कुराणचं ॲप डिलीट करत चीननं एका दगडात दोन पक्षी मारले का?

चीन हा तसा पहिल्यापासनं काड्या करणारा देश. आता बघा सीमाभागावर कायतर कुरापत काढणार, व्हायरसचा मॅटर करणार, नायतर सोशल मीडिया ॲपवाल्यांना धमकी देणार. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम ही ॲप तिकडं आधीच बॅन आहेत. जी ॲप सुरू आहेत त्यांच्यावर बिग बॉसच्या घरात असल्यासारखा वॉच असतो. गेल्या काही महिन्यांत चीनमध्ये मुस्लिम इमामांवर अत्याचार होत असल्याच्या बातम्याही सातत्यानं उजेडात येत होत्या. आता चीनमधल्या सरकारी अधिकाऱ्यांनी ॲपल कंपनीला ‘कुराण मजीद’ हे ॲप आय स्टोअरवरुन डिलीट करायला लावलं आणि वेगळ्याच वादाला तोंड फुटलं.

जगातल्या प्रमुख मुस्लिम संघटनांनी ॲपल कंपनीला धारेवर धरलं. तर ॲपलनं हे चायनीज अधिकाऱ्यांच्या सुचनेमुळे केल्याचं सांगितलं. कुराण मजीद हे लोकप्रिय ॲप ‘अवैध धार्मिक ग्रंथ’ असल्यानं डिलीट केल्याची बातमीही प्रकाशात आली.

कुराण मजीद हे ॲप जगभरात लोकप्रिय आहे. एकट्या चीनमध्येच याचे जवळपास दहा लाख वापरकर्ते आहेत. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीनंही इस्लामला अधिकृत धर्म म्हणून मान्यता दिली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून चीनमधल्या झिंजियांग या बहुसंख्य मुस्लिम असणाऱ्या प्रांतात मुस्लिमांवर गंभीर अत्याचार होत असल्याच्या बातम्याही सातत्यानं पुढे आल्या. त्यातच हे कुराण वाचण्यासाठी मोलाचं ठरणारं ॲप डिलीट करत चीननं आगीला तडका दिलाय. त्यामुळे मुस्लिम धर्मीयांशी चीनचं बिनसलंय का? अशा चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या.

आता दुसऱ्या बाजूला ॲपल कंपनीही लोकांच्या टीकांचा केंद्रबिंदू ठरली आहे. इतकं लोकप्रिय ॲप काढून टाकणं त्यांच्या विक्रीला मोठा झटका देऊ शकतं. आता या पिक्चरमधली दुसरी स्टोरी अशी आहे की, ॲपल आणि चीन सरकारचे संबंध पण फार खास नाहीत. ॲपलचं मोठं मार्केट चीनमध्ये असलं, तरी त्यांचा मुख्य स्पर्धक असलेली सॅमसंग कंपनीही त्याच मार्केटमध्ये आहे. सोबतच ॲपलला कच्च्या मालासाठी प्रामुख्यानं चीनवरच अवलंबून राहावं लागतं, त्यामुळे ते चिनी सरकारच्या विरोधात जातं हजारदा विचार करतील.

ॲपलवर टीका होऊ लागल्यावर त्यांनी हे ॲप काढून टाकण्याबाबत आपल्या ह्युमन राईट्स पॉलिसीकडे बोट दाखवलं. त्यांच्या पॉलिसीत ते म्हणतात, ‘आम्हाला स्थानिक कायद्यांचं पालन करणं बंधनकारक असतं. बऱ्याचदा असे काही मुद्दे असतात ज्याच्याशी आम्ही असहमत असतो.’ थोडक्यात ॲपलनं कुराण मजीद हे ॲप सरकारच्या सूचनांनुसार काढून टाकल्याचं स्पष्ट केलं आहे.

गेल्या आठवड्यात असाच आणखीन एक विषय झाला. ख्रिस्ती धर्मग्रंथ असणाऱ्या बायबलशी संबंधित एक ॲपही चीनच्या आय स्टोअरवरून गायब झालं. त्या ॲपच्या निर्मात्यांनी आम्हाला धार्मिक बाबी प्रकाशित करण्यासाठी चीन सरकारकडून आणखी काही परवानग्यांची गरज असल्याचं सांगितलं. थोडक्यात चीनमध्ये सारंकाही आलबेल नाही किंवा ही परिस्थिती चीन स्वतःच तयार करतंय.

मुस्लिम असोसिएशन ऑफ ब्रिटन या संघटनेनं ट्विटरवर चीन सरकारला खडे बोल सुनावले. चीन सरकार इस्लामोफोबिक असल्याचं त्यांनी म्हटलंय. ॲपलनं अशा दडपशाहीला, इस्लामोफोबियाला आणि नरसंहाराला समर्थन देऊ नये अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यांच्या ट्विटला अनेकांनी पाठिंबा दाखवलाय, तर काही लोकांनी ॲपलला दोषी धरलंय.

चीननं यातून फक्त ॲपललाच नाही, तर इतर कंपन्यांनाही  थेट संदेश दिलाय की जसं आम्ही म्हणतोय तसं वागा. नाहीतर तुम्हाला गोत्यात आणायचे इतर पर्यायही आमच्याकडे आहेत. सोबतच इस्लामी संघटनांनाही त्यांनी चुचकारलंय. आता पुढे काय होईल ते सांगता येत नाही, पण चीननं पुन्हा एकदा जगाच्या राजकारणात काड्या करायला सुरुवात केलीये हे नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.