भारताला तीन लष्करप्रमुख देणाऱ्या कुमाऊं रेजिमेंटचा इतिहास २३३ वर्षे जुना आहे..

भारतीय सैन्याचा इतिहास गौरवशाली आहे. आपल्या कारवायांनी देशाचं स्वातंत्र्य कायम ठेवण्यात, देशात शांतता प्रस्थापित करण्यात सैन्याचं मोठे योगदान आहे. अशाचं भारतीय सैन्याच्या रेजिमेंटपैकी एक असणाऱ्या कुमाऊँ रेजिमेंटचा गौरवशाली इतिहास भारतीय लष्कराच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेलाय.

ही भारतीय लष्कराची इंफेंट्री रेजिमेंट आहे. देशाला पहिले परमवीर चक्र देण्यापासून ३ लष्करप्रमुख देण्यासोबत सर्व कामगिरी ‘कुमाऊं रेजिमेंट’च्या नावावर आहेत. आतापर्यंतच्या सर्व युद्धांमध्ये आणि ऑपरेशनमध्ये, या रेजिमेंटच्या सैनिकांनी त्यांच्या धैर्याने आणि शौर्याने नेहमीच कामगिरी फत्ते केलीये.

सध्या देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये तैनात असलेल्या ‘कुमाऊं रेजिमेंट’च्या २१ बटालियन देशाच्या सीमांच्या संरक्षणात तैनात आहेत. भारतीय सैन्याच्या सर्वात प्रतिष्ठित रेजिमेंटपैकी एक असणाऱ्या कुमाऊं रेजिमेंटने जनरल एस.एम. श्रृंगेश, जनरल के.एस. थिमय्या आणि जनरल टीएस रैना यांच्या रूपाने ३ लष्करप्रमुख देशाला दिलेत.

‘कुमाऊं रेजिमेंट’चा इतिहास खूप जुना आहे म्हणजे स्वातंत्र्याआधीचा. त्याची स्थापना १७८८ साली झाली. उत्तराखंडच्या रानीखेत इथे कुमाऊँ रेजिमेंटचे मुख्यालय आहे. १७८८ मध्ये जेव्हा ही रेजिमेंट सुरू झाली, त्यावेळी ती हैदराबादमध्ये नवाब सलावत खानची रेजिमेंट म्हणून सुरू झाली होती. यानंतर, १७९४ मध्ये, ‘रेमंट कॉर्प्स’ आणि नंतर ‘निजाम कॉन्टिनेंट’ असे नाव देण्यात आले. या काळात ‘बेरार इन्फंट्री’, ‘निजाम आर्मी’ आणि ‘रसेल ब्रिगेड’ एकत्र करून ‘हैदराबाद कॉन्टिनेंट’ बनवले गेले.

१९०३ मध्ये ते भारतीय सैन्यात विलीन झाले. १९२२ मध्ये, त्याची पुनर्रचना करण्यात आली आणि त्याला ‘हैदराबाद रेजिमेंट’ असे नाव देण्यात आले. अखेर २७ ऑक्टोबर १९४५ रोजी ‘द कुमाऊं रेजिमेंट’ असे नाव देण्यात आले आणि उत्तराखंडच्या रानीखेत येथे ‘कुमाऊं रेजिमेंट सेंटर’ ची स्थापना करण्यात आली.

‘कुमाऊँ रेजिमेंट’च्या स्वातंत्र्यपूर्व काळातील शौर्यगाथेचा इतिहास अभिमानास्पद आहे. या रेजिमेंटने १८०३ मध्ये  मराठा युद्ध, १८१७ मध्ये पिंडारी युद्ध, १८४१ मध्ये भिल्ल विरुद्ध युद्ध, १८५३ मध्ये अरब युद्ध, १८५४ मध्ये रोहिल्ला युद्ध आणि १८५७ मध्ये भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात महत्वाची भूमिका बजावली.

