घराणेशाही असावी तर डॉ.मनमोहन सिंग यांच्या पोरींसारखी…

भारतीय राजकारणाचा प्रवास लोकशाही नामक गोंडस नावाखाली सुरू असला, तरी त्याच्या व्यावहारिक नाडय़ा मात्र काही मोजक्या घराण्यांच्याच ताब्यात आहेत. थोडक्यात आज घराणेशाही नसलेला पक्ष भारतात शोधूनही सापडणार नाही. थोडक्यात सर्वच पक्षांतील नेत्यांनी घराणेशाहीचा स्वीकार केला.

पण यात नेहरू गांधी घराणे अग्रस्थानी आहे. देशाचे पंतप्रधानपद आजवर काही अपवाद वगळता नेहरू-गांधी घराण्याकडेच राहिले आहे. त्यामुळेच घराणेशाहीच गोंडस पिल्लू काँग्रेसनेच वाढवलंय, असं नेहमीच म्हंटल जातं. मात्र, याला एक पंतप्रधान अपवाद आहेत. ते म्हणजे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग.

ज्यांच्यावर नेहमीच टीका करण्यात आली. पण त्यांनी आपल्या घरात पक्ष वाढवलाच नाही. त्यांच्या तिन्ही मुली शिक्षण क्षेत्रात चमकल्या आहेत. 

भारताचे १४ वे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे एक विचारवंत व अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील एका खेड्यात झाला. डॉ. सिंग यांनी १९४८ साली पंजाब विद्यापीठातून आपले उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांच शैक्षणिक कर्तृत्व पंजाब विद्यापीठापासून इंग्लंड मधील केम्ब्रिज विद्यापीठापर्यंत विस्तारलेलं आहे. १९५७ साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली.

पुढं १९५८ साली त्यांचा विवाह जालंधरच्या सरदार छत्तर सिंग यांच्या कन्या गुरुशरण कौर यांच्याशी  झाला. लाइमलाईट पासून दूर राहणाऱ्या गुरुशरण भारतीयांच्या कमीच माहितीतल्या. या दाम्पत्याला तीन मुली झाल्या. उपिंदर, दमन आणि अम्रित. आणि या पोरींनी पण नेहमीच लाइमलाईट पासून दूर राहणंच पसंद केलं. 

मनमोहन सिंगांची मोठी मुलगी उपिंदर सिंग या दिल्लीच्या अशोका विद्यापीठात, इतिहासाच्या विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी सेंट स्टीफन कॉलेज मध्ये, दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये अध्यापनाच काम केलं आहे. त्यांनी दिल्लीच्या स्टीफन कॉलेज, कॅनडाच्या मॅकगिल युनिव्हर्सिटीमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांना केम्ब्रिज, हार्वर्ड सारख्या विद्यापीठांच्या इतिहासातल्या संशोधनसाठीच्या फेलोशिप मिळाल्या आहेत.

दमन सिंग यांनी १९८४ साली सेंट स्टीफन या दिल्लीच्या विद्यापीठातून मॅथेमॅटिक्स मध्ये आपली पदवी पूर्ण केली. पुढं त्यांनी रुरल मॅनेजमेंट मध्ये काम करायचं ठरवलं. यासंबंधीच शिक्षण त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेंट, आनंद येथून घेतलं. आणि २० वर्षाहून अधिकचा काळ लोटला त्या ग्रामीण भागाच्या डेव्हल्पमेंटसाठी कार्यरत आहेत. त्यांनी मिझोरमच्या जंगल आणि लोकांशी संबंधित Last Frontier: People and Forests in Mizoram हे पुस्तक लिहिलं आहे. तसेच आपल्या वडिलांचं  ‘स्ट्रिक्टली पर्सनल : मनमोहन अँड गुरशरन’ हे पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिलं आहे.

अम्रित सिंग या लीगल एक्टिविस्ट आहेत. त्यांनी मानवी हक्कांसाठी ग्राउंड लेव्हलला जे काम केलं आहे त्यासाठी त्यांना युनायटेड नेशन्सचे पुरस्कार प्राप्त आहेत. न्यूयॉर्क बेस्ड ओपन सोसायटी जस्टीस इनिशिएटीव्ह या संस्थेत त्यांनी लीगल ऑफिसर म्हणून काम केलं आहे.

म्हणजे मनमोहन सिंग यांच्या तीन ही मुलींनी आपलं करिअर राजकीय क्षेत्रात निवडलंच नाही. ते का निवडलं नाही याची कारण मात्र सापडत नाहीत. पण त्यासंबंधीचा एक छोटासा किस्सा डॉ. मनमोहन सिंह यांची मुलगी दमन सिंह यांनी मनमोहन सिंह यांच्या ‘स्ट्रिक्टली पर्सनल : मनमोहन अँड गुरशरन’ आत्मचरित्रात लिहिलाय.

त्या लिहितात की, 

दर दोन महिन्यात आमच्या कुटुंबातील आम्ही सर्वजण बाहेर जेवायला जायचो. आम्ही कमला नगरमधील कृष्णा स्वीट्समध्ये दक्षिण भारतीय पदार्थ खायचो किंवा दरियागंजमधील तंदूरमध्ये मुगलई. चीनी पदार्थांसाठी आम्ही मालचा रोडवरील ‘फुजिया रेस्टॉरंटमध्ये’ जायचो आणि चाटसाठी आम्हाला आवडायचे बंगाली मार्केट. माझ्या वडिलांना अंड कसं उकळतात, टीव्ही कसा लावलात हेही माहीत नव्हते.

आम्हाला त्यांच्या सरकारी गाडीत बसण्याची संधी कधी मिळाली नाही. आम्हाला एखाद्या ठिकाणी जायचे असेल आणि ते ठिकाण वडिलांच्या रस्त्यातच असेल तरीदेखील ते आम्हाला त्यांच्या सरकारी गाडीत बसू द्यायचे नाही.

या घटनेवरून पंतप्रधान असणाऱ्या या वडिलांनी त्यांच्या मुलींकडे राजकारणातल्या घराणेशाहीची कावड का दिली नाही याच उत्तर नक्कीच सापडतं. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.