एक लाख बैलगाड्या मुंबईत घुसवल्या, एकाही मंत्र्याला मंत्रालयात जाऊ दिले नव्हते…

शेतकरी, शेतमजूर, कामगारांसाठी लढणारा पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष अर्थात शेकाप. एकेकाळचा महाराष्ट्राच्या राजकारणातील नंबर दोनच पक्ष. देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या वर्षात म्हणजे १९४८ साली शंकरराव मोरे, केशवराव जेधे, जवळकर, उस्मानाबादचे भाई उद्धवराव पाटील अशा ताज्या दमाच्या तरुणांनी स्थापन केलेल्या या पक्षाने काँग्रेसला टक्कर देण्यापर्यंत मजल मारली.

त्यावेळी राष्ट्रीय पातळीवर आपली पाळंमुळं घट्ट रोवलेल्या काँग्रेसमध्ये प्रस्थापीत नेतृत्वामुळे न मिळणाऱ्या संधी, सत्यशोधकी विचारधारा या गोष्टींसह शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी लढणारा, डाव्या विचारांची धार कायम जिवंत ठेवणारा पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्ष हा राज्यात झपाट्याने पुढे आला. अगदी प्रभावी विरोधी पक्ष म्हणून ओळख मिळवली. 

शेकापने त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र, शेतकरी, कामगार आदी प्रश्नांसंबंधी उठवलेला बुलंद आवाज व त्यासाठी केलेली आंदोलन चांगलीच गाजली. शेकापचे असेच १९६० च्या दशकात एक आंदोलन देशभरात चांगलेच गाजले होते ते बैलगाडी आंदोलन.

या आंदोलनात त्यावेळी शेकापच्या नेत्यांनी एक लाख बैलगाड्या मुंबई घुसवत शेकाप नेत्यांनी एकाही मंत्र्याला मंत्रालयात जाऊ दिले नव्हते.

त्यावेळी झालेलं असं कि, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला शेतीमालाच्या उत्पादनाच्या खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे अशी शेकापच्या नेत्यांची मागणी होती. त्यावेळी भाई उद्धवराव पाटील यांनी या मागणीची विधानसभेच्या व्यासपीठावर पहिली शास्त्रशुद्ध मीमांसा केली. पुढे लोकसभेतही त्यांनी आवाज याबाबत उठवला.

याच प्रश्नावर १९६६ मध्ये शेकापच्या नेत्यांनी त्यावेळच्या सचिवालयावर आणि आजच्या मंत्रालायावर बैलगाडी मोर्चा काढायचा निर्णय घेतला. यानुसार १३ मार्च १९६६ रोजी मुंबईत शेतकरी कामगार पक्षाचा एक लाख बैलगाड्यांचा मोर्चा मुंबईत धडकला होता.

मुंबईत एक लाख बैलगाड्यांचा मोर्चा ही कल्पनाच आजच्या काळात कल्पनेपलीकडील विचार आहे.

उध्दवराव पाटील, एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख या दिग्गज नेत्यांनी त्यावेळच्या शीवपासून (सायन) बैलगाडी चालवत सचिवालयाला घेराव घालण्यापर्यंत आले. यातील तब्बल चाळीस हजार बैलगाड्या उद्धवरावांच्या एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यातून आल्या होत्या. अत्यंत शिस्तबद्धरित्या या एक लाख बैलगाड्या मुंबई मध्ये दाखल झाल्या.

कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद तेव्हा मुंबईकराना अनुभवायला मिळाली होती. आजवरच्या इतिहासात इतका विराट मोर्चा कोणी पहिला नव्हता. 

त्यावेळी मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक तर गृहमंत्री होते बाळासाहेब देसाई. आधी वसंतराव नाईक या मोर्चाला सामोरे गेले. त्यानंतर बाळासाहेब देसाई यांचा नंबर होता. मुंबईत आता जिथे इस्लाम जिमखाना आहे तिथे बाळासाहेब देसाईंच्या गाडीसमोर एन. डी. आणि गणपतरावांनी आपल्या बैलगाड्या घातल्या.

बाळासाहेबांना अडवले.

आतासारखी मंत्र्यांना कडक सुरक्षा किंवा सुरक्षारक्षक तेव्हा नव्हते. मंत्र्यांना देखील भीती वाटत नव्हती. एन.डी. पाटील, गणपतराव आणि उध्दवराव यांंनी नमस्कार करून बाळासाहेबांच स्वागत केलं आणि त्यांची गाडी अडवली. बाळासाहेब शांतपणे गाडीतून खाली उतरले. त्यावेळी त्यांची मोठी डॉज गाडी होती….

शेकापचे नेते म्हणाले,

‘बाळासाहेब आज काही आम्ही तुम्हाला मंत्रालयात जाऊ देणार नाही… ’

बाळासाहेबांनी या नेत्यांच्या नमस्काराची परतफेड नमस्कारानेच केली. आणि शांतपणे गाडीत बसून गाडी वळवली. त्यानंतर ते मेघदूत बंगल्यावर गेले. शेकापच्या या आंदोलनामुळे त्यादिवशी मुख्यमंत्र्यांसहित एकही मंत्री मंत्रालयात पोहोचू शकला नव्हता.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.