पहिल्या महायुद्धात या रेजिमेंटने फ्रान्स, तुर्की, पॅलेस्टाईन, पूर्व आफ्रिका आणि अफगाणिस्तानमध्ये आपले लढाऊ कौशल्य दाखवले. या व्यतिरिक्त, द्वितीय विश्वयुद्धात देखील या रेजिमेंटच्या पलटणांनी मलाया, बर्मा आणि उत्तर आफ्रिका यासह इतर अनेक देशांमध्ये आपली ताकद सिद्ध केली होती.

१९४७ मध्ये, ‘४ कुमाऊं रेजिमेंट’च्या’ डेल्टा कंपनी’ने काश्मीरच्या बडगाममध्ये मेजर सोमनाथ शर्मा यांच्या नेतृत्वाखाली शौर्याचे झेंडे उभारले. या ऑपरेशनमध्ये अदम्य धैर्य दाखवत मेजर सोमनाथ यांनी पाकिस्तानी आदिवासींच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आणि शत्रूंना ठार केले. मेजर सोमनाथ शर्मा यांना मरणोत्तर ‘परमवीर चक्र’ प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते देशातील पहिले सैनिक होते.

‘कुमाऊं रेजिमेंट’ विशेषतः केवळ १९४७च्या ‘भारत-पाकिस्तान युद्ध’ साठीच नव्हे, तर १९६२ च्या ‘भारत-चीन युद्ध’ साठीही ओळखली जाते. १३ कुमाऊं रेजिमेंटच्या ‘चार्ली कंपनी’ने चिनी सैन्याचा पराभव केला होता. शैतान सिंह यांना त्यांच्या पराक्रम आणि शौर्याबद्दल मरणोत्तर ‘परमवीर चक्र’ प्रदान करण्यात आले.

१९६५ ते १९७१ च्या युद्धांसह आत्तापर्यंत भारतीय लष्कराच्या प्रत्येक मोठ्या ऑपरेशनमध्ये ‘कुमाऊं रेजिमेंट’ आघाडीवर आहे.

‘नागा रेजिमेंट’ची पायाभरणी

१९७० मध्ये रानीखेतमध्ये नागा रेजिमेंट’ उभारणे ‘कुमाऊं रेजिमेंट’चे मोठे यश होते. यासह, या रेजिमेंटने नागालँडच्या लोकांची मने जिंकण्याचे काम केले होते. यानंतर ‘कुमाऊं रेजिमेंट’ने ११ फेब्रुवारी १९८५ रोजी रानीखेतमध्ये’ नागा रेजिमेंट’ची दुसरी बटालियनही उभी केली होती.

सध्या ‘कुमाऊँ रेजिमेंट’च्या एकूण २१ बटालियन आहेत. याशिवाय ३ टेरिटोरियल आर्मी आणि ३ राष्ट्रीय रायफल बटालियन देखील आहेत. कुमाऊं रेजिमेंसोबत पॅराशूट रेजिमेंट, ४ मॅकॅनाईज्ड इंफेंट्री , ९ हॉर्स नेवलशिप, आयएनएस खंजर युद्धनौका देखील आहेत.

आपल्या कामगिरीबद्दल भारतीय लष्कराच्या ‘कुमाऊं रेजिमेंट’चा अनेक पद – पुरस्काराने गौरविण्यात आलेय. यात आतापर्यंत २ परमवीर चक्र, १० महावीर चक्र, ७८ वीर चक्र, ४ अशोक चक्र, ६ कीर्ती चक्र, २३ शौर्य चक्र, १ युध्द सेवा पदक, २ उत्तम युध्द सेवा पदक, ८ परम विशिष्ठ सेवा पदक, ३६ विशिष्ठ सेवा पदक, १२७ सेना पदक, १ अर्जुन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याशिवाय, रेजिमेंटला २२० पेक्षा मेंशन इन डिस्पेचेस आणि २ पद्मभूषण पुरस्कार मिळण्यासोबत ७३४ पेक्षा जास्त सन्मान प्राप्त झाले आहेत. ‘कुमाऊँ रेजिमेंट’च्या बटालियनने १७ पेक्षा जास्त वेळा’ युनिट सायटेशन्स ‘मिळवले आहेत.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.