नीरज चोप्राला गोल्डसाठी प्रशिक्षण दिलेल्या कोचला ॲथलेटिक्स फेडरेशनने घरी पाठवलंय…

AFI म्हणजेच ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने भालाफेकचे राष्ट्रीय कोच उवे हॉन यांना बरखास्त केलंय. ५९ वर्षीय उवे हॉन यांना नीरज चोप्रा, शिवपाल सिंह आणि अन्नु रानी यांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी होती. यांच्या मार्गदर्शन आणि कोचिंगमध्येच नीरज चोप्राने एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकले होते.

मात्र असं सांगितले जायचे कि नीरज चोप्रा देखील यांच्या प्रशिक्षणापासून समाधानी नव्हते. टोकियो ऑलिंपिक्समध्ये नीरजने कोच क्लाउज बार्तोनित्ज यांचं प्रशिक्षण घेतलं होतं.

बरखास्त करण्यामागचे कारण काय?

उवे हॉन यांना २०१७ मध्ये कोच बनवण्यात आलं होतं. मात्र आता फेडरेशन कडून सांगण्यात येत आहे कि, ते उवे हॉन यांचे प्रशिक्षण आणि काम या दोन्ही गोष्टींशी समाधानी नाहीत. गत एशियन गेम्समध्ये शिवपाल पाल सिंह, अन्नू रानी, थाळीफेकपटू सीमा अंतिल आणि गोळाफेकपटू तजिंदर सिंह तूर या सगळ्यांचे प्रदर्शन खूपच खराब होते.

याच गोष्टीचा हवाला देत ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदिल सुमरिवाला म्हणाले कि, 

आम्ही उवे हॉन यांना हटवत आहोत. त्यांचं काम समाधानकारक नाही. त्यांच्या जागी आता आम्ही २ परदेशी कोच आणत आहोत. आम्ही तेच करत आहोत जे आम्हाला करायला हवं आहे.

ऑलिम्पिकचा मेडल विजेता नीरज चोप्रा म्हणाला कि, मी देखील उवे हॉन यांच्या कोचिंगशी समाधानी नव्हतो. नीरज म्हणाला कि, 

मी उवे हॉन सरांसोबत बरेच दिवस वेळ घालवला आहे. त्यांनी मला प्रशिक्षण दिले आहे. ते खूप चांगले देखील आहेत. मी त्यांचा आदर करतो. त्यांच्याच मार्गदर्शनात मी २०१८ च्या कॉमनवेल्थमध्ये आणि एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकले होते. पण मला वाटत कि उवे हॉन यांच्या प्रशिक्षणाची स्टाईल आणि तंत्रज्ञान थोडे वेगळे आहे. जेव्हा मी क्लाउज बार्तोनित्ज सरांसोबत काम सुरु केले तेव्हा मला त्यांचा ट्रेनिंग प्लॅन चांगला वाटला, मला सूट देखील झाला.

मात्र हि या प्रकरणाची एक बाजू आहे. दुसरी बाजू देखील आपण समजून घ्यायला हवी. मग दुसरी बाजू काय आहे?

या प्रकरणाची दुसरी बाजू आहे ती म्हणजे हॉन यांनी जून महिन्यात स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावर टीका करत यांच्यासोबत काम करणं अवघड असल्याचं म्हटलं होतं.

इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना त्यांनी आरोप लावले होते कि,

जेव्हा मी इथे आलो तेव्हा मला वाटलं की मी काही बदल करू शकेन. पण या लोकांसाठी हि गोष्ट अवघड वाटत आहे. मला माहिती नाही की हे, ज्ञानाचा अभाव आहे की, अज्ञान. शिबिरे किंवा स्पर्धेव्यतिरिक्त आम्ही खेळाडूंसाठी पोषक तज्ज्ञांद्वारे पदार्थ मागवतो, तेव्हा आम्हाला ते मिळत नाही. TOPS (टारगेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम) क्रीडापटूंनाही हे नशीबबात नाही. यातील जर आपल्याला काही मिळाले तर खूप आनंद होईल.

तसेच एप्रिलमध्ये करण्यात आलेल्या नव्या कॉन्ट्रॅक्टमुळे मी आनंदी नव्हतो. मला आणि क्लाउज बार्तोनित्ज यांना ब्लॅकमेल करून कॉन्ट्रॅक्टवर जबरदस्ती सह्या करायला सांगितल्या होत्या. सह्या केल्या नसत्या तर आम्हाला पैसे मिळाले नसते. 

मात्र या सगळ्या पलीकडे जाऊन जे काही आरोप प्रत्यारोप झाले असतील किंवा होणार असतील पण आपण हि गोष्ट नाकारू शकत नाही कि त्यांच्याच मार्गदर्शनात नीरजने २ गोल्ड मेडल जिंकले आहेत. प्रत्येक कोचची काम करण्याची एक पद्धत असती, स्वतः विकसीत केलेलं एक तंत्र असते. मात्र ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने सध्या तरी त्यांच्या कामावर असमाधान व्यक्त करत हटवलं आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.