तेव्हा सोनिया गांधी यांनी रजनी पाटलांना पैसे उधार दिले होते..

आज राजीव सातव यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर काँग्रेसने मराठवाड्यातीलच एक दिग्गज नेत्या रजनीताई पाटील यांना तिकीट दिलं. या पूर्वी देखील विलासराव देशमुख यांच्या नंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी देखील रजनी पाटील यांची निवड झाली होती. आज सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या सर्वात विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रजनी पाटील एकेकाळी शंकरराव चव्हाण यांच्या मानसकन्या म्हणून ओळखल्या जायच्या.

एकेकाळी बीड जिल्ह्यात काँग्रेसचा आणि त्याहूनही शरद पवारांचा मोठा दबदबा होता. चाळीस वर्षांपूर्वी शिवाजीराव पंडित, सुंदरराव सोळंके, बाबूराव आडसकर, केशरकाकू क्षीरसागर, पंडितराव दौंड यांनी कुशल राजकारणातून सत्तास्थाने काबीज केलेली होती. परंतु त्याच काळात जनसंघाचे प्रमोद महाजन- गोपीनाथ मुंडे ही जोडगोळी आणि काँग्रेसमध्ये अशोक पाटील या युवा नेत्यांचा उदय झाला.

महाजन भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात गेले तर मुंडे राज्यात स्थिरावले.

काँग्रेसमधील दुफळीचा फायदा उठवत मुंडेंनी भाजपचे आणि स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्याला सुरवात केली. दुसरीकडे शरद पवारांना राज्यात आव्हान देणाऱ्या शंकरराव चव्हाण यांनी बीडमध्ये आपले पाय रोवण्यास सुरवात केली होती. ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांनी त्यांची मानसकन्या म्हणवल्या जाणाऱ्या रजनी पाटील यांच्या पतींना म्हणजेच अशोक पाटील यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्रीपद दिले.

इथूनच पाटील घराण्याचे जिल्ह्यात राजकारणात बस्तान बसले. पुढे १९९५ मध्ये राज्यात युती सरकार आले. केंद्रात देखील भाजपचा दबदबा  होता. १९९६  साली होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मुंडेंनी बीडमध्ये सुरु केलेला उमेदवाराचा शोध रजनीताई पाटील यांच्यापाशी येऊन थांबला. स्थानिक गटातटाच्या राजकारणात रजनीताई काँग्रेस सोडून भाजपमध्ये आल्या आणि मुंडेंच्या मदतीने खासदार देखील झाल्या.

पुढच्या निवडणुकीत मात्र चित्र बदललं. सोनिया गांधींचं राजकरणात आगमन झालं होतं. भाजपच्या खासदार असल्या तरी रजनी ताई पाटील यांची नाळ काँग्रेसशी जोडली गेली होती. १९९८ सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी शंकरराव चव्हाण यांच्या सल्ल्याने त्या काँग्रेसमध्ये परतल्या. सोनिया गांधी यांच्या पर्यंत त्यांची ख्याती पोहचली.

संभाषण कौशल्य, इंग्रजीवरील प्रभुत्व, समयसूचकता या बाबींमुळे रजनी पाटील यांनी सोनिया गांधींना आपलंसं करून घेतलं. त्या बळावर त्यांना सोनिया गांधींनी महिला काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद, केंद्रीय समाजकल्याण बोर्डाचं अध्यक्षपद बहाल केलं.

रजनीताई पाटील आणि सोनिया गांधी यांच्या मैत्रीचा एक किस्सा सांगितला जातो.

गोष्ट आहे २०१८ सालची. रजनी पाटील यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आला होता. त्यांचा राज्यसभेचा अखेरचा दिवस असेल. कामकाज स्थगित झाल्यामुळे सेंट्रल हॉलमध्ये बसल्या होत्या. त्यावेळी कोणीतरी सोनिया गांधी तुम्हाला शोधत असल्याचा निरोप दिला.

सोनिया गांधींचा निरोप आहे म्हटल्यावर रजनी पाटील घाईघाईने सेंट्रल हॉलच्या बाहेर पडल्या. त्या बाहेर पोहचल्या इतक्यात सोनिया गांधी लोकसभेचं कामकाज आटोपून घरी जायला निघाल्या होत्या.  आता रजनीताई पाटील राज्यसभेत नसल्यामुळे त्यांच्याशी नेहमीसारखी भेट होणार नाही, या विचाराने सोनिया गांधीनी त्यांना आपल्या गाडीतून घरापर्यंत येण्याची विनंती केली.

गाडीत बसल्यानंतर सोनिया गांधी आणि रजनी पाटील यांच्या संभाषणाला सुरुवात झाली. तुम्ही राज्यसभेत नसलात तरी पक्ष कायम तुमच्यासोबत असेल, असे सोनियांनी पाटील यांना सांगितले.

त्यानंतर संपूर्ण रस्त्यात या दोघींच्या गप्पा अशाच सुरू होत्या. परंतु, गाडी सोनियांच्या १० जनपथ या निवासस्थानी आल्यानंतर रजनी पाटील यांना गाडीतून उतरताना अचानक काहीतरी आठवले. त्या पार्लमेंटमधून येताना घाई घाईत आपली पर्स आणि मोबाईल सेंट्रल हॉलमध्येच विसरून आल्या होत्या.

१० जनपथ पासून  संसदेपर्यंत रजनी पाटील यांना खासगी वाहनाने जावे लागणार होते. कारण त्यांची गाडीही संसदेच्या आवारात पार्क केली होती. आता बिनापैशांचे  संसदेपर्यंत कसे परत जायचे, असा प्रश्न रजनी पाटलांना पडला.

त्यांनी ही गोष्ट सोनिया गांधींना सांगितली. मात्र, योगायोगाने तेव्हा सोनिया गांधी यांच्याजवळही पैसे नव्हते.

अखेर सोनिया गांधींनी आपल्या ड्रायव्हरकडून १२० रुपये उसने घेतले आणि रजनीताईंना दिले. तरी हे पैसे घेऊन रजनी पाटील २४ अकबर रोडवर असलेल्या काँग्रेस मुख्यालयापर्यंच चालत गेल्या. तेथून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रजनी पाटील यांना संसदेत जाण्यासाठी गाडीची व्यवस्था केली.

इकडे संसदेत काँग्रेसच्या खासदार कुमारी सेलजा यांना पाटील यांची पर्स आणि मोबाईल मिळाला. त्यांनी तो आपल्याकडे ठेवून घेतला. रजनी पाटील परतल्यावर त्यांनी ती पर्स त्यांच्याकडे सुपूर्द केली.

हि छोटीशी घटना मात्र रजनीताई ती कधीच विसरल्या नाहीत.

आजही त्यांनी सोनिया गांधींनी दिलेले ते १२० रुपये खर्च केलेले नाहीत तर ते आपल्याकडेच आठवण म्हणून ठेवले आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.