मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहणाऱ्या हिरेंचा विमानातच पत्ता कट करण्यात आला..

नाशिक जिल्ह्यातील हिरे फॅमिली. महाराष्ट्राच्या राजकारणावर राज्य करणारी जी काही मोजकी राजकीय घराणी आहेत त्यात हिरे घराण्याचा निश्चितच समावेश केला जातो. अगदी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून हिरे फॅमिली राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. याच घराण्यातील कर्ता पुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाऊसाहेब हिरे यांना एकेकाळी थेट यशवंतराव चव्हाण यांचा मुख्यमंत्रीपदाचा प्रतिस्पर्धी मानलं जायचं. हिरेंना हरवूनच यशवंतराव पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले.

भाऊसाहेब हिरे यांचा राजकीय वारसा आधी व्यंकटराव हिरे आणि त्यांच्या नंतर बळीराम हिरे यांच्याकडे चालत आला.

सुरुवातीला बळीराम हिरे हे प्रख्यात डॉक्टर म्हणून मालेगाव तालुक्यात प्रसिध्द होते. कोणालाही मदत करणारे, संवेदनशील व्यक्तिमत्त्व, मृदृ स्वभावासाठी ते सर्वपरिचित होते. आपल्या वैद्यकीय कार्याच्या जोरावरच त्यांनी जनमानसात आपलं स्थान मजबूत केलं होतं. ते राजकारणात येणार नव्हते पण चुलत बंधू व्यंकटराव हिरे यांनी राजकीय अपरिहार्यता म्हणून त्यांना राजकरणात आणलं.  

१९७२ सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींनी प्रस्थापितांना शह देण्याचा निर्णय घेतला होता. यातूनच दाभाडी मतदारसंघात व्यंकटराव हिरेंऐवजी बळीराम हिरे यांना उमेदवारी दिली. यामुळे जिल्ह्याचे राजकारण पूर्ण बदलले. त्यावेळी बळीराम हिरे, विलास लोणारी, मोठाभाऊ भामरे हे नवीन चेहरे निवडून आले.

पुढे आणीबाणीनंतर म्हणजेच १९७८ साली काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यावेळी बळीराम हिरेंसह चार ते पाच कार्यकर्त्यांनी एकत्र येत इंदिरा काँग्रेस नाशिकमध्ये रूजवली. सन १९७८ मध्‍येही डॉ. बळीराम हिरे हे निवडून आले. वसंतदादा पाटलांच्या मंत्रिमंडळात त्यांना आरोग्य मंत्रिपदही मिळाले. त्यांनी सभागृहात उत्तम काम केले. गांधी घराण्याशी ते एकनिष्ठ होते.

पुढे दादांचे सरकार तुटले पण डॉ. ‌‌हिरे शरद पवारांसोबत पुलोद मध्ये गेले नाहीत. त्यांनी इंदिरा काँग्रेसचा झेंडा आपल्या एकाकीपणे खांद्यावर वाहिला.

पुढे १९८० मध्ये पुन्हा काँग्रेसची लाट आली. कित्येक नेते परत पक्षात येऊ लागले पण इंदिरा गांधींनी आपल्या निष्ठावंतांनाच संधी दिली. त्यावेळी मुख्यमंत्री बनले बॅरिस्टर अंतुले. डॉ. हिरे सुद्धा विधानसभेवर निवडून आले. त्यांच्यावर ऊर्जा मंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

पुढे जेव्हा अंतुलेंची सिमेंट घोटाळ्यात हकालपट्टी करण्यात आली तेव्हा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर बळीराम हिरे यांचं नाव होतं. पण काही अतार्किक कारणे आणि अंतुलेंचा आग्रह यामुळे ऐनवेळेस अननुभवी बाबासाहेब भोसले यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. पक्षावर निष्ठा असलेल्या हिरेंनी त्यांच्याही मंत्रिमंडळात उत्तम काम केलं. 

नाशिक जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा प्रचंड मोठा प्रभाव होता. जिल्ह्याच्या राजकारणाचे ते अनभिषिक्त सम्राट होते. शत्रूशी ते प्रेमाने बोलत. सर्वांशी त्यांचे चांगले संबंध होते.

अजातशत्रू म्हणवल्या जाणाऱ्या बळीराम हिरे यांना १९८५ साली लोकसभेचे तिकीट जाहीर झाले होते. मात्र, डॉ. हिरे यांना राज्याच्या राजकारणातच जास्त रस होता. त्यांना लोकसभेवर जाण्याची इच्छा नव्हती. त्यावेळी सर्वांनी दिल्लीवारी करून मुरलीधर माने यांचे नाव पुढे केले. 

बाबासाहेब भोसले यांच्या नंतर मुख्यमंत्रीपदावर आलेले वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला कोळून प्यायलेले होते. ते प्रचंड लोकप्रिय तर होतेच पण राजकीय डावपेचांमध्ये देखील त्यांचा हातखंडा होता. 

