जेटली, महाजन, मुंडे, फडणवीस, चंद्रकांत पाटील अशा अनेक नेत्यांना या एका व्यक्तीने घडवलंय..

अरुण जेटली, प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील, विनोद तावडे या सगळ्या नावांमध्ये काय कॉमन आहे? तुम्ही म्हणाल कि हे सगळे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते तर आहेच हो पण अजून एक साम्य आहे. ते साम्य आम्हाला चंद्रकांत दादा पाटलांनी सांगितलं,

चंद्रकांत दादा म्हणतात माझे राजकीय गुरु म्हणजे यशवंतराव केळकर.

 

फक्त चंद्रकांत दादानांच नाही तर अरुण जेटली, महाजन,मुंडे,देवेन्द्र फडणवीस, विनोद तावडे अशा अनेक नेत्यांना घडवण्याचं श्रेय यशवंतराव केळकरांना जातं. कोण होते हे केळकर ? राज्य राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांना घडवूनही त्यांचं नाव आपल्यापैकी अनेकांना ठाऊक देखील नसतं.

यशवंतराव केळकर मूळचे पंढरपूरचे. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या एस.पी.कॉलेजमध्ये झालं. याच काळात त्यांची ओळख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी झाली. पुण्याच्या रामदास शाखेत संघकार्यात ते सक्रिय झाले. ४२ च्या चले जावं आंदोलनावेळी हातबॉम्ब बनायला देखील शिकले. राष्ट्रभक्तीने भारावून गेलेल्या या काळात त्यांनी संघाचा पूर्ण वेळ प्रचारक व्हायचं ठरवलं.

राज्यात नाशिकपासून ते सोलापूर पर्यंत फिरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचार केला.

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. पण या स्वातंत्र्याबरोबर देशाला फाळणीचा शाप देखील मिळाला. हिंदू मुस्लिम दंगे सुरु झाले. गांधी हत्येनंतर संघाच्या कार्यकर्त्यांवर देखील हल्ले सुरु झाले. या सगळ्या काळातही यशवंतराव केळकर हे एकमेव कार्यकर्ते होते ज्यांनी आपली सद्सदबुद्धी शाबूत ठेवली. जहाल भाषणे करणाऱ्या कार्यकर्त्यांना ते शांत करत. ते नेहमी म्हणायचे,

“माथे भडकवण्यापेक्षा हृदय कारुण्याने भारून टाकणे मला नेहमी महत्वाचे वाटते.”

पुढे १९५५ साली संघ प्रचारातून त्यांना मुक्त करण्यात आलं. पुण्यात रामभाऊ म्हाळगीं यांच्या नेतृत्वाखाली जनसंघाची उभारणी करण्याचं काम देखील त्यांनी काही काळ केलं. याच काळात त्यांनी आपलं अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं. इंग्रजी विषयात एम ए पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पुढे ते नोकरीच्या निम्मिताने मुंबईला आले.

वांद्र्याच्या के सी महाविद्यालयात त्यांना प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. मुंबईतच त्यांचा विवाह देखील झाला. ते राजकारणापासून थोडेसे बाजूला झाले पण संघ कार्य चालूच होतं.

१९५९ साली त्यांच्या आयुष्याला आणि एकंदरीतच संपूर्ण संघ विचारांच्या राजकारणाला कलाटणी करणारी गोष्ट घडली. ती गोष्ट म्हणजे यशवंतराव केळकर यांच्याकडे सोपवण्यात आलेली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची जबाबदारी.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) म्हणजे संघाशी जोडली गेलेली विद्यार्थी संघटना. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात विद्यार्थी हितासाठी काम करण्यासाठी म्हणून बलराज मधोक यांच्या नेतृत्वाखाली १९४९ साली या संघटनेची स्थापना झाली. या संघटनेचे सुरवातीचे उद्दिष्ट विद्यापीठ स्तरावर डाव्या विचारांचे प्रस्थ कमी करणे हे होतं.

यशवंतराव केळकर यांना एबीव्हीपीच्या मुंबई शाखेची जबाबदारी सोपवण्यात आली. केळकर हे विचाराने सौम्य होते, शिक्षक असल्यामुळे विद्यार्थीमनावर त्यांची पकड होती. त्या काळात युवामनाशी संवाद करू शकणारा, आधुनिक कालसंगत विचारांचा, प्रयोगशील वृत्तीचा, नव्या कल्पनांबाबत स्वागताची भूमिका ठेवणारा, विचारशील पण व्यावहारिक मर्यादांचे भान ठेवणारा आणि निग्रही कार्यकर्ता- नेता-मार्गदर्शक, यशवंतराव केळकरांच्या रूपाने विद्यार्थी परिषदेला मिळाला.

सुरवातीच्या काळात यशवंतरावांचे घर हेच एबीव्हीपीचे कार्यालय असे. १९६१ साली त्यांच्या प्रयत्नांतून अलाहाबादेस राष्ट्रीय अधिवेशनास वीस प्रतिनिधी गेले आणि विशेष म्हणजे त्यात विद्यार्थिनी प्रतिनिधींचाही सहभाग होता. विद्यार्थी परिषदेच्या संघटनात्मक वाटचालीत ही विशेष महत्त्वाची गोष्ट होती. अर्थात विद्यार्थिनींचा सहभाग स्वाभाविकपणे वाढावा, याबद्दल यशवंतराव आग्रही असत.

परिषदेत येणाऱ्या विद्यार्थिनी कार्यकर्त्यांना यशवंतरावांच्या मार्गदर्शनाचे अप्रूप असे.

