणि सुरक्षेवर भाषण करावे लागले. ते इंदिराजींनी ऐकले. त्यानंतर त्यांनी मला कायम स्वातंत्र्य दिले. त्या माझ्यासाठी आईच होत्या. मुलासारखं वागवायच्या.”

 इंदिरा गांधींनी या तरुण खासदाराला हेरलं. त्यांना थेट संरक्षण खात्याचा राज्यमंत्री बनवलं. 

एकदा एक सभा सुरु होती. शिवराज पाटलांच्या सोबत इंदिरा गांधी देखील या सभेत हजर होत्या. शिवराज पाटलांनी अस्खलित इंग्रजीत भाषण केलं. बोलता बोलता त्यांनी एका अवघड इंग्रजी शब्दाचा वापर केला. भाषण झाल्यावर ते अभिमानाने खाली बसले. त्यांना वाटलं इंदिरा गांधी शाबासकी देतील. पण झालं उलटच.

इंदिरा गांधी म्हणाल्या,

आप मुश्किल शब्द की जगह आसान शब्द का इस्तेमाल कर सकते थे।”

शिवराज पाटलांना धक्का बसला. ते इंदिरा गांधींना सॉरी म्हणाले. त्यानंतर त्यांनी चुकूनही आपल्या भाषणात अवघड शब्द वापरला नाही. आपली भाषणे हि विद्वात्ता दाखवण्यासाठी नाही तर लोकांना समजावून सांगण्यासाठी असतात हा धंदा त्यांना या निम्मिताने शिकायला मिळाला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.