वसंतदादा पाटलांचे व केंद्रातील काँग्रेस श्रेष्ठीशी फारसे सख्य नव्हते मात्र तरीही जनतेच्या रेट्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं होतं. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात चार मुख्यमंत्री बदलले होते. त्यामुळे आपली खुर्ची कधीही धोक्यात येईल याची वसंतदादा पाटलांना खात्री होती. पण आपले विरोधक कोण असतील त्यांना आधीच नेस्तनाबूत करायची मोहीम दादांनी हाती घेतली.

सर्व प्रथम लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी अंतुलेंचा पत्ता कट केला. पुढचा नम्बर बळीराम हिरे यांचा होता. १९८५ सालच्या विधानसभा निवडणुका आल्या. मुख्यमंत्री म्हणून तिकीट वाटपाची जबाबदारी वसंतदादा पाटलांकडे होती. जेष्ठ नेता म्हणून बळीराम हिरे यांचा देखील तिकीट वाटपामध्ये सहभाग होता. निवडणुकीच्या आधी ते खास नाशिक वरून मुंबईला आले. त्यांचा मुक्काम रॉयलस्टोन या बिल्डिंगमध्ये होता. अनेक इच्छूक उमेदवार त्यांच्या कडे तिकीट मागण्यासाठी यायचे.

उमेदवारांची यादी जेव्हा तयार झाली तेव्हा बळीराम हिरे व वसंतदादा पाटील पंतप्रधानांकडून फायनल करण्यासाठी दिल्लीला आले. राजीव गांधी तेव्हा पक्षाध्यक्ष देखील होते. त्यांच्याशी चर्चा झाली. दादांनी यादीवर शिक्कामोर्तब करून घेतला.

बळीराम हिरे परतीच्या प्रवासात वसंतदादांच्या बरोबरच विमानात होते. विमानात चढताना हिरे वसंतदादा पाटलांची गंमत करण्यासाठी मुद्दाम त्यांना म्हणाले,

 ‘गांधी फॅमिलीला हिऱ्यांची खरी पारख आहे’ 

वसंत दादांनी थोडा वेळ काढला आणि विमानाने आकाशात झेप घेताच डॉ. हिऱ्यांना जवळ बोलावून ते म्हणाले,

 ‘बळीरामजी, यावेळी राजीवजींनी हिऱ्यांची पारख करायला मला सांगितले होते. आणि माझ्या परीक्षेत तुम्ही नापास झाल्याने तुम्हाला उमेदवारी दिलेली नाही.’ 

दादांचे हे उद्गार ऐकून डॉ. हिरे यांच्या पायाखालची जमीन सरकली. वसंतदादांनी आपल्या सोबत दोन याद्या नेल्या होत्या. यातली एक यादी बळीराम हिरे यांनी पहिली होती पण दुसरी यादी त्यांनी पहिली नव्हती. या दुसऱ्या यादीतच त्यांचं नाव वगळण्यात आलं होतं. वसंतदादांनी धुर्तपणा करून त्यांचा पत्ता कट केला होता. बळीराम हिरे याना क्षणभर स्वत:चाच राग आला. 

त्यांनी दादांच्या खांद्यावर हात ठेवून ‘दादा, मला वाचवा’चा आग्रह धरला. 

त्यावर वसंतदादा म्हणाले,

‘आता मी काहीच करू शकत नाही आणि विमान हवेत असल्यामुळे तुम्हीही काही करू शकणार नाही. तेव्हा मुंबईत उतरल्यावर दिल्लीत श्रेष्ठींशी संपर्क साधून ‘तिकिटाचे काही होतेय का ते पाहा’

मुंबईत उतरल्यावर हिरे यांनी खूप धावपळ केली, पण शेवटपर्यंत त्यांना फारशी कुणी दाद दिली नाही. शेवटी दाभाडी मतदारसंघात त्यांनी कसेबसे पत्नी इंदिराताई यांना उमेदवारी मिळेल असे प्रयत्न केले. पण निवडणुकीत इंदिराताईंचा पराभव होईल याची ‘व्यवस्था’ पुन्हा दादांनीच केली. इंदिराताईंच्या जाऊबाई पुष्पाताई हिरे यांना शरद पवारांच्या एस. काँग्रेसकडून तिकीट घ्यायला लावून त्यांना विजयी करण्याचा यशस्वी डाव दादा खेळले, पण डॉ. हिरे यांचा काटा त्यांनी काढलाच.

 पुढे वसंतदादा पुन्हा मुख्यमंत्री बनले. जेव्हा राजीव गांधींवर नाराज होऊन दादांनी राजीनामा दिला तेव्हा त्यांच्या जागी त्यांचेच समर्थक असलेले शिवाजीराव निलंगेकर पाटील मुख्यमंत्री झाले. बळीराम हिरे तेव्हा विधानसभेत असते तर कदाचित निलंगेकरांच्या ऐवजी त्यांचंच नाव फायनल झालं असतं. 

वसंतदादा पाटलांनी तेव्हा डॉ. हिरे यांचे तिकीट कापले आणि तेव्हापासून जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम झाला. त्यांच्या राजकीय कारकीर्दीला देखील घसरण लागली. हिरेंनी अपक्ष उमेदवारीही केली. मात्र, त्यांना पुन्हा आमदारकीची संधी मिळाली नाही. मात्र इतकं असलं तरी अखेर पर्यंत गांधी घराण्याशी ते एकनिष्ठ राहिले. 

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.