याच काळात तीन वर्षे यशवंतरावांनी भाषाशास्त्राचा अभ्यास केला. १९६१ मध्ये विद्यार्थी परिषदेची पहिली दिनदर्शिका प्रकाशित झाली. ही कल्पना साकारण्यात यशवंतरावांचा मोठा वाटा होता. त्यांनी विविध प्रकल्प, कार्यक्रम यांद्वारे विद्यार्थी परिषदेच्या कामामध्ये सातत्य आणले. महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी परिषदेच्या औपचारिक कामाची रचना होण्यास १९६४ च्या महाराष्ट्राच्या पहिल्या प्रदेश अधिवेशनापासून सुरुवात झाली.

त्यानंतर यशवंतरावांनी राष्ट्रीय स्तरावर काही किमान रचना उत्पन्न व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू केले आणि या साऱ्या प्रयत्नांतून यशवंतरावांनी अखिल भारतीय कार्याची दृष्टी असलेल्या पाच-सहा जणांची ‘टीम’ उभी केली. हळूहळू विद्यार्थी परिषद खऱ्या अर्थानी ‘अखिल भारतीय’ होऊ लागली. 

सत्तरच्या दशकात काँग्रेस शासनामध्ये वाढलेल्या महागाई बेरोजगारी वशिलेबाजी यामुळे तरुणाईमध्ये असंतोष निर्माण झाला होता. या तरुणाईच्या असंतोषाला सृजनात्मक कामास लावावं यासाठी यशवंतराव केळकर कामाला लागले. 

विद्यापीठांमधून निवडणुका लढवल्या जात होत्या, यशवंतराव केळकरांनी एबीव्हीपीच्या तरुणांना या निवडणुकांमध्ये उतरवलं. अशाच निवडणुकीच्या माध्यमातून दिल्ली विद्यापीठात अरुण जेटली, नागपूरमध्ये नितीन गडकरी,परभणी मध्ये गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन असे नेतृत्व उभं राहिलं. 

९ जुलै १९७४ च्या रजत जयंती अधिवेशनापर्यंत परिषदेच्या राष्ट्रव्यापी रचनेचे सुस्थिरीकरण होत आले होते. 

अशातच १९७५ च्या २६ जूनला देशभर आणीबाणी जाहीर झाली. इंदिरा गांधींच्या सरकारने अत्याचारास सुरवात केली होती. त्या विरोधात विद्यार्थी परिषदेने सत्याग्रह चालू केले. विरोधकांना दडपण्यासाठी  काँग्रेसने जोरदार धरपकड सुरु केली. त्यातूनच १३ डिसेंबर १९७५ रोजी यशवंतरावांना देखील अटक होऊन मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात त्यांची रवानगी झाली. 

पुढे एक आठवड्यानंतर त्यांना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. एकोणीस महिने ते नाशिकच्या कारागृहात होते, परंतु तेथे देखील त्यांनी अनेक उपक्रम राबवून कारावासाच्या काळोखाने आणि भविष्याच्या अनिश्चिततेने हळव्या झालेल्या, कारागृहातील हजारो बंधूंना मानसिक धैर्य दिले. बंदींच्या सामूहिक कार्यक्रमांची आखणी आणि कार्यवाही करण्याच्या समितीत होते. 

कारावासातील याच काळात मराठवाड्यातील कळमनुरी येथील मार्क्सवादी कार्यकर्ते श्री. ख्वाजाभाई जाम्बकर यांच्याकडून सहा महिन्यांत यशवंतराव प्रमुख उर्दू भाषा शिकून इतरांसाठी त्यांनी तीन महिन्यांचा अभ्यासक्रम तयार केला.

गीत स्पर्धा, व्याख्याने, एकत्रीकरणे, उर्दू वर्ग, आयुर्वेद वर्ग इ. अनेक उपक्रम त्यांनी कारागृहात राबवले, १९७७ च्या फेब्रुवारीत यशवतरावाची कारागृहातून मुक्तता झाली. त्यानंतर १९७७ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जनता पक्षाचे कार्यालय साभाळण्याची जबाबदारी यशवंतरावाकडे आली. तीही त्यांनी समर्थपणे साभाळली. 

पण त्यांच्यातील हाडाचा शिक्षक राजकारणापेक्षा विद्यार्थी व कार्यकर्ते घडवण्यात जास्त रमायचा. त्यामुळेच त्यांनी पुन्हा परिषद कार्यात लक्ष घालण्यास सुरुवात कली. त्याचा कामाचा व्याप खूपच वाढू लागला. मात्र कितीही व्याप असला तरी त्यांचा प्रत्येक कार्यकर्त्यांशी थेट संपर्क होता. प्रत्येकाला ते नावाने ओळखायचे.

एबीव्हीपीच्या माध्यमातून त्यांनी देशभरातील कार्यकर्त्यांना घडवलं. महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील असोत की गुजरात मधले अमित शाह, गोव्याचे मनोहर पर्रीकर, दिल्लीचे अरुण जेटली. या सगळ्यांची राजकीय कारकीर्द एबीव्हीपी मध्ये घडवली.  प्रत्येकाचे पहिले राजकीय गुरु देखील यशवंतराव केळकर हेच होते. तस पाहायला गेलं तर एबीव्हीपीच्या माध्यमातून त्यांच प्रचंड राजकीय वजन होतं पण साधेपणामुळे ते कधीही प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिले. आपल्या अकहरच्या श्वासापर्यंत कार्यकर्ते घडवण्याचं काम त्यांनी निष्ठेनं पार पाडलं.

६ डिसेंबर १९८७ रोजी यशवंतराव केळकर नावाच्या महापर्वाचा अखेर झाला. आजही संघाच्या वर्तुळात त्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शिल्पकार म्हणून ओळखतात.

हे ही वाच भिडू